सौ. स्मिता सुहास पंडित
मनमंजुषेतून
☆ साडी म्हणोनी कोणी – लेखिका : सौ. क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
“ मावशी, उद्या कॉलेज मध्ये साडी डे आहे, मी तुझी पैठणी नेसणार आहे चालेल ना तुला?”
“अगं चालेल काय पळेल, पण ब्लाऊज…… “,
“don’t worry मावशी I will manage”… ‘इती केतकी’,
एक बरं आहे या जनरेशनचे, त्यांच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असतात. केतकी येईलच इतक्यात…… पैठण्या पण दोन तीन त्यातली तिला कोणती आवडेल… जाऊ देत तिन्ही तिच्यासमोर ठेवाव्यात, आवडेल ती नेसेल. आपण पैठणी नेसून किती वर्ष, महिने झालेत आठवायलाच हवे.
कपाट उघडले तसा कपाटातून आवाज येऊ लागला. कोणी तरी आपापसात बोलत आहेत असा मला भास झाला.
“अगं मला नेस मला नेस, ” आवाजाच्या दिशेने पाहते तर, हॅंगर जोरदार हेलकावे घेत होते. नारायणपेठी हलल्यासारखी वाटली,
“ए तू बाजूला हो गं, ” नारायण पेठीला कोणीतरी दूर लोटले. तशी ती पटकन बाजूला झाली.
“बायकांना माहेरचा खूप खूप अभिमान असतो असं ऐकलं होतं, पण छे:, गेली वीस वर्षे मी बाहेरचं जग पाहिलं नाहीये. वीस वर्षांपूर्वी ‘सौरभच्या’ मुंजीसाठी, ‘माहेरची (पांढरी) साडी’, हवी म्हणून खास गर्भरेशमीची फर्माईश होती.. येतयं का काही लक्षात, बघ बघ जरा माझ्याकडे”.. बिचारी पांढरी साडी विरविरली.
‘अगं बाई खरंच की’, माझे मलाच वाईट वाटले.
आता सौरभचे लग्न ठरत आलयं. खरंच वीस वर्ष झाली आपण कसे काय विसरलो माहेरच्या साडीला. साडीला चुचकारले, आईची आठवण आली, क्षणभर गलबलल्या सारखे झाले.
“आम्ही पण कपाटात आहोत बरं का, तुझ्या लक्षात तरी आहे का, ‘बरोबर-बरोबर, आम्ही आता काकूबाई झालो ना., ‘अहो’ इंदोरला गेले होते, अहोंना किती instructions दिल्या होत्यास, डाळिंबी रंगच हवा, काठ सोनेरीच हवेत. सुरुवातीला नेसलीस, आता आम्ही बसलोय मागच्या रांगेत.. “ प्रेमाने मी इंदूरीवरून हात फिरवला. तशी ती आक्रसून गेली..
“माझ्याकडे बघता का जरा मी तर अजून गुलाबी कागदात तशीच आहे गुंडाळलेली”… अगं बाई खरंच वास्तूशांतीची आलेली, त्यालाही पाच वर्ष झाली.. मला तो रंग आवडला नव्हता, मग ती पिशवीत तशीच राहिली, नवी कोरी.. ”
“मी कित्ती लकी आहे, डिझायनर बाईसाहेब पुटपुटल्या. “.. खरंच होतं तिचे.. पण, त्यातली मुख्य मेख तिला कुठं माहिती होती… तेवढा ‘एकमेव’ ब्लाऊज मला अंगासरशी बसत होता.
तेवढ्यात, शिफॉन बाईंनी लगेच तिला टाळी मागीतली,
“अगं मी नेसले ना की बाईसाहेब बारीक दिसतात, मग कायं, आमचा नंबर ब-याचदा लागतो बरंका…. “
कपाटातल्या साड्यांची सळसळ जरा जास्तच होवू लागली. पटकन कपाटाचे दार लावून टाकले.
आतल्या कांजीवरम, इरकलं कलकत्ता, पोचमपल्ली, ऑरगंडी, पुणेरी.. सगळ्यांची एकमेकींच्यात चाललेली कुजबूज बाहेर मला स्पष्ट ऐकू येत होती. प्रत्येकीची आपली आपली कहाणी होती. त्या कहाणीचे रूपांतर आता रडकथेत झाले होते आणि याला सर्वस्वी मीच जबाबदार होते..
बाहेर येऊन पहिलं गटागटा पाणी प्यायलं. खरंच मोजायला गेले असते तर ‘सेन्च्युरी’ नक्की मारली असती साड्यांनी. पण नाही नेसवत आता. काही जरीच्या साड्या जड पडतात. आताशा पंजाबी ड्रेसच बरे वाटू लागलेत. वावरायला सोप्पं पडतं ना. कपाटातल्या डझनभर साड्या मिळालेल्याच आहेत, तिथं आपल्याला choice थोडाच असतो. प्रेमापोटी मिळालेल्या, काही सरकवलेल्या(म्हणजे घडी बदल, इकडून तिकडे)मग काय नगाला नग, कपाट ओसंडून वाहणार नाही तर काय… सगळ्यांना सांगून दमले, आता काही देत जाऊ नका, साडी तर नकोच नको… पण…
असो…..
आता मात्र मनाशी पक्की खूणगाठ बांधली, जास्तीत जास्त वेळा साडीच नेसायची आणि हो, त्याच्यावरचे ब्लाऊज होण्यासाठी ‘१ तारीख आणि सोमवार’ ज्या महिन्यापासून येईल तेव्हा पासून जिम चालू करायचे..
मनावरचा ताण एकदम हलका झाला.
‘केतकी’ साठी पैठणीसोबत अजून दोन चार साड्या काढून ठेवल्या, तेवढीच हवा लागेल त्यांना.
खरं तर ‘साडी’ नेसणे हीच समस्त महिला वर्गाची दुखरी नस असावी…….
… हव्या हव्याश्या तर वाटतात.. पण……
लेखिका : सौ क्षमा एरंडे
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
सांगली – ४१६ ४१६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈