श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “पत्यांचा डाव…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
(दै. लोकमत मंथन पुरवणीत २२ सप्टें. २०१९ ला प्रकाशित)
सकाळपासून माझी थोडी चुळबुळ सुरु होती. पण कोणाशी बोलावं हे काही कळत नव्हतं. बाबा दोन दिवसांकरता बाहेरगावी गेले होते. नाहीतर त्यांच्याशी बोलून मन थोडं मोकळं करता आलं असतं.
मित्राच्या घरी त्यांचे थोडे घरगुती वाद झाल्याने त्याच्या घरच वातावरण थोड गढूळ झाल होत. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो.
माझी ही चुळबुळ कदाचित आजोबांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरेने हेरली असेल असे वाटतं. कारण त्यांनी शांतपणे मला बोलावलं, समोर बसवलं आणि पत्याचा कॅट काढून पत्ते वाटून म्हणाले, बैस, जरा दोन डाव खेळ. फ्रेश वाटेल आणि विचारांना दिशा मिळेल.
पत्ते खेळतांना ते काही जास्त बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, आपल्याकडे असलेल्या पत्यांमधून आपण चांगला डाव लावण्याचा प्रयत्न करतो. सगळे डाव चांगलेच येतात असे नाही. काही चांगले असतात, लवकर लागतात. काही थोडे अवघड असतात, उशीरा लागतात, पण लागतात हे नक्की. त्यासाठी आवश्यक त्या पत्यांची जुळवाजुळव करावी लागते. काही पत्ते सोडावे लागतात, तर काही समोरच्याने टाकलेले किंवा आपण ओढून घेतलेले उपयोगात येतील का हे बघावे लागतं.
आपल्या आयुष्यात रोज उगवणारा दिवस असाच पत्यांच्या डावासारखा आहे. काय सोडावं आणि काय धरावं याचा शांतपणे आणि योग्य विचार केल्यास रोजचा डाव चांगल्या पध्दतीने सोडवण्यास मदत होते.
काही वेळा वेगळ्या डावांमध्ये आपण हुकूम सुध्दा बोलतो. आपल्याकडे भारी असलेले पत्ते हुकूमाच्या हलक्या पाना पुढे निष्प्रभ ठरतात. पण यातुनच सावरायचे असते. आणि पुढच्या चांगल्या डावाची प्रतीक्षा करायची असते.
हे सगळं बोलून होईपर्यंत आमचे दोन डाव झाले होते. मग ते शांतपणे म्हणाले, दोन डावात तुझ्या लक्षात आले का? आपल्याकडून काही पत्ते सोडले जातात, काही टाकले जातात, तर काही दिले जातात.
जे सोडतो ते दोघांच्याही उपयोगाचे नसतात. म्हणून समोरचाही उचलत नाही.
जे टाकतो ते कदाचित थोड्या कालावधीनंतर उपयोगात येणार असतात. असे पत्ते समोरचा उचलतो.
आणि जे देतो ते हमखास लगेचच उपयोगी आणि डाव लागायला कारणीभूत असतात, व बऱ्याचवेळा आपल्याला हे माहीत सुध्दा असते.
आपल्या रोजच्या जीवनातही येणाऱ्या प्रसंगात देण्याची वृत्ती असावी. त्याने समस्या सुटायला मदत होते. ज्या गोष्टी अपायकारक किंवा निरुपयोगी आहेत त्या सोडून द्याव्या. ज्या गोष्टींचा त्याग आत्ता केला तर चांगलेच होणार आहे त्या टाकून द्याव्या.
जेव्हा कोणाला संसारात, मैत्रीत साथ हवी असते त्या वेळी एकमेकांचा डाव लागतील असे पत्ते (विचार, मदत, संयम, धैर्य) द्यावे. त्यामुळे आपला किंवा त्याचा डाव लागण्यास मदत होते. येथे एकमेकांशी स्पर्धा, ईर्षा असता कामा नये. स्पर्धेत मी नाही तर तु सुध्दा नाही असा विचार असतो. पण रोजच्या डावात तो विचार ठेऊन चालत नाही.
प्रत्येक डाव लागण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागतो. तुमच्या पिढीचा हा त्रास आहे की तुम्हाला लगेच निकाल अपेक्षित असतात. थोडा संयम ठेवण्याची वृत्ती तुमच्याकडे नाही. जुळवाजुळव किंवा काही अंशी तडजोड तुम्ही सहज स्विकारत नाही. त्यामुळे मीच आणि माझेच बरोबर असा ग्रह कदाचित निर्माण होऊन डाव विस्कटण्याची शक्यता असते.
आता शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. म्हणजे तुझी चुळबुळ शांत होईल.
आता मात्र मी मित्रांकडे जाऊन शांतपणे सगळे ऐकून व समजावून घेईन व काय सोडायचे, काय टाकायचे, व काय कोणी द्यायचे हे ठरवून त्यांचा डाव व्यवस्थित लाऊन देईन या बद्दल माझी खात्री झाली आहे.
धन्यवाद आजोबा, पत्याच्या डावातून देणं, घेणं, सोडण, जुळवण, व संयम दाखवणं हे शिकवल्याबद्दल. असे मी म्हणालो आणि मित्राकडे त्याचा डाव सावरायला बाहेर पडलो.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈