सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पसारा

आमच्या घरी रविवार हा विशेष दिवस असायचा. म्हणजे तसा तो सगळ्यांकडेच असावा कारण एकतर सुट्टीचा वार आणि सगळे घरात. थोडा निवांतपणा, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळा पण मला एक मात्र आठवतंय की, ” चला रविवार आहे म्हणून गादीत पांघरूण घेऊन उशिरापर्यंत लोळत राहूया. ” हे मात्र नव्हतं. या उलट कधीकधी तर पप्पा शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यांना सांगून ठेवायचे, ” उद्या प्रत्येकाने पहाटे चार वाजता उठायचे. आपल्याला कशेळीच्या पुलावर जायचे आहे आणि तिथून हजारो वर्षांनी प्रकटलेल्या एका धूमकेतूचे दर्शन घ्यायचे आहे. निसर्गातले दुर्लभ देखावे पाहण्यातली मजा काही औरच असते. ”

आणि आम्ही सारे पहाटेच्या अंधारात चालत कशेळीच्या पुलावर जात असू आणि तिथून आकाश दर्शनाचा महानंद घेत असू. अशा अनेक सुंदर पहाटा (पहाटचे अनेक वचन) आम्ही अनुभवलेल्या आहेत. निसर्गाच्या तत्त्वाशी झालेली तादात्म्यता किती सुखाची असते हे जरी तेव्हा कळत नसलं तरी जाणवलं होतं. मोकळ्या आभाळाखाली उभे राहून अंधारात चमचमणारं आकाश दर्शन किती सुंदर असतं हे केवळ शब्दांच्या पलिकडे आहे.

आज जेव्हा मी घराच्या गच्चीतून कधीतरी पहाटे आकाश निरखण्याचा प्रयत्न करते तेव्हा काहीसं गढुळ, धुरकट, बिनताऱ्यांचंं आकाश बघताना कुठेतरी मन द्रवतं. माणूस निसर्गापासून दूर जात चालला आहे का?” हा प्रश्न वेदनादायी वाटतो.

असो!

तर आमचे अनेक रविवार अशा रितीने सुरू व्हायचे. जेवणाच्या मेनू पासून सारंच विशेष असायचं. संध्याकाळी सेंट्रल मैदानात मस्त रमतगमत फिरायला जायचं. तिथल्या खुरट्या पण गारवा देणाऱ्या गवतावर रिंगण करून बसायचं. सोबत खाण्यासाठी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा किंवा ओवा, मीठ घालून उकळलेल्या चवळीच्या शेंगा नाहीतर वाफवलेल्या शिंगाड्यांचा आस्वाद घ्यायचा. पप्पांकडून अनेक गमतीदार किस्से ऐकायचे. एकेकांच्या मस्त नकला करून ते आम्हाला हसवायचे. काही गल्लीतले सवंगडीही बरोबर असायचे. मग त्यांच्यासोबत लंगडी, रिंग नाहीतर कांदाफोडी सारखे मजेदार खेळही रंगायचे. कधी गाणी तर कधी भेंड्या. मज्जाच मज्जा. त्यावेळी मॉल नव्हते. टाईम झोन सारखे ढॅण ढॅण, कानठळ्या बसणारे कर्कश्श नादमय बंदिस्त क्रीडा विभाग नसायचे. बर्गर, पास्ता, पिझ्झा यांची तोंडओळख ही नव्हती पण सेंट्रल मैदानातला रविवारचा तो हल्लाबोल मात्र विलक्षण असायचा. जडणघडणीतला एक महत्त्वाचा भाग होता तो! संध्याकाळ उलटल्यानंतर सोबतीला आकाशातली आकाशगंगा असायची. सप्तर्षी, व्याध, ध्रुवतारा, कृत्तिका, अनुराधा आमच्याबरोबर जणू काही फेर धरायच्या. आजही माझ्या नातींना मी आकाशात नथीच्या आकड्यासारखा दिसणारा कृत्तिकेचा तारकापुंज दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना मजा वाटत नाही असे नाही पण त्या त्यात गुंतत नाहीत हे मात्र खरं. शिवाय आता त्यांच्यासाठी प्लॅनेटोरियम्स आहेतच. बायन्याक्युलर्स, टेलिस्कोप सारखी आधुनिक उपकरणे आहेत पण दोन डोळ्यांनी अथांग आभाळ पाहण्याचे सुख काय असतं हे त्यांना कसं सांगू?

रविवारची दुपार मात्र थोडी वेगळी असायची. तरीही त्या दुपारींना मी सुस्त दुपार असे विशेषण लावणार नाही. त्याचे कारण म्हणजे माझी आई. आई अतिशय व्यवस्थित. स्वच्छता, टापटीप याविषयी अत्यंत जागरूक, सतत आवराआवरी करणारी एक शिस्तप्रिय व्यक्ती होती. त्या बाबतीत पप्पा मात्र थोडे शिथिल होते म्हणजे ते व्यवस्थित नव्हते असं मी मुळीच म्हणणार नाही पण त्यांचा व्यवस्थितपणा आणि आईचा व्यवस्थितपणा यांच्या व्याख्याच वेगळ्या होत्या आणि त्या एकमेकांना छेद देणाऱ्या होत्या. पप्पांची पुस्तके, लेखनाचा पसारा म्हणजे कागद, पेन, पेन्सिली वगैरे …त्यांचे संदर्भ ग्रंथ, फाइल्स, वाचकांची पत्रे अशा अनेक गोष्टी घरभर पसरलेल्या असत. पप्पांची विद्वत्ता, त्यांचा लौकिक, लोकप्रियता, व्यासंग, अभ्यास हे सगळं मनोमन मान्य करूनही आईला हा सगळा पप्पांचा पसारा वाटायचा. ती अनेकदा तळमळीने तो आवरूनही ठेवायची. कशा पद्धतीने तो ठेवला गेला पाहिजे यावर पप्पांची शिकवणी घ्यायची. त्यावरून त्यांचे वादही व्हायचे. पप्पांचे एकच म्हणणे असायचे, ” मला हवी ती, हवी तेव्हा कुठलीही वस्तू या जंजाळातच सापडते. तू कशाला आवरतेस?”

आम्ही कुणीही कुणाचीच बाजू घ्यायचो नाही पण एखाद्या रविवारी दुपारी पप्पाच फर्मान काढायचे, ” चला ग पोरींनो! आज आपण हे भलं मोठं काचेचं पुस्तकांचं कपाट आवरूया. जरा नीटनेटकं लावूया. ”

हे कपाट आवरणं म्हणजे एक उपक्रम होता म्हणण्यापेक्षा एक महान सोहळाच होता असं मी म्हणेन. पप्पांचा पुस्तक संग्रह विशाल होता. कितीतरी जुनी क्लासिक मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेमधील अनेक विषयांची पुस्तके त्यात होती. एकेक पुस्तक हातात घेतल्यावर ते म्हणायचे, “पाहिलं? हे कालिदासाचे मेघदूत. काव्यानंद आणि काव्यभावाचा उच्चांक म्हणजेच हे मेघदूत. मग भर दुपारी आमच्या त्या अरुंद घरात साक्षात अलकापुरी अवतारायची. कुबेर, यक्ष आमच्या दारात उभे राहायचे. प्रेमिकेसाठी व्याकुळ झालेला यक्ष, आषाढातला पाऊस आणि त्या मेघदूताचे दर्शन आम्हाला तेव्हाच घडायचे. हातात कालिदासाचे मेघदूत आणि पप्पांच्या मुखातून आलेले सहजोद्गार..

 नीत्वा मासान्कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श।।

आम्ही ऐकत बसायचो. कपाटातून एका मागून एक पुस्तकं निघायची. शाकुंतल, मालविकाग्नीमित्र, चक्रधर, भवभूती, मोरोपंत …एकेकांना पप्पा रांगेत अत्यंत मानाने जमिनीवर पसरलेल्या चादरीवर ठेवत. मध्येच मृच्छकटिक नाटकाची गोष्टही ते सांगायचे. आर्या वृत्तातल्या केकावल्या रंगायच्या.

।। सुश्लोक वामनाचा

 अभंगवाणी तुकयाची 

ओवी ज्ञानेशाची 

आर्या मयुरपंतांची।।

मोरोपंतांचीच एक मिश्कील काव्यरचना त्यांनी आम्हाला वाचून दाखवली.

स्वस्त्री घरात नसता कंडु शमनार्थ रंडीरा खावी।

तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी।।

वाचकहो! हे फालतु काव्य नाही बरंका?

अहो मोरोपंतच ते.. त्यांचं काव्य अस्सलच.

कंडु म्हणजे घशातली खवखव.

रंडीरा म्हणजे खडीसाखर.

चिबुल्ली म्हणजे पडजीभ.

या ओळींचा अर्थ एव्हढाच की घरांत कुणी नसताना खोकल्याची उबळ आली तर खडीसाखर खावी, तीही नसेल तर मग स्वत:च्या हाताने पडजीभेवर दाब द्यावा.

पपांच्या तोंडून हे सारं ऐकताना आम्ही खरोखरच रमून जायचो.

मग कपाट आवरणं दूरच रहायचं.

पप्पा त्या कपाटातून बाहेर आलेल्या पुस्तकांच्या गराड्यातत पार रंगून गेलेले असायचे. एकेकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे. ” हे पहा! हे बर्नाड शॉचे पिग्मॅलियन नाटक. त्याची कल्पकता तर पहा! एका ग्रीक दंतकथेवरून सुचलेलं हे सुंदर विनोदी अंगाने जाणारं पण प्रेमाविष्काराचं सुरेख नाटक. एक उत्कृष्ट शिल्पकार त्याच्या स्वतःच्याच निर्मितीच्या प्रेमात कसा पडतो ते सांगणारी ही एक ग्रीक दंतकथा आणि या कथेचा आधार घेऊन एका प्रोफेसर आणि ग्रामीण फुलराणीची ही अप्रतिम प्रेमकहाणी म्हणजेच हे बर्नार्ड शाॅचे पिग्मॅलियन नाटक.

भर दुपारी ही कथा इतकी रंगायची की आम्ही कपाट आवरण्याविषयी पूर्णपणे विसरलेलेच असायचो.

शेक्सपियरची जुलिएट, डेस्डेमोना, हॅम्लेट, ते काल्पनिक भूत, ऑथेल्लो, ब्रूटस सारेच आमच्या या सोहळ्यात हळूहळू सहभागी व्हायचे.

मध्येच पपा मला म्हणायचे, ” लंडनला राणीच्या देशात जाऊ आणि शेक्सपियरच्या स्ट्रॅटफॉर्डला नक्की भेट देऊ बरं का बाबी!

मग मी म्हणायचे!” काय पप्पा आधी कबूल केल्याप्रमाणे बेळगावला तर न्या. मध्येच हे लंडन कुठून आलं?”

“अगं जाऊ की! आणि समजा मी नसलो तरी तुम्ही जालच आयुष्यात कधीतरी. त्यावेळी एक वेडा वाचक म्हणून त्याच्याशी माझी ओळख करून द्या. ” पप्पांची भविष्यवाणी खरी ठरली पण आमच्या धोबी गल्लीतल्या घरातलं पप्पांमुळे निर्माण झालेलं ते स्ट्रॅटफोर्ड मला आजही आठवतं आणि तेच खरं वाटतं.

अँटन चेकाव हा एक पप्पांचा आवडता लेखक. त्याची “नेकलेस” ही कथा ते इतकी रंगवून सांगायचे की आकाशातून ऐकणारा तो प्रत्यक्ष लेखकही सुखावत असेल.

WHEN ALL AT ONCE I SAW A CROWD

A HOST OF GOLDEN DAFFODILS

BESIDE THE LAKE BENEATH THE TREES

FLUTTERING AND DANCING 

 IN THE BREEZE.

वर्ड्सवर्थची “डॅफोडील” ही अशीच अलगद कपाटातून बाहेर यायची. त्यासोबत बालकवींची फुलराणी असायची.

 आईच्या बाळा ठावे

 प्रेमाच्या गावा जावे

 मग ऐकावे या बोला

राजहंस माझा निजला… ही गोविंदाग्रजांची कविता म्हणून दाखवताना पप्पांच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याचा पूर व्हायचा.

जे कृष्णमूर्ती म्हणजे चैतन्यवादी तत्त्वचिंतक. पप्पांच्या विचारांवर त्यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांची तत्त्वचिंतनपर लिहिलेली अनेक पुस्तके पप्पांनी संग्रही ठेवली होती. काही पुस्तकांचे मराठी अनुवादही पप्पांनी केले होते. अनेक लेख त्यांचे मासिकातून प्रसिद्ध झाले होते. या सर्वांची कात्रणे पपांनी जपून ठेवलेली होती. कपाट लावण्याच्या निमित्ताने तीही बाहेर आली आणि काही काळ आम्ही “जे कृष्णमूर्ती” यांच्या विचार प्रवाहात नकळत गुंतून गेलो.

शैक्षणिक पुस्तकांच्या राशीत छुंदाला गोखले यांचं अंकगणित हे पुस्तक दिसलं. ते बघताच पपा तिला म्हणाले,

“बाजूलाच ठेव ते. उद्यापासून रोज यातली पाच गणितं तरी सोडवायचीच.

कपाट आवरणं फक्त निमित्त! त्या काही वेळात आमच्या घरात जणू काही विश्व साहित्य संमेलन भरलेलं असायचं. तमाम, गाजलेले, देश विदेशातले मृत अथवा जिवंत लेखक- लेखिका त्यांच्या साहित्यांचा एक सुंदर मेळावाच तिथे भरलेला असायचा. त्या साहित्य गंगेच्या प्रवाहात आम्ही आनंदे विहार करायचो.

तिथे फक्त पुस्तकंच नसायची तर अनेक जपून ठेवलेले आठवणींचे कागदही असायचे. त्यात उषाने अगदी लहान असताना काढलेल्या प्रमाणबद्ध रेषांची चित्रं असायची, छुंदाने सोडवलेल्या एखाद्या कठीण गणिताचा वहीतला कागद असायचा, ” मला फक्त सुखात राहायचे आहे” अशी मी कधीतरी लिहिलेली कागदावरची ओळही जपलेली असायची. कपाट आवरताना एका कागदावर स्थिर झालेली पप्पांची नजर मला दिसली आणि मी विचारले, ” काय बघता एवढं त्या कागदावर?”

“बाबी! हे माझ्या बापाचं हस्ताक्षर आहे. मी चार महिन्यांचा असताना त्यांनी हे जग सोडले. मी माझा बाप पाहिला नाही अनुभवला नाही. या हस्ताक्षरात मी माझा बाप अनुभवतो. ”

काळजात चुकलेला तो ठोका आजही माझ्या आठवणीत तसाच्या तसाच आहे.

आई म्हणायची, ” पसारा आवरा तो. ” कसला पसारा आणि कसा आवरायचा? मुळातच याला पसारा का म्हणायचं? 

संध्याकाळ झालेली असायची. भराभर आम्ही सारी पुस्तकं कपाटात ठेवून द्यायचो. खरं म्हणजे पूर्वीपेक्षाही ते कपाट आता अधिकच भरलेलं दिसायचं पण आम्हाला ते तसंच नीटनेटकं वाटायचं.

आज हे सारं काही आठवून लिहिताना जाणवतं, मनाच्या बंद तिजोरीत ही मौल्यवान संस्कार भूषणं अजूनही तशीच आहेत. ज्यांनी आमच्या जगण्यातला आनंद वाढवला, टिकवला.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

राधिका ताई मनमंजूषा छानच रंगतंय.