श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आनंदाचे डोही…  ☆ श्री सुनील देशपांडे

सध्या वयाच्या पंचाहत्तरी मधून मार्गक्रमण चालू आहे. ७५ नंतर पूर्वी वानप्रस्थाश्रम असे म्हणत. हळूहळू व्यावहारिक जगतापासून दूर होणे जमले पाहिजे. किंबहुना जीवनातील व्यवहारांपासून दूर होता आले पाहिजे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

‘आता उरलो उपकारापुरता’ असे पूर्वी म्हणत पण आता म्हणावेसे वाटते ‘आता उरलो समाजापुरता. ’ मृत्यूनंतर हळूहळू सगळे आपल्याला विसरतातच. परंतु या वयापासून जिवंतपणी सुद्धा माणसे विसरू लागतात.

माझे सासरे एकदा मला म्हणाले ‘ मी मेल्यावर तुम्ही माझ्याविषयी चार चांगले शब्द बोलाल. माझ्यावर कविता कराल. पण ती ऐकायला मी कुठे असेन ? त्याचा काय उपयोग? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल माझ्यावर एक कविता जिवंतपणी करून मला ऐकवा तेवढी माझी शेवटची इच्छा समजा’ खरोखरच मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर कविता लिहून त्यांना ऐकवली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव होता.

मला आता सर्वच परिचितांना सांगावेसे वाटते. ज्यांना प्रेमापोटी नाती जपायची आवड व इच्छा असेल त्यांनी मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कधीतरी येऊन जावे.

‘सुनील गेला’ असा फोन येईल तेव्हा तुम्ही ‘ताबडतोब निघतोच आहे’ असे म्हणून गडबडीने यावयास निघाल हे मला नको आहे. मुळातच मी देहदानाची इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे मृत्यूनंतर कोणी भेटायला यावे इतका वेळ असणारच नाही. दुसरे म्हणजे मृत्यूनंतर ‘भेटणे’ शक्यच नाही. त्याला आपण पारंपरिक भाषेत दर्शन म्हणतो. हे कसले दर्शन? माणसाचे जिवंतपणी दर्शन न घेता मृत्यूनंतर दर्शन घेणे हे विडंबन आहे असे मला वाटते. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देहदान करावयाचे असते. त्यामुळे अगदीच जवळचे चार नातेवाईक किंवा मित्र यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी यावे याशिवाय त्यात दुसरे काही साध्य नाही.

माझ्या एका मित्राच्या सासर्‍यांनी जिवंतपणी श्राद्धविधी अर्थात ‘साक्षात स्वर्ग दर्शन’ या नावाचा विधी त्यांचे गावी केला. सगळ्यांच्या गाठीभेटी गळाभेटी आणि सहभोजन असा मस्त समारंभ करण्यात आला. हीच आपली अंतिम भेट म्हणून सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा प्रत्यक्ष मृत्यू झाला आणि देहदान सुद्धा झाले. ही संकल्पना मला खूप भावली.

परंतु एखादा दिवस ठरवून त्या दिवशी सर्वांना बोलावणे हा इतरांच्या सोयी गैरसोयीचा भाग असतो. बऱ्याच वेळा इच्छा असून सुद्धा तो दिवस सोयीचा नसतो. तसेच खूप जास्त माणसे एका वेळेला जमली की कुणाशीच नीट संवाद होत नाही.

म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते…. 

… वर्षामध्ये जेव्हा केव्हा जमेल, शक्य होईल तेव्हा येऊन भेटावे.

अर्थात त्यात औपचारिकता नको. जुळलेले भावबंध असतील तरच भेटीत आनंद असतो.

सोशल मीडियावर मेसेज टाकून मी जिवंत असल्याची खबरबात सातत्याने देत असतोच.

अर्थात मृत्यू कधी कोणाला सांगून येत नसतो. कोणत्या क्षणाला तो येईल कुणी सांगावे? म्हणूनच  मी गुणगुणत असतो…..

… ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो, हर एक पल की खुशी को गले लगाते चलो ’.

त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाचं सुख मी उपभोगत असतो. कुणाच्या येण्याने त्या सुखाला आणखी एक आनंदाची झालर लाभेल.

….. जे काही आयुष्याचे क्षण शिल्लक असतील त्या क्षणांमध्ये अधिकाधिक आनंद जोडता यावा आणि जिवंतपणीच स्वर्ग सुखाचा अनुभव घेता यावा ही मनापासून इच्छा.

‘ जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा ’.. या अनुभवापासून दूर होत.

आता फक्त अनुभूती हवी आहे… 

… ‘आनंदाचे डोही आनंद तरंग…’

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments