श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नवीन वर्षाचा कागद…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

खरंतर त्या कागदाबद्दल इतकं बोलण्यासारखं काहिच नव्हतं. पण एखादी गोष्ट उकरुन काढणे म्हणजे काय? याचा अनुभव परत एकदा आला. प्रत्येक काही दिवसांनी एक तिथी परत परत येते, तितक्याच सहजतेने हा उकरुन काढण्याचा अनुभव काही कालावधीनंतर परत येतोच. कधी तो येतो, तर काही वेळा आणण्यात आपणही मागे नसतो….. असो.

 लिहिलेल्या काही जुन्या कागदांना खूपच महत्त्व प्राप्त होतं. अर्थातच ते कोणी लिहिले, त्यात काय आहे, आणि कोणाच्या हाती लागले आहे यावर सुध्दा ते अवलंबून असतं. पण यांचं तसं नव्हतं…….

 माझ्या हस्ताक्षरातले असेच काही कागद घरातल्या अशा माणसाच्या हाती लागला, की त्याला महत्त्व येण्याऐवजी त्याचा विनोद झाला. आणि मग वाद……

 तुमच्या या कागदांना रद्दीत सुध्दा जागा नाही. असं म्हणत ते वाचले जात होते. अगदी तारीख आणि वर्ष यासकट.

 कागदावरच्या बऱ्याच गोष्टी सारख्याच असल्या तरी तारखेनुसार त्याच्यातलं अंतर एक वर्ष इतका मोठ्ठा काळ दाखवत होतं. म्हणजे वाढदिवस साजरा केला असता तर त्यातले काही कागद एकविस वर्षांचे सुद्धा झाले असते.

 यातही मी वर्षभरानंतर बऱ्याच गोष्टी तशाच लिहू शकतो, याच कौतुक न करता तेच तेच लिहिण्यात काय अर्थ? जे आपण करतच नाही……… असा उपहास होता. आणि अक्षराबद्दल तर एक अक्षर तोंडातून निघालं नाही. खरंतर माझ्या अक्षरावरून मी साक्षर आहे हे तिला मान्यच नाही.

 हा अक्षर, साक्षर, मधला क्ष, आणि गणितातला क्ष तेव्हापासूनच अक्षरशः माझ्या बाबतीत यक्षप्रश्न आहे.

 म्हणजे क्ष किरण यंत्राने काही गोष्टी समजतील. पण माझं लिहिलेलं समजणार नाही.

 आता एक वर्ष अंतर असणाऱ्या कागदावर काय वेगळं लिहिलेलं असणार….. नवीन वर्षात नियमितपणे करायच्या, आणि निग्रह करून सोडायच्या गोष्टी त्यात होत्या.

 यातल्या करायच्या गोष्टींचा निग्रह होत नव्हता, तर काही गोष्टी सोडल्याचा ग्रह मी करुन घेतला होता.

 ज्या गोष्टी करायच्या नाहीत ती व्यसनं आणि सवयी अर्थात वाईट सवयी आहेत असं इतरांच म्हणणं. आता हे इतर एकच असतील तरी त्यांचं म्हणणं हेच बहुमतासारखं असतं असं नाही, तर तेच बहुमत असतं यात शंका नाही……

 करायच्या काही गोष्टींमध्ये ज्या करायच्या होत्या त्याच्या विरुद्ध साहजिकच सोडायच्या होत्या. जसं सकाळी लवकर उठायचं म्हणजेच उशिरापर्यंत झोपणं सोडायचं होतं. ज्याला लोळत पडणं हा शब्द माझ्यासाठी घरात वापरला जातो.

 हळू आणि शक्यतो गोड आवाजात बोलायचं. म्हणजेच मोठ्याने बोलायचे तर नाहीच, पण बोलण्यातला ताठपणा सुद्धा सोडायचा हे ओघाने आलंच होतं. हे वाचतांना समोरचा आवाज उगाचच हुकूमशहा सारखा वाटला.

 नियमितपणे सूर्य नमस्कार घालणे. असंही त्यात होतं. नमस्कार करणे आणि घालणे यात फरक असतो. हे सुद्धा मला समजवून देण्यात आलं. आणि एक नमस्कार सुध्दा झाला. अगदी कोपरापासून. आता हा नमस्कार केला, की घातला हे मी ठरवेन…. पण नमस्कार करतेवेळी तेव्हाच तीच रुप मला सकाळच्या सूर्यासारखं तेजस्वी वाटलं……. आणि माझा चेहरा अस्ताला जाणाऱ्या सूर्यासारखा शांत वाटला……

 अन्न हे पूर्ण ब्रह्म…… उदर भरण नोहे……. याचा दाखला देत. जेवायला काय आहे? हे विचारायचं नाही. म्हणजेच जे मिळेल ते खायचं. आपल्या घरातलं चांगलच असतं. असं मीच लिहिलं होतं. पण…..

 हे वाचतांना त्यांचा रोख जिभेच्या पुरवलेल्या लाडामुळे माझ्या वाढलेल्या पोटाकडे होता.

 विकएंडला एकट्याने जायचं नाही. म्हणजेच जोडीने आणि गोडीने जायचं. हे फक्त लिहिलेलंच होत…… अंमलबजावणी व्हायची होती……

 म्हणजे वरच्या काही गोष्टी मी ठरवणार होतो, पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी करायलाच पाहिजेत हे माझी परवानगी न घेता ठरवण्यात आलं होतं. आणि तेच त्या कागदांवर माझ्याकडून लिहिलं (गेलं) होत. अशा छोट्या छोट्या पण मोठ्या वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या.

 नंतर नंतर तर कागदावर लिहिलेल्या गोष्टी वाचण्याचा वेग इतका वाढला, की काही गुंतवणुकीच्या जाहिरातीत शेवटी फक्त नियम आणि अटी लागू हेच समजतं, बाकी सगळं कानावरून जात, तसंच सगळं कानावरून गेलं. फक्त शेवटचा सोडलेला उसासा तेवढा समजला.

 असो…… आता तसाही त्या कागदांचा उपयोग नसला तरी यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तशाच, पण चांगल्या अक्षरात परत लिहून काढेन. पण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला………

 तो पर्यंत संदर्भ म्हणून गरज वाटली तर हे कागद आहेतच……….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

आवडला लेख