श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अविनाशी बीज” – लेखक – डॉ. भास्कर कांबळे – अनुवाद : डॉ. श्रीराम चौथाईवाले / श्री आनंद विधाते ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  अविनाशी बीज 

… भारतीय गणित आणि त्याच्या विश्वसंचाराचा रंजक इतिहास 

मूळ इंग्रजी पुस्तक : The Imperishable Seed

लेखक : डॉ. भास्कर कांबळे

अनुवादक : डॉ. श्रीराम चौथाईवाले : श्री आनंद विधाते

पृष्ठ:२७८ 

मूल्य: ६००₹ 

प्राचीन काळापासून भारत हा उच्च मानवी मूल्यांचा देश आणि मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानपरंपरांचा देश म्हणून ओळखला जातो. ‘भारतीय ज्ञान परंपरा’ ही केवळ मानव जातीचाच विचार करीत नाही, तर ती चराचर सृष्टीचा, इतर प्राणीमात्र, सजीव, निर्जीवांचाही विचार करणारी आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार, व्यक्त आणि अव्यक्त ब्रह्माचा विचार करणारी ही ज्ञानपरंपरा आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांचा विचार मांडणारी सर्वांत प्राचीनतम ज्ञान परंपरा आहे. कोणत्याही परकीय संस्कृतीला हीन न लेखता, कोणत्याही संस्कृतीवर, प्रदेशावर आक्रमण न करता, कुणाच्याही श्रद्धेवर घाला न घालता, आस्तिक आणि नास्तिकाचाही (चार्वाक) विचार तितक्याच आदराने करणारी संस्कृती म्हणून, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहावे लागेल. ज्ञान-विज्ञान-आरोग्यशास्त्र, ललितकला, शिल्पकला, व्यवस्थापनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, तत्वज्ञान, अध्यात्म, अर्थशास्त्र, साहित्य अशा कितीतरी क्षेत्रांत स्वामित्वाच्या पलीकडे विचार करीत, विश्वकल्याणासाठी भारताने संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञानाची निर्मिती केली आहे.

या समृद्ध ज्ञान परंपरेतून प्रसवलेल्या प्रत्येक विषयाचा संशोधनात्मक अभ्यास होणे अतिशय महत्वाचे असून ते एक जगव्याल कामही आहे. प्रस्तुत पुस्तकात ‘गणित’ हा विषय केंद्रीभूत ठेवत त्याच्या विविध शाखांतून झालेली ज्ञान निर्मिती तसेच सिद्धता पद्धती, त्यांचा दैनंदिन जीवनात वापर अश्या अनेक अंगांचा तपशीलवार अभ्यास भारतीय ग्रंथ तसेच पाश्चात्य दस्तावेजीकृत संदर्भांसह विस्तृतपणे मांडला आहे. यातही प्रामुख्याने कॅल्क्युलस, खगोलशास्त्र या सारख्या आधुनिक ज्ञान शाखांची रुजुवात कशी झाली आणि तिचा भारतातून अरबदेश, युरोप असा झालेला विश्वसंचार कसा झाला याचा रंजक आणि सप्रमाण इतिहासही भूतकाळाचे अवास्तव स्तोम न माजवता ससंदर्भ मांडण्यात आला आहे.

इतका विश्वसंचार आणि वापर असूनही भारतीय गणित मुख्य प्रवाहातील इतिहासात मोठ्या प्रमाणात अनुल्लेखनीय राहिले आहे.

भारतीय गणिताविषयी हे सार्वत्रिक अज्ञान का असावे? 

तत्कालीन समृद्ध असलेली ही ज्ञानपरंपरा अचानक खंडित कशी झाली? 

अश्या अनेक प्रश्नाची धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अंगाने ससंदर्भ उत्तरे शोधताना हरवत गेलेल्या आत्मप्रेरणेचाही उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.

हे ज्ञान कसे निर्माण झाले आणि उर्वरित जगात कसे प्रसारित झाले हे दाखवण्यासाठी भास्कर कांबळे यांनी ‘द इम्पेरिशेबल सीड’ मध्ये ठोस पुरावे गोळा केले आहेत.

गणिताचे विद्यार्थी हे ‘पास्कलचा त्रिकोण’, ‘फिबोनाची अनुक्रम’, ‘रोलचा प्रमेय’ आणि ‘टेलर मालिका’ शिकत असतात. परंतु त्यांना हे समजत नाही की या संकल्पना त्यांच्या युरोपमधील तथाकथित शोधांपेक्षा खूप आधी पिंगल, हेमचंद्र, भास्कर आणि माधव यांसारख्या भारतीय गणितज्ञांनी स्पष्ट केल्या होत्या. आजच्या गणिताची अनेक क्षेत्रे-संख्यांचे दशांश प्रतिनिधित्व आणि साध्या अंकगणितापासून ते बीजगणित, त्रिकोणमिती आणि अगदी गणितापर्यंत-हिंदू गणितज्ञांनी विकसित केली होती किंवा त्यांची उत्पत्ती त्यांच्या कार्यामुळे झाली होती. केवळ गणितातच नव्हे तर खगोलशास्त्र आणि भाषाशास्त्र यासारख्या क्षेत्रांमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या योगदानाची आणि हे योगदान आजही संगणक विज्ञानासारख्या क्षेत्रात कसे लागू होते यावर त्यांनी चर्चा केली आहे.

अखेरीस, भारतातील हिंदू गणिताची परंपरा का आणि कशी संपुष्टात आली आणि आज बहुतेक लोकांना तिच्या इतिहासाबद्दल का माहिती नाही याचा शोध ते घेतात.

‘गणित’ हा एक विषय समोर ठेवत त्याची उत्पत्ती, विस्तार आणि वापर, विश्वसंचार आणि खंड पडलेली संशोधन परंपरा असे दस्तावेजीकृत ससंदर्भ माहिती एकत्र संकलित स्वरुपात प्रथमच या पुस्तकाद्वारे उपलब्ध केली जात आहे.

गेल्या काही वर्षात जगाला भारत जाणून घेण्याची एक विशेष उत्सुकता आहे असे दिसून येत आहे. पण जगाला भारत समजून घ्यायचा असेल तर आधी तो भारतीयांना समजावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि तोही स्व-बुद्धीने जाणून घ्यायला हवा. या दृष्टीने पुस्तकाची आखणी केली असून सर्वसामान्यांसाठीही सुबोध स्वरूपात आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमासही हे पुस्तक पूरक-संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.

भारतीय ज्ञान-परंपरेतून प्रसवलेल्या अनेक जीवनोपयोगी विषयांपैकी गणित, त्याच्या विविध उपशाखा भारताच्या कानाकोपऱ्यातून विकसित होत गेल्या आणि वापरात आल्या.

– – अंकगणितातील दशमान पद्धत, शून्य आणि ऋण संख्यांचा शोध आणि वापर

– – बीजगणित आणि भूमितीतील अनेक संकल्पना आणि सूत्रे 

– – संयोजन शास्त्रातील शोध आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर 

– – साहित्य निर्मिती आणि प्रसारास लागणारी भाषाविज्ञान आणि छंदशास्त्रातील नियमावली 

– – खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना, प्रयोगातील उपकरणे, ग्रह-गती-विज्ञान आणि यातून हजारो वर्षे वापरात असलेली अचूक कालगणना 

– – प्राचीन गणिताचे स्वरूप अधिकच विस्तारत आधुनिक गणिताचा गाभा असलेल्या कॅल्क्युलस संकल्पनांची गुरुवायूर मंदिराशी निगडित असलेल्या माधव आणि त्यांच्या शिष्य परंपरेतून झालेली रुजुवात आणि विकास 

– – अनेक गणितीय शोधांचे आधुनिक गणिताशी तुलना

– – प्राचीन भारतीय विज्ञानातील शोध-सिद्धता पद्दती 

– – प्रसिद्ध गणितज्ञ् आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कर – I, II आणि माधव यांचे संशोधन 

– – ख्यातनाम पाश्चात्य गणिती इतिहासकारांच्या नजरेतून भारतीय आणि समकालीन पाश्चात्य गणिताचे गुण – दोष विवेचन 

… असे अनेक विषय ससंदर्भ तसेच एकत्र संकलित स्वरुपात मांडणी असलेला सर्वसामान्यांसाठीही सुबोध वाटावा असा ग्रंथ !

– – – –

प्रतिक्रिया – – – 

“डॉ. भास्कर कांबळे यांनी प्राचीन भारतीय गणिताची केवळ तथ्यपूर्ण माहिती एकत्र केली आहे असे नव्हे, तर भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतून ते नैसर्गिकरित्या कसे प्रसवले, याचेही विश्लेषण या पुस्तकातून केले आहे. असे परस्पर-संबंध समजून घेतल्याने आपल्याला भविष्यातील वाटचालीस योग्य दिशा ठरविण्यास नक्कीच मदत होईल. ” 

पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक (निवृत्त), आय. आय. टी. कानपूर,

लेखक – ‘कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स’ 

“व्यापक, तरीही ह्या विषयातील तज्ञ नसणाऱ्यांसाठीही उपयुक्त.

श्री राजीव मल्होत्रा

लेखक आणि संस्थापक – इन्फिनिटी फाउंडेशन

“… नवीन दृष्टीकोन आणि अंतर्दृष्टी प्रदान करणारा भारतीय गणित साहित्यावरचा एक स्वागतार्ह ग्रंथ. “

एम. एस. श्रीराम माजी प्राध्यापक

(मद्रास विद्यापीठ),

भारतीय खगोलशास्त्र आणि गणितावरील पुस्तकांचे लेखक

“भारतीय परंपरेबद्दल सखोल समानुभूती आणि अभिमान बाळगून सु-संशोधन आणि सु-लिखित… पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी एक ग्रंथ”.

पद्मभूषण प्रा. व्ही. एस. राममूर्ती, अणुशास्त्रज्ञ 

आणि

प्रा. दिनेश कुमार श्रीवास्तव, प्राध्यापक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बंगळुरू

“भारतीय ज्ञानपरंपरेच्या शाखांमध्ये गणिताच्या मूलभूत तत्त्वांचे दस्तऐवजीकरण करून, गणिताच्या इतिहासाच्या निर्वसाहतीकरणाचे एक विद्वत्तापूर्ण कार्य. ” 

संक्रांत सानू

लेखक –  ‘द इंग्लिश मीडियम मिथ’

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments