श्री जगदीश काबरे
वाचताना वेचलेले
☆ “वैचारिक प्रतिबद्धता…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
लोकसत्तेत 2025 च्या नवीन वर्षापासून प्रख्यात विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनाच्या वाटचालीवर आधारित लेखमाला सुरू केलेली आहे. ती लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीमुळे अत्यंत वाचनीय झालेली आहे. कारण नेमक्या शब्दात डॉ सुनीलकुमार लवटे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आयुष्याची वाटचाल मांडत असतात. आज त्यांनी लिहिलेल्या ‘काशीतील उच्चशिक्षण’ या लेखातील हा महत्त्वाचा अंश आपल्याला नक्कीच माणसाने ज्ञानी होणे म्हणजे काय, शिक्षित होऊन वैचारिक प्रगल्भता अंगी आणणे कसे शक्य असते, हे स्पष्ट करेल. (संकलक JK)
प्राज्ञपाठशाळा, वाई येथील वेदाध्ययन पूर्ण करून सन १९१८ मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवी संपादनार्थ काशीस प्रयाण केले. तर्कतीर्थ पदवीसाठी न्याय, वेदांत, शाब्दबोध (व्युत्पत्तीवाद) यांचे अध्ययन आवश्यक होते. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ते वेगवेगळ्या शास्त्री-पंडितांकडे जाऊन पूर्ण केले. पैकी वेदांत त्यांनी पर्वतीयशास्त्री यांच्याकडे पूर्ण केला. न्यायाचे शिक्षण वामाचरण भट्टाचार्य यांच्याकडून घेतले. नव्यन्यायाचा काही भाग ते भंडारीशास्त्रींकडून न्यायाचार्य राजेश्वरशास्त्री द्रविड यांच्याकडे नव्यन्याय पूर्ण केला. ‘तर्कतीर्थ’ पदवी मिळाल्यावर ते काशीहून परत येऊन प्राज्ञपाठशाळेत अध्यापक झाले. अध्यापक म्हणून प्राज्ञपाठशाळेत तर्कतीर्थांनी नव्यन्याय, मीमांसा, व्याकरण शिकविले. ‘मीमांसान्यायप्रकाश’ ग्रंथाचे तर्कतीर्थांनी अनेकदा अध्यापन केले. पुढे वेदांताचेही अध्यापन केले. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे, पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांसारखे त्यांचे शिष्य पुढे संस्कृत पंडित म्हणून प्रसिद्ध झाले. तर्कतीर्थ पुढच्या काळात धर्मसुधारणा, समाजसुधारणा, स्वातंत्र्य चळवळीतील प्रबोधन, संघटनकार्यात व्यस्त झाले, तसे त्यांचे अध्यापन बंद झाले. त्यांनी अध्यापक पदाचा राजीनामा दिला, तरी ते प्राज्ञपाठशाळेत अन्य कार्याने संलग्न राहिले.
तर्कतीर्थांनी नंतरच्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाच्या बरोबरीने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यातून त्यांच्यातील पंडित उदारमतवादी आणि आधुनिक बनत गेला. सर्वधर्म अभ्यासाने त्यांना वैश्विक बनवले. ‘हिंदुधर्म समीक्षा’ ते ‘सर्वधर्मसमीक्षा’ असा त्यांचा लेखनप्रवास असो वा ‘आनंदमीमांसा’ आणि ‘जडवाद अर्थात् अनीश्वरवाद’सारखे प्रबंध लेखन असो, त्यातून तर्कतीर्थ धर्मनिरपेक्ष होत गेले! नित्य स्नान-संध्या करणारा हा धर्मपंडित जीवनाच्या एका वळणावर कर्मकांडमुक्त होतो ते ज्ञानाचे सत्य रूप गवसल्यामुळे. पत्नी सत्यवतीने एकदा ‘देव पारोसे राहतात पूजेअभावी’ असे म्हटल्यावर, तर्कतीर्थ देव्हाऱ्यातील सर्व देव, टाक आणि मूर्ती कृष्णार्पण करतात. अनेक वर्षांच्या संस्कारांतून निरीच्छपणे मुक्त होणे, हे प्रखर बुद्धिवादी विचार आणि कृतीनेच शक्य असते. नास्तिक म्हणवून घेणाऱ्यांनाही जी गोष्ट अशक्य वाटे, ती तर्कतीर्थ केवळ वैचारिक प्रतिबद्धतेमुळे (करेज ऑफ कन्व्हिक्शन) करू शकले. देव, धर्म, पूजा, इ. सर्व गोष्टी या मूलत: भाव आणि श्रद्धेचे आंतरिक विषय होत. आपण ते प्रतीक, पूजा नि कर्मकांडात अडकवलेत. ज्ञान, सत्य ही तत्त्वे उमगली की मग ती जीवनमूल्ये व जीवनशैलीची अंगे बनतात, बाकी सर्व मग शून्य ठरते.
लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे
माहिती संग्राहक व प्रस्तुती : जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈