सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ देह बोलतो… ☆ सुश्री शीला पतकी ☆
तुम्हीच तोंड दाबून बसल्यावर बोलणार कोण?.. तुम्ही बोलल्याशिवाय होत नाही म्हणजे बोलणे.. वाचा.. यावर आपल्या भावना व्यक्त होणे अवलंबून आहे या गोष्टीचा विचार केला तेव्हा लक्षात आले फक्त वाचा, वाणी, जीभ हीच बोलण्याची साधने नव्हेत आपले संपूर्ण शरीर खरंतर बोलत असते त्याचीच काही उदाहरणे पाहू….
पाहिलंत का तिच्या कपाळावर आठी चढली लगेच म्हणजे… ना पसंती कपाळावर दाखवता येते. तिने नाक कसे मुरडले पहा… ना पसंती दाखवली !नाक जरा वर ओढून घेतले काय चालले ते पसंत नाही मला! ओठ विलग होऊन किंचित हास्य आले.. आवडले किंवा संमती! हसून हसून बेजार झालो.. आनंद !गाल फुगले.. रुसवा !मान उभी हलली.. होकार !मान या कानापासून त्या कानापर्यंत आडवी हलली.. नकार ! मान किंचित झुकवली, आदर !छाती पुढे काढून चालणे.. रुबाब !ऊर बडवून घेणे.. दुःख !पाठीवर थाप.. प्रोत्साहन! मुठी एकत्र करणे आणि हात उंचावणे.. निश्चय !हात हलवणे निरोप देणे! दोन्ही हात वर घेऊन चालत येणे.. शरणागती! दोन्ही हाताने टाळ्या वाजवणे.. आनंद व्यक्त करणे !अंगठा दाखवणे.. चिडवणे किंवा ध्येय साध्य झाले असे सांगणे! करंगळी दाखवणे…. *मी सांगायला नको) एकमेकांच्या हातावर हात देऊन टाळी देणे.. सहमती दर्शक आनंद !हाताने दंड थोपटून दाखवणे, ताकद किंवा बळ !गुडघ्यावर रांगत येणे… शरणागती !एकच पाय विनाकारण हलवणे.. अस्वस्थता! लाथ मारणे.. रागाचा परिपाक खूप रागावणे !लाथा बुक्क्यांनी मारणे प्रचंड राग!! कमरेत वाकणे… मान देणे !साष्टांग दंडवत.. सन्मानदर्शक भक्तीपूर्वक नमस्कार !आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे… डोळे बारीक करून पाहणे म्हणजे काय चालले याचा अंदाज घेणे!.. डोळे तिरके करणे.. साशंक !डोळे ओले होणे आनंद किंवा भावूक होणे ! डोळे लाल होणे.. संताप !डोळ्यातून घळाघळा अश्रू येणे.. दुःख !डोळे मिटून घेणे.. शांतता !डोळे वटारणे.. धाक, भीती दाखवणे !डोळ्यात कोणताच भावना न दाखवणे.. निर्वीकारिता! भुवया उंचावणे.. प्रश्नचिन्ह???! गाल लाल होणे.. लाजणे !नजर खाली अंगठ्याने जमीन उकरणे आणि बोटाला पदर गुंडाळणे.. लाजेने भिजून जाणे! चेहरा वेडा वाकडा हातवारे डोळे मोठे.. भांडण!( नळावर याचा अनुभव येतो) मान वर न करणे.. विनय व आज्ञाधारकता !थरथर कापणे.. संताप किंवा भीती! जीभ बाहेर काढून दाखवणे.. वेडावणे! मांडीवर एका हाताने थापटणे.. ये तुला बघतोच म्हणणे !दात विचकून दाखवणे… चिडवणे! दोन्ही हाताने समोरच्याला कवेत घेणे.. प्रेम व्यक्त करणे !पाठ फिरवणे.. ती गोष्ट आवडली नाही हे सांगून तिच्यापासून दूर जाणे.. ! या आणि अशा अनेक घटकांच्या हालचाली मधून आपले संपूर्ण शरीर बोलत असते खर तर आपला देह आपले मन आपले हृदय सारेच बोलत असते पण ती भाषा समोरच्या व्यक्तीशी आपण जितके तादात्म्य पावतो तेवढी त्यालाच कळते एकूण हा भाषेचा थोडासा अभ्यास आपल्यासमोर ठेवला आहे देह बोलतो या सदराखाली आपण विचार करा अजून कदाचित काही गोष्टी सापडतील लेख आणि कल्पना आवडली असेल तर लिहा काहीतरी
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈