श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ मन सैतानाचा हात ☆ श्री सुहास सोहोनी

मन सैतानाचा हात —

मन देवाचे पाऊल —

 🌿

मन उफराटे झाले वाघुळ

उलटे लोंबतसे

म्हणे परि माजून, जगत हे

उलटे झाले कसे…

 *

छतास उलटे लटकुन, म्हणते

पशु, पक्षि, माणसे

शीर्षासन कां करुन चालती

धावति, उडती तसे…

 *

काय म्हणावे या मूर्खाला

झाली का बाधा

कोणी धरिले या झाडाला

भूत, प्रेत, समंधा…

 *

देव राक्षसा जखडुन टाकिन

नित्य करी दर्पोक्ती

बलाढ्य आणिक बुद्धिमान मी

अतुल्य माझी शक्ती

 *

शेफारुनिया गर्व चढे कां

मनास उन्मत्त

कोणी मजसम नाही दुसरा

म्हणा कुणीहि प्रमत्त…

उचलुनिया खांद्यावर घ्या रे

मीच लाडका खरा

टाळ मृदुंगा बडवुनि माझा

जयजयकार करा

 *

तोच दुरूनी रेड्यावरुनी

आला यमधर्म

देह न्यावया यमलोकांसी

जैसे ज्याचे कर्म…

 *

यमास बघता थरथरले मन

सैरभैर झाले

देहासंगे मृत्यु मनाचा

ज्ञान जुने स्मरले

 *

साक्षात मृत्यू समोर येता

मनासि फुटला घाम

पोकळ दावे वितळून गेले

मनी उमटला राम…

 *

बलशाली किति झालो तरिही

जन्म नि मृत्यू कुठले

नाहि कधी कक्षेत माझिया

कळुन मला चुकले…

 *

फुटला फटकन् फुगा भ्रमाचा

झाला चोळामोळा

नियती पुढती तनमन दुर्बल

जसा मातिचा गोळा…

🌺

मन राखावे सदा जसे की

पवित्र निर्मळ गंगा

मनामधूनी नित्यचि गावे

विठुच्या गोड अभंगा…

🌺

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments