श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “ओळख…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
ओळख असणं आणि ओळखत असणं यातलं अंतर म्हणजे एक प्रवास आहे. हा एकमेकांनी सोबत करावा लागतो. या प्रवासात येणारे अनुभव, यात आपसात झालेली अनेक गोष्टींची देवाणघेवाण, वागणं, चालणं, बोलणं, विचार, आवडनिवड, व्यवहार यावरून आपण केलेले तर्क, आणि त्यावरुन घेतलेला निर्णय, या सगळ्या गोष्टींवरून ओळख असणं इथून सुरू झालेला प्रवास ओळखत असणं इथे थांबतो.
ओळख हि सुरुवात आहे. तर ओळखण याचे बरेच टप्पे आहेत. लहान मुलांना सुध्दा सुरुवातीला ओळख लागते. आणि ओळख झाली की मग ते ओळखायला लागतात.
ओळख निर्माण व्हायला काही कारण असावं लागतं. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींनी ओळख होते. आणि ओळखत असण्यात याच छोट्या छोट्या गोष्टींचा काही प्रमाणात, काही बाबतीत विस्तार असतो.
ओळख करावी का? दाखवावी का? असा संभ्रम ओळखीच्या सुरुवातीला असू शकतो. पण ओळखत असल्यावर बऱ्याच गोष्टीत आपलं स्पष्ट मत आणि ठाम निर्णय सांगू शकतो.
ओळख असणं आणि ओळखत असणं हा एक अभ्यास आहे. या अभ्यासाची सुरुवात सुध्दा इतर विषयासारखी तोंडओळख झाल्यावर सुरू होते. काही भाग समजायला सोपे आणि सहज वाटतात. तर काही भाग समजून घ्यावे लागतात. तर काही लक्षात सुद्धा येत नाहीत.
एखाद पुस्तक नुसतं चाळणं, आणि ते व्यवस्थित वाचणं यात जेवढा फरक आहे, तेवढाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात आहे.
एखादा श्लोक किंवा स्तोत्र पाठ असणं म्हणजे ओळख असणं, तर त्याच्या शब्दाच्या अर्थासह तो, का? केव्हा? कसा म्हणावा…. हे माहिती असणं म्हणजे ओळखत असणं.
जवळपास सगळ्याच कार्यक्रमात प्रमुख पाहूण्यांची ओळख करून दिली जाते. बरेच जण त्यांना ओळखत असतात, तरीही ओळख करून देतांना काही विशेष गोष्टींवर भर दिला जातो. ज्यामुळे त्यांची ओळख नव्याने होईल असा प्रयत्न असतो.
एखादी गोष्ट, व्यक्ती, संस्था, वस्तू या सगळ्यांच्या बाबतीत ओळख असणं ते ओळखत असणं असा संबंध असतो. आणि ओळख जशी वाढत जाईल, तसं काही बारकावे समजतात आणि मग आपण ओळखायला लागतो.
ओळख असण कदाचित एकांगी असेल, पण ओळखण हे एकांगी नसतं, नसावं. ओळखण्यात अनेक गोष्टी, पैलू, आवड, सवयी, आणि मुख्य म्हणजे व्यवहार माहिती असतात किंवा माहिती असावे लागतात.
ओळख असणं याच रुपांतर ओळखत असण्यात होतं तेव्हा एकमेकांबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला असतो. आणि या विश्वासावरच ते ओळखत असणं किती काळ टिकेल हे ठरतं.
ओळख असण्यात सुखदुःखाची विचारणा असते. पण त्याच सुखदुःखाची जाणीव मात्र ओळखत असण्यात असते.
जेवणाच्या पानात अनेक पदार्थ असले तरी त्यांचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं, आणि ते किती असावेत याच सुध्दा एक प्रमाण असतं. तसंच स्वभावात सुध्दा अनेक गोष्टी, वैशिष्ट्य असतात आणि स्वभावातली हि वैशिष्ट्य कोणती, आणि किती आहेत हे ओळखता आली तरच आपण म्हणतो, मी ओळखतो……….
अगोदर ओळख असणं आणि ओळखत असणं या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध असायचा. पण आधुनिक काळात आणि वेगवेगळ्या साधनांमुळे बऱ्याच जणांशी आपली ओळख असते. पण आपण एकमेकांना ओळखत मात्र नसतो. त्यामुळे एकमेकांचा सहवास नसला, काही चांगले वाइट अनुभव आले नाही तरीही ओळख असू शकते. पण ओळखत असायला सहवास आणि अनुभव गरजेचे असतात.
कदाचित याच कारणामुळे ओळख असणं ही संकल्पना विस्तारित आणि संकुचित दोन्ही अर्थांनी असते. फेसबुक, व्हाॅटस्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यामुळे आपण प्रत्यक्ष न पाहिलेल्या आणि बऱ्याच लांबच्या लोकांनाही ओळखतो.
पण चार घरं सोडून पलिकडे कोण राहत यांना मात्र आपण ओळखत नाही. या ओळखण्यात, कोण? वयस्कर व्यक्ती आहेत का? त्यांना कशाची गरज, मदत लागते का? अशा खूप गोष्टींचा संबंध आहे…..
एखादी गोष्ट नुसती बघणं, आणि खरेदी करण्यासाठी बघणं यात जितका फरक असतो तितकाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात असू शकतो.
ओळख असण्याच ओळखत असण्याच्या प्रवासात काही टप्पे, पायऱ्या असतात. या व्यक्ती, स्वभाव, आवडनिवड, जमवून घेण्याची पद्धत, विश्वास, त्याग यावर अवलंबून असतात. आणि गरजेनुसार त्या कमीजास्त असू शकतात.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈