प्रा. भरत खैरकर
🌸 मी प्रवासी 🌸
☆ महाकाय कुंभलगड ☆ प्रा. भरत खैरकर ☆
बनास नदीच्या काठावर वसलेलं हे माउंट आबू हिल स्टेशन.. खूप दिवसापासून माउंटआबूबद्दल ऐकलं वाचलं होतं.. अरवली पर्वतरांगात वसलेलं माउंट आबू हे सर्वात उंच शिखर!
भारतात उत्तरेला हिमालय.. दक्षिणेला निलगिरी आणि मध्यभागी अरवली म्हणजेच माउंट आबू आहे! तलहाथीवरून गाडी वळणवळण घेत माउंटआबूवर म्हणजे अरवली पर्वत रांगातून चालली होती. अप्रतिम सौंदर्य!
आम्ही सरळ ‘गुरुशिखर’ साठीच निघालो. तिथलं सर्वात उंच ठिकाण! सकाळी सकाळी ह्या ठिकाणी पोहोचल्याने गर्दी जमायला जेमतेम सुरुवात झाली होती. गाडी पार्क करून आम्ही भराभर पायऱ्या चढून दत्ताच दर्शन घेतलं. तिथल्या प्राचीन घंटेचा स्वर आसमंतात निनादला.. फोटो काढले आणि खाली आलो तर एवढ्या वेळात इतकी गर्दी झाली की गाडी काढायला जागा नाही. लोक वाटेल तशा गाड्या पार्क करून गुरुशिखरावर गेले होते. वर येणाऱ्या गाड्यांची अजूनच त्यात लगीनघाई चालली होती. मी शिताफीने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. अवघ्या अर्ध्या तासात पाच-सहा किलोमीटर लांब ट्रॅफिक जाम झालं होतं. आम्ही पटकन खाली येऊन गेलो, नाहीतर पुढचं सारं शेड्युल बिघडलं असतं.
वाटेवरचं दिलवाडा टेम्पल बघितलं. तिथे असलेल्या कल्पवृक्षासह फोटो काढले. दिलवाडा मंदिर हे संपूर्णपणे संगमरवरात बनविलेले उत्कृष्ट वास्तू रचना असलेले जैन मंदिर आहे. अकराव्या शतकात बांधलेलं हे मंदिर जैन लोकांशिवाय इतरांसाठी दुपारपासून सायंकाळी सहा पर्यंत खुलं असतं. जैन लोकांच्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रामध्ये याचा समावेश होतो.
तिथून आम्ही ‘नक्की लेक’ला गेलो. तोवर चांगलीच गर्दी वाढली होती. आम्ही नक्की लेक बघितला. तिथे राजस्थानी ड्रेसवर फोटो काढता येत होते.. सर्वांनी आपापले ड्रेस निवडले.. राजस्थानी ड्रेस वर फोटो सेशन झालं. फोटो मिळायला अर्धा तास असल्याने पुन्हा नक्कीलेकवर टाईमपास केला. मेहंदी काढली.. नचिकेतसाठी उंदीर आणि टमाटर हे खेळणे घेतले.. जोरात फेकून मारले की ते पसरायचे व परत हळूहळू ‘टर्मिनेटर’ सारखे मूळ आकार घ्यायचे.. खूपच मजेशीर होते! खेळणी बनविणाऱ्याच्या कल्पनाशक्तीच कौतुक वाटलं! मुलांना काय हवं, त्यांना काय आवडेल हे अचूक हेरणारे ते डिझायनर असतात.
आम्ही फोटो घेऊन माउंटआबूवरून खाली तलहाथीला आलो.. तिथे प्रजापिता ब्रह्मकुमारी यांचा आश्रम आहे.. तेथील कार्यकर्त्याने कार्य समजावून सांगितले.. वेळ कमी असल्याने मिळाला तो ‘गुरुप्रसाद’ घेऊन आम्ही कुंभलगडकडे रवाना झालो.. लांबचा पल्ला होता..
रानकापूर फाटा उदयपूरहून जोधपुरला जाणाऱ्या हायवेवर आहे. म्हणजे उदयपूर साईडला आपणास जावं लागतं. त्या रस्त्यावर भरपूर सिताफळाचे बन आहे. आजूबाजूच्या गावातली शाळकरी मुलं वीस रुपयाला टोपलीभर सीताफळ विकत होती. हायवेला असल्याने लोकही गाड्या थांबवून सीताफळ घेत होती. रस्ता खूपच मस्त होता.. ट्राफिक मात्र काहीही नव्हते.. कुंभलगड रानकापूर फाटा आला. सुरुवातीला कुंभलगड बघून घ्यावा म्हणून रानकापूर डावीकडे सोडून आम्ही सरळ कुंभलगड कडे निघालो..
हा रस्ता खूपच खराब होता.. शिवाय मध्येच गाडीच्या टपावर बांधलेली ताडपत्री उडाली.. घाटात गाडी थांबवून ती बांधून घेतली.. मध्ये एक शेतकरी राजस्थानी पद्धतीच्या मोटने शेताला पाणी देत होता.. ते बघायला गाडी थांबविली. एक छोटीशी क्लिप तयार केली. फोटो घेतले. मोटेचा जुना मेकॅनिझम बघून फार छान वाटलं.. अजूनही कुंभलगड यायचं नाव घेत नव्हता.. म्हणजे खूप दूर होता. अंतर जवळचं वाटायच पण नागमोडी आणि जंगलचा बिकट रस्ता शिवाय हळूहळू होणारा सूर्यास्त यामुळे खूप वेळ झाला की काय असं वाटायचं.. एवढ्यातच गाडीचा मागचा टायर बसला!
पूर्ण गरम झालेला टायर रस्त्यावरील खाचखडग्याने व अती घाई ह्यामुळे तापला व फाटला होता! आता जंगलात फक्त आम्हीच आणि सामसूम! भराभर मागच्या बॅगा काढून स्टेफनी काढली. चाकाचे नट काही केल्या ढिले होईना! गरम होऊन ते जाम झाले होते. शिवाय स्पॅनर ही स्लिप होत होता. गाडी चालवायला मस्त पण प्रॉब्लेम आल्यावर सगळी हवा ‘टाईट’ होते.
तेवढ्यात एक इनोव्हा मागच्या बाजूने दोन फॉरेनर टुरिस्टना घेऊन आली. तिला थांबण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली. ड्रायव्हर तरुण पंजाबी मुलगा होता. कुठल्यातरी फाईव्ह स्टार हॉटेलमधील फॉरेनर टुरिस्टला कुंभलगड, रानकापूर आणि जंगल सफारी करण्यासाठी साठी घेऊन जात होता. त्याने पंधरा-वीस फुटावर गाडी थांबवली. त्यातील परदेशी पाहुण्यांना विचारून त्याने पंधरा मिनिटे मागितले. पटकन त्याचा ‘टूलबॉक्स’ त्याने काढला. सुरुवातीला त्यालाही नट हलेना! मग त्याने त्यावर पाणी टाकायला सांगितले. गरम झाल्याने एक्सपांड झालेले नट.. थंड झाल्यावर पटकन खोलल्या गेले. मग आम्ही आमची स्टेफनी टाकून गाडी ‘ओके’ केली. त्याचे आभार मानले. तोवर बऱ्यापैकी वेळ झाला होता. पण संकट टळल होतं. निदान आम्ही आमच्या गाडीत होतो. जंगलातून बाहेर पडू शकत होतो. किंवा शेजारच्या कुठल्यातरी गावात जाऊ शकत होतो. भगवंताने मदतीला पाठविलेला तो पंजाबी मुलगा आम्ही आयुष्यभर विसरणं शक्य नाही!
शेवटी कुंभलगडला आम्ही पोहोचलो. तो भव्य दिव्य किल्ला बघून डोळे दिपले. महाराणा कुंभाने बांधलेला हा गड.. त्याचे बुरुज कुंभाच्या म्हणजे मोठ्या मडक्याच्या आकाराचे म्हणून हा कुंभलगड! इथे जंगल सफारी व व्हिडिओ शो पाहता येतो. ह्या किल्ल्यावर बादलमहल, सूर्य मंदिर, भव्य परकोट, मोठमोठे कुंभाच्या आकाराचे बुरुज आहेत. एवढा भव्य किल्ला शाबूत अवस्थेत अजून पर्यंत आम्ही पाहिला नव्हता. इथे रात्री गडाची माहिती देणारा शो असतो. तो पर्यटकांमध्ये नवीन उत्साह भरतो. अरवली पर्वतरांगांच्या पश्चिमेकडे हा किल्ला आहे. उदयपूरपासून अंदाजे ८४ किमी अंतरावर असलेला हा किल्ला राणा कुंभाने १५ व्या शतकात बांधला आहे. कुंभलगडची भिंत ३८ किलोमीटर पसरलेली, जगातील सर्वात लांब अखंड भिंतींपैकी एक आहे. मेवाडचे महाराणा प्रताप यांचे हे जन्मस्थान आहे. भराभर फोटो काढले. जमेल तेवढा डोळ्यात साठवून घेतला. आतुर नेत्रांनी त्या किल्ल्याचा निरोप घेतला. कारण रानकापूर गाठायचे होते.
बऱ्यापैकी अंधार झाला होता. जंगलची रात्र होती. पण पुन्हा एवढ्या बिकट वाटेने आम्ही रानकापुर कडे निघालो होतो. एक वेळ वाटलं की इथून पुढे आता काहीच असणार नाही. ‘हेअर पीन टर्न’ एवढा शार्प होता की थोडा जरी बॅलन्स गेला तरी गाडी उलटणार.. पण आमचा ड्रायव्हर अमोलच.. त्याच्या वयाच्या मानाने ड्रायव्हिंग स्किल अप्रतिम होतं.. त्याने सही सलामत त्या अंधाऱ्या जंगलातून गाडी बाहेर काढली.. तर आम्ही रस्ता चुकलो!.. उजवीकडे जाण्याऐवजी डावीकडे लागलो.. पाच-सहा किलोमीटर गेल्यावर काहीतरी चुकतंय.. असं वाटलं.. पण विचारणार कोणाला? तेवढ्यात समोरून एक कार येताना दिसली. त्यांना थांबून विचारल्यावर त्यांनी सांगितले, ” तुम्ही उदयपूरकडे चाललात.. उलट जा किंवा आमच्या मागे या. ” मग आम्ही गाडी वळविली. आठ दहा किलोमीटर त्यांच्या मागे गेल्यावर आम्हीच मग पुढे निघालो.. शेवटी ‘सादरी’ गावातून रानकापूर या ठिकाणी आलो.. तेव्हा रात्रीचे साडेसात वाजले होते. जैन मंदिर असल्याने अशा अवेळी ‘उघडे’ असण्याची शंकाच होती. पण देवाच्या कृपेने आरती सुरू होती.. भगवान महावीरांना मनोमन नमस्कार केला व बिकट प्रसंगात वाट दाखविली म्हणून आभार मानले. दर्शन झाल्याने फार आनंद झाला रात्री दिव्यांच्या उजेडात मंदिराची भव्यता दिसत नव्हती पण जाणवत होती. दिवसाच बघावं असं हे जगातलं सर्वात सुंदर जैन मंदिर वर्ल्ड हेरिटेजचा भाग आहे. पण रात्री बघावं लागलं..
पंधराव्या शतकात राणा कुंभाने दान केलेल्या जागेत बांधलेलं हे कोरीव मंदिर खूपच सुंदर आहे. ४८००० चौरस फुटामध्ये पसरलेलं आहे. जैनांच्या जगातल्या पाच मंदिरांपैकी ते एक आहे. मंदिराला २९ खांब किंवा पिलर असलेला गाभारा आहे. मंदिराला एकूण १४४४ कोरीव स्तंभ आहेत. पण एकही स्तंभ एक दुसऱ्या सारखा नाही. मुख्य चौमुख मंदिरात आदिनाथाची मूर्ती आहे. जे प्रथम जैन तीर्थकर होते. हेही नसे थोडके.. म्हणून आम्ही मंदिरा बाहेर पडलो.
आता मुक्काम कुठे करावा? कारण आजचा मुक्काम जोधपुरला होता. जे इथून 130 किलोमीटरवर होतं आणि रस्ता तर असा.. पण तीस किलोमीटर नंतर ‘एन एच ८’ लागणार होता. तिथवर जावं मग जोधपुर गाठता येईलच हा विचार आला.
रणकापूरला आम्हांला पुण्याजवळील रांजणगावच्या तरुण मुलांचा एक ग्रुप भेटला. त्यांनाही जोधपुरला जायचे होते. पण एवढ्या रात्री अनोळखी रस्त्याने एका मागे एक आपण तिन्ही गाड्या काढू, असं त्यांनी सुचवलं.. त्यानुसार दहा-बारा किलोमीटर अंतरावर गेल्यावर ते दुसऱ्या रस्त्याने निघाले.. आम्ही दुसऱ्या.. अर्ध्या तासानंतर फोन केल्यावर ते पालीला हायवेला टच होणार होते. आम्ही अलीकडेच हायवेला टच झालो होतो.. ठीक झालं.. आलो एकदाचे हायवेवर.. अन् सुरू झाला जोधपुर कडे प्रवास! रात्री बारा वाजता घंटाघर ह्या जोधपूरच्या प्रसिद्ध भागात आम्ही पोहोचलो. सगळीकडे सामसूम.. गल्लीबोळातून गाडी हॉटेलच्या दिशेने चालली होती.
“कहा जाना है? चलो, हम हॉटेल दिखाते है” म्हणून जवळपास अंगावर आल्यासारखे दोन तरुण बाईकवर आमच्या गाडीपाशी आले. ते बराच वेळ गाडीचा पाठलाग करत होते. असं लक्षात आलं.. दरम्यान बरेचशे सीआरपीएफचे जवान गल्लीबोळात रायफलसह उभे होते.. असे भारतीय जवान मी काश्मीरमध्ये श्रीनगरला बघितले होते. वाटलं इथे सेन्सिटिव्ह एरिया असावा.. तरी हिंमत करून त्यातल्या एकाला विचारलं की “हॉटेल खरंच इकडे आहे कां?” तर तो “असेल. ” म्हणून मोकळा झाला.. ती दोघं मात्र त्यांना भीकही घालत नव्हती. मग एका जागी अरुंद मोड आली. गाडी पुढे नेता येईना!. मग “ईथेच गाडी थांबवा. माझ्यासोबत तुमच्यातला कोणीतरी या, हॉटेल दाखवीतो. ” म्हटल्यावर मी उतरलो. म्हटलं बघू करतात तरी काय? किंवा काय होईल? तेवढ्यात माझा एक सहकारीही गाडीतून उतरला. आम्ही एका हॉटेलच्या बंद दरवाजावर पोहोचलो. आत गेट उघडून गेलो तर मंद मंदसा प्रकाश.. हॉटेल सारखं काही वाटतच नव्हतं.. जुन्या वाड्यात आल्यासारखे वाटले.. फोन केला.. तर हॉटेल मालक फोन घ्यायला तयार नाही.. खूप वेळाने कसं बस त्याने एका नोकराला खाली पाठवलं.. त्या नोकरासोबत ते दोघेजण बोलले.. ” हमने लाया है!” वगैरे.. मग लक्षात आले की हे “दलाल” आहेत.. वर गेलो तर मालक पूर्ण टल्ली होता.. म्हणजे दारू पिऊन मग्न होता.. शिवाय अर्ध नग्नही होता.. चार फॉरेनर मुलं मुली आणि हा मालक एकमेकांशी अश्लील चाळे करत होते.. मला बघून “कमॉन सर!” म्हणत ते फॉरेनर आवाज देत होते.. माझं डोकं सटकलं.. पण मी सावरत मालकाला म्हटलं
“अरे, हमारा रूम किधर है?” तर तो म्हणाला, ” यहा पर कमरा वगैरे नही है !लेकिन मैने मेरे दोस्त को बोला है उसके हॉटेल मे आप रह सकते हो. ” असं म्हणत त्याने आपल्या नोकराला आमच्याबरोबर पाठविले.. नशीब!
परत गाडीजवळ येऊन त्याला गाडीत बसवून बाजूच्या गल्लीत असलेल्या हॉटेल ‘किंग्स रिट्रीट’ मध्ये आम्ही आलो.. तिथल्याही नोकरालाही धड माहिती नव्हती.. त्याने दार उघडलं. मग त्याने एका मोठ्याशा हॉलमध्ये आम्हांला सामान ठेवायला सांगितले.. हॉटेलमध्ये सगळीकडे फॉरेनर होते.. मिळाली एकदाची रूम.. आता रात्रीचे दीड वाजले होते.. गल्लीत गाडी दाबून लावली.. आणि झोपलो.. राजस्थान टूरच्या पहिल्याच दिवशी.. एकाच दिवसात आलेला खूप मोठा हा जीवनानुभव होता.. माणसांची किती प्रकारची रूपं आज आम्ही बघितली होती.. तरीही ‘रात गयी बात गयी’ म्हणून झोपी गेलो.
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈