सुश्री शीला पतकी
🌸 विविधा 🌸
☆ “शाळा सुटणारी मुले अर्थात गळती…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
दहावी काय कोणत्याही टप्प्यावर नापास झाले की मुले शाळा सोडतात पालकांना काहीच प्रॉब्लेम नसतात कारण दहा वर्षाचा मुलगा चहाच्या गाडीवर काम करून रोज शंभर रुपये मिळवतो शिवाय त्याचा चहा नाश्ता तिथेच चालतो म्हणजे तो खर्च नाही झोपडपट्टीतल्या पालकाकडे शंभर रुपये रोज मुलामुळे मिळतात मग ही मुलं शिक्षण नाही योग्य मार्गदर्शन नाही नको त्या वयात पैसा हातात त्यामुळे व्यसनाधीन होऊन बिघडतात
दुसरा मुद्दा म्हणजे आता सर्वच पालकांना इंग्रजी माध्यमाचे वेड लागले आहे. ऐपत नाही आर्थिक, घरामध्ये कोणतेही वातावरण नाही आणि सगळ्या घराने राबून विनाकारण एका मुलासाठी इंग्रजी माध्यमाचे पैसे भरत बसायचे.. त्याला ते झेपत नाही तो एखाद्या तुकडीत वारंवार नापास होतो आणि शाळा सुटते ती कायमची.. !या सगळ्यावर सरकारने एकच उपाय काढला तो म्हणजे नापासच करावयाचे नाही! त्यामुळे शिक्षणाचा स्तर खालावला परीक्षाच नाही म्हणल्यावर मुले कशाला अभ्यास करणार? शेवटी परीक्षा हा एक धाक होता.. मुलांनी अभ्यास करायला तोच मुळी संपला. शिक्षकही निवांत झाले… पण आम्ही शिकवत होतो त्यावेळेला एक मार्कही वाढवून देत नसू त्यामुळे मुलांना कसून तयार करून घेणे आणि आपल्या वर्गाचा निकाल उत्तम लावणे हे आमचे कामच होते पहिल्या वर्षी जेव्हा चौथीतल्या नापास मुलांनाही पाचवी ढकलण्यात आल तेव्हा माझ्या असे लक्षात आले की सहावीत आल्यावर या मुलींना वाचता येत नव्हते लिहिता येत नव्हते शेवटी मी त्यांचा एक स्वतंत्र वर्ग पाच तुकड्यातून तयार केला आणि त्या वर्गाला पूर्ण पहिली टर्म फक्त लिहायला आणि वाचायला शिकवायचे प्रत्येक शिक्षक आणि मग मराठीचा असो इंग्रजीचा असो गणिता चा… गणित शिक्षकाने पाढे पक्के करून घ्यायचे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया शिकवायच्या. इंग्रजी शिक्षकाने एबीसीडी आणि काही शब्द स्पेलिंग साठी त्यांना दिले होतेते शिकवावयाचे आम्ही हे सिल्याबस अभ्यास करून तयार केले होते परिणाम असा झाला की सहावीच्या दुसऱ्या सत्रात ही मुले अभ्यासू तर झालीच आव्हान स्वीकारायला तयार झाली. आपल्यासाठी कोणी विशेष राबत आहे या भावनेने प्रेरित झाली! पालकांची सभा घेऊन त्यांनाही वेळीच जाणिव दिली तेही थोडे बहुत सतर्क झाले आणि शेवटी या वर्गाचा निकाल शंभर टक्के आणि उत्तम लागला केवळ दहावीला प्रयत्न करून चालत नाही हे शिक्षकांना कोण सांगणार?( त्या नाही शिक्षणाचे फालतू कामे आहेतच आणि त्याचा ताणही आहे )पण असे काही वेगळे होण्यापेक्षा 35 पर्यंत आणून त्या मुलाला पास करण्याचा सपाटा बोर्डाने चालवलाच आहे वीस मार्गाच्या कुबड्या दिल्या मग उरले किती पंधरा मार्क.. पेपरच असे काढले की प्रश्नपत्रिकेच्या पहिल्याच पानात त्याला 15 मार्क पडतात. दहावीच्या परीक्षेला प्रश्न गाळलेल्या जागा, जोड्या लावा, वेगळा घटक ओळखा अशा फुटकळ प्रश्नांनी त्याला सहजच 20 मार्क मिळू लागले परीक्षकांचे कष्ट वाचले… नाहीतर परीक्षकांना सूचना 15 पर्यंत आलेल्या मुलाला वीस पर्यंत आणा वीस पर्यंत आलेल्या मुलाला 25 पर्यंत न्या आणि मग मॉडरेटर पर्यंत त्या मुलाला 35 मार्क मिळून जातात ही वाढवा वाढवी झाल्यामुळे मुलाला प्रत्यक्षात काहीही येत नाही आणि आपण स्वतःची त्या मुलाची पालकांची शाळेची आणि एकूण समाजव्यवस्थेची फसवणूक करीत आहोत. याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक टप्प्यावर उत्तम समुपदेशक हवेत नेमके काय खरे आहे याची जाणीव त्या विद्यार्थ्याला झाली पाहिजे त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे त्याला त्याला वेगवेगळ्या लोकांच्या कथा सांगितल्या पाहिजेत नकारातून स्वीकाराकडे कसे जाता येते या वाटा त्यांना कळल्या पाहिजेत आम्ही आपलं काहीच करीत नाही 35 मिनिटांचा तास संपला की शिक्षकांचे त्या वर्गाप्रती काही देणे लागत नाही शिक्षक फक्त जबाबदार आहेत असे नाही पालक विद्यार्थ्यांना रोज शाळेत पाठवत नाही हे दुःख आहे मग कधी मध्ये शाळेत येणारे विद्यार्थी शाळेत रमत नाही बर शाळेत सगळेच फुकट मिळत असल्याने पालक राखोळी घातल्यासारखा विद्यार्थी शाळेत पाठवतात विद्यार्थ्यांनाही सगळे फुकट मिळत असल्यामुळे कसलीच जाण नाही पालकांच्या खिशाला तोशिष पडत नाही त्यामुळे शाळा म्हणजे गंमत झाली! शाळेमध्ये सध्या फक्त नाच गाणे चालू आहे कॅसेट लावून नाचणे नाटक तर संपतच आले नवीन क्रिएटिव्हिटी ला वाव नाही स्वतः काही लिहत नाहीत विज्ञानाला तर काहीच व्हॅल्यू नाही मुळात विज्ञान शिक्षक विज्ञान दृष्टिकोन असणारा असत नाही खेडेगावात तर अंधश्रद्धा दूर करा असे सांगणारे शिक्षक नवस फेडायला रजा घेऊन निघालेले दिसतात हे दुर्दैव आहे.. याच्या वरती विचार करायला कमिट्या ह्या थोरामोठ्यांच्या त्यात अनुभवी शिक्षकांचा समावेश नसतो त्यामुळे तोडगे भलतेच निघतात आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे शिक्षणाने धड माणूस घडत नाही धड कर्मचारी घडत नाही तिथे काही वेगळ्याच परीक्षा असतात आणि वेगळेच फंडे असतात माझ्या शेजारी बांधकाम चालू आहे बांधण्यात येणाऱ्या बीम जेव्हा भरतात तेव्हा तो सर्व बाजूने समान मापाचा असावा यासाठी एक कोयत्यासारखा सरकपट्टीवरचा वर्नियर कॅलिपर त्यांनी बनवला आहे अर्थात त्याला हे नाव माहित नाही ते मी त्याला सांगितलं सर्व बाजूने माप सारखे असावे यासाठीच ते उपकरण आहे आम्ही शाळेत शिकवलेले उपकरण वेगळं पण तेच कार्य करणारे अतिशय साधे पट्टीवरचे उपकरण त्याने सुंदर बनवले आहे ही आहे त्या त्या ठिकाणांची गरज आणि त्यासाठी वापरलेले किंवा केलेले प्रयत्न हे शिक्षणाच्या पलीकडे आहेत हे वापरणारा माणूस शिक्षित नाही आहे की नाही गंमत मला तर खूपदा मनात प्रश्न येतो की काही टक्के मुलाने शिकू नये त्याला फक्त लिहायला वाचायला शिकवावे त्याला कष्टाची विविध कामे करता येईल असे ट्रेन्ड करावे आणि त्या कामाला भरपूर मजुरी द्यावी गवंड्याला हजार रुपये पगार आहे रोज.. शिक्षित बीए बीएड 5000मासिक वर काम करायला मिळतात दुर्दैव आहे.. 100 जागांसाठी परवा 1000 इंजिनिअर लाईन मध्ये उभे होते हा व्हिडिओ पाहिल्यावर खूप वाईट वाटले आता मुलांनी शिकावं तरी किती पण रोजगाराची उपलब्धता नाही नवनवीन रोजगार हुडकणारी एक कमिटी हवी त्या त्या भागातली वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याचे नियोजन झाले पाहिजे मी एक दिवसभर लिहीत बसले तरी हे संपणार नाहीत असो एका लेखाच्या निमित्ताने माझ्या मनात आलेले विचार मी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे मांडले आहेत आणि माझ्या अनुभवातून काही लिहले आहे इतकेच….. !!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈