श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ हळद कुंकू लावून ओटी भरणारं उस्तादांचं घर… लेखक : श्री दीपक प्रभावळकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
आता कलेला धर्मचौकटीत बांधणार काय?
उस्ताद झाकीर हुसेन गेले. त्यांना अनेकदा प्रत्यक्ष ऐकले, पण प्रत्यक्षात कधी भेटू शकलो नाही. अगदी कौटुंबिक जिव्हाळा आणि नाते असूनही !
कहाणीची सुरुवात होते, माझा मावसभाऊ संजूदादापासून. संजूदादाला लहानपणापासूनच तबल्याची नितांत आवड, सांगलीचा संजूदादा मिरजेच्या भानुदास बुवा गुरव यांच्याकडे तबला शिकत होता. तो साधारण 16 वर्षाचा असताना बुवांना देवाज्ञा झाली. आता संजूच्या तबल्याचे काय होणार, याची काळजी लागली. त्याचवेळी कोल्हापुरात झाकीरभाईंचा कार्यक्रम होता. आमची आत्या सुनंदा म्हणजे आमची ताईआत्या आणि संजूची थोरली बहीण सुहासिनी उर्फ आमच्या गोट्याताई हे संजूला घेऊन झाकीरभाईंना ऐकावायला गेले. सारं सभागृहत मंत्रमुग्ध झालं असलं तरी झाकीरभाइं&च्या बोटावर संजूदादाच्या काळजाचे ठोके नाचत होते. भाईंना ऐकून झालं. सारेच सांगलीला परतले.
इथं सुरु झाला प्रवास
तीनच दिवसात झाकीरभाई सांगलीत येणार होते. भाईंना ऐकून झालं होतं. आता त्यांच्याशी बोलायचं हे साऱ्या कुटुंबाने ठरवले आणि तुफान गर्दीत ते घडलेही. संजूदादाची ओळख करून दिली. जवाहिऱ्याला हिऱ्याची परख असते. चार मिनिटाच्या ओळखीत झाकीरभाइंनी तू मुंबईला ये आणि आब्बाजींकडे म्हणजे पंडित उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे शिक.
कला पूजा पूर्णत्वास आली…. दिवाळीत घरापुढे किल्ला करणाऱ्या पोराला अचानक हिमालयाच्या गिर्यारोहणाचे निमंत्रण मिळाल्यासारखंच होते.
अब्बाजी तुसी धन्य हो
संजूदादा आत्या आणि गोट्याताई मुंबईत घर शोधत शोधत भाईंच्या घरी पोहोचले. आता प्रश्न होता, संजूच्या मुंबईत राहण्याचा, ते आर्थिकदृष्ट्या अवघड होते. आब्बांनी एका वाक्यात तो सोडवला. अल्लारख्खांनी आपल्या आपर्टमेंटच्या पार्किंगच्या जागेत एक खोली बांधून संजूदादाच्या राहण्याची व्यवस्था केली. आणखीही तीन विद्यार्थी नव्हे नव्हे शिष्य तिथेच राहत होते.
झालं, संजूदादाचा तबला पुन्हा सुरू झाला. तुमचं काम, लगान गुरूकडे तुम्हाला घेऊन जाते, ते झालं. गुरूमंडळात आब्बाजींसाठी आणि झाकीरभाईंसाठी संजू आवडता झाला. झाकीरभाई अनेकादा दौऱ्यावर असत. झाकीरभाईंना आणखी दोन भाऊ आहेतच फजल आणि तोफीक तरी घरच्या अनेक जबाबदाऱ्या संजूवर आल्या होत्या. संजूदादा हा पंडीत उस्ताद अल्लारख्खाँ उर्फ आब्बाजींचा चौथा मुलगा होता. आब्बाजींचे पथ्य पाणी पाहणे, आम्माजी यांना हाताला धरून फिरवून आणणे हे संजूने स्वत:च सुरू केले. हे त्याला कुणी सांगितले नव्हते. घरच्या जबाबदाऱ्या कोणी दिल्या नव्हत्या, त्यान स्वत: घेतल्या होत्या.
संजूचे तबलाज्ञान हे सुद्धा इतकं वाढलं होतं की, मैफिलीला आब्बाजी त्याला सोबत घेऊन जात. आब्बाजींसोबत संगत करण्याचं अहोभाग्य संजूदादाला लहान वयातच लाभलं. अनेक मैफिलींना आब्बाजी संजूला एकटे पाठवत.
संजूचा तबला बघून झाकीरभाईंनी त्यांच्याच घरी शास्त्रोक्त पद्धतीने संजूचं ‘गंडाबंधन’ केले.
ब्राह्मणाची माऊली संजू घरी आनंदी
सांगलीच्या माझ्या आत्याला पोराची आठवण यायची. त्याकाळी सांगलीहून मुंबईला जायचे, लेकाला भेटायचे, पण रहायचे कुठे? हा प्रश्न असायचा. आत्या एकदा मुंबईला गेलीच, गॅरेजमध्ये लेकाला भेटल्यानंतर आम्माजींनी त्यांना वर बोलावून घरी राहायला सांगितले. आत्या झाकीर हुसेन यांच्या घरी एक दिवस नाहीतर चार दिवस राहून सांगलीला परतली. पुढे हा शिरस्ताच सुरू झाला. आत्या आठ आठ दिवस झाकीरभाईंच्या घरात राहायची.
संजूदादा झाकीरभाईंच्या घरातला अविभाज्य घटक होता. बाह्मणा घरचं पोरं मुसलमानाच्या घरात नांदत होतं. ठसठशीत पुंकू लावणारी आत्या आम्मीजींची अनेकदा सावली बनून राहत. गोट्याताई सुद्धा अनेकदा झाकीरभाईंच्या बहिणीसारखी त्यांच्या घरी राहत.
आम्हा घरी नाही धर्म आम्ही एकाची लेकरे
पुढे गोट्याताईचं लग्न झालं. भाऊजी सुनील आणि गोट्याताई गुजरातला निघाले होते. वाटेत संजूला भेटून जाऊन असं ठरवून ते संजूला भेटायला गेले. नेमके त्यादिवशी झाकीरभाई, आब्बाजी हे सारेच घरी होते. ताई-भाऊजी दोघांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याची गडबड असताना आम्माजींनी ताईला थांबवलं. पाटावर बसवलं आणि हळद कुंकू, अक्षदा (कुंकूमिश्रीत तांदूळ) लावून खणानारळानं तिची ओटी भरली. लेक जावायांनी साऱ्यांच्या पाया पडून ‘अष्टपूत्र सौभाग्यवती भव’ हे आशीर्वाद घेतले.
मी ढगाळ फाडतोय, मला ताकद द्या
ताई, भाऊजी गुजरातला पोहोचले, इकडं संजूदादाचं तबला करिअर बहरत होतं. दुर्देवाने संजूदादाला जाऊन काही वर्षे झालीत.
काल भाई पण गेले.. ,
अस्वस्थपणे हा सारा घटनाक्रम पाहताना रक्ताचे अश्रू वाहत होत. धर्मांधतेचे किटण चढलेले आपण जीणं जगतोय, कुठूनं आलं हे सगळं मळभ.
हिंदुस्थानावर कोसळू पाहत असलेला धर्मांधतेचा ढग माझ्या इवलाश्या हाताने काढण्याचा प्रयत्न करतोय. माझी ताकद कमी पडतेय, का कोणाच्या लक्षात येत नाही की आज आपण रंग, प्राणी सुद्धा धर्मामध्ये वाटले आहेत. कला सुद्धा रंगामध्ये बांधण्याचे प्रयत्न होत आहेत.
मुसलमानाच्या घरात बाह्मणाचा पोरगा जणू श्रीकृष्णाप्रमाणे वाढला. आणि मुस्लीम घरामध्ये हळद कुंकू, अक्षदा आणि नारळही असायचा. या साऱ्या घटनेचा परीसस्पर्श होऊन सुद्धा होऊनही मी सोनं का झालो नाही किंवा या विलक्षण घटनेचं परीस घेऊन समाजात मी सोनं का घडवू शकत नाही.
धर्मांमध्ये विभागणी करणाऱ्या लोकांच्या हातात कला लागू नये, आणि जे क्षेत्रे हाती लागली आहेत, त्यांना बाजूला करण्याचे बळ झाकीरभाईंच्या आत्म्याने द्यावे, हीच तुमच्या आमच्या ईश्वर आणि अल्लाकडे मागणी.
लेखक : श्री दीपक प्रभावळकर
– 9325403232 / 9527403232
प्रस्तुती : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com