श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “शून्य” – लेखक – श्री एम – अनुवाद : श्री अमेय नातू ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : शून्य
लेखक : श्री एम
अनुवाद : अमेय नातू
पृष्ठ:१९२
मूल्य:२९९₹
केरळमधील एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला ‘शून्य’ म्हणवतो, झिरो. परंतु तो नक्की आहे तरी कोण?
एक वेडसर मनुष्य? काळी जादू करणारा मांत्रिक? कोणी एक लुच्चा? की एक अवधूत, एक साक्षात्कारी महापुरुष?
सामी नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती एका स्थानिक ताडी विक्री केंद्राच्या पाठीमागच्या अंगणातील छोट्या झोपडीमध्ये राहू लागते. तिथे ती व्यक्ती बोधकथा सांगते, आशीर्वाद देते, शिव्याशाप देते, काळ्या चहाचे असंख्य पेले रिचवते आणि सर्वार्थाने मुक्त असे आयुष्य जगते. क्वचित प्रसंगी आपल्या बांबूच्या जुन्या बासरीतून मन मोहून टाकणारी संगीतनिर्मिती करते.
सदाशिवन जो त्या ताडी विक्री केंद्राचा मालक आहे, दुकान बंद करून रात्री उशिरा गावाकडे घरी जातो. त्याचा रस्ता हा स्मशानाजवळून जाणारा! भुताकेताला न मानणारा सदाशिवन रोज रात्री गाडीवरून जाताना स्मशान आले की तिकडे न पाहता शक्य तितक्या जोरात तेथून निघून जातो… आजही तो असाच करत स्मशानात असताना पांढरे कपडे अंगावर असलेली एक आकृती त्याच्याजवळ येते… तो घाबरून गाडीवरून पडतो. ती आकृती त्याच्या आणखी जवळ येते.. त्याला नावाने हाक मारून फार लागलं नाही असं सांगून पुन्हा भेटू म्हणून निघून जाते. जाताना मी भूत नाही हे सांगायला तो विसरत नाही… ही कादंबरीची सुरुवात आहे.
कादंबरीत अनेक रहस्य आहेत. चित्त थरारक प्रसंग आहेत. बोलणारा कुत्रा असेच एक गूढ आहे. जो कुत्रा दिवसभर भटकत असतो. .कोठे ते कोणालाच माहित नाही. पण रात्री त्या झोपडी समोर येऊन झोपतो .रोज ताडी पिणारा पक्का बेवडा कुत्रा बोलतो हे जेंव्हा सदाशिवला समजते तेंव्हा त्याची मनस्थिती कशी झाली असेल?
हा वेडसर सामी स्वतःचा प्रभाव निर्माण करत आहे, आपल्याला त्याचा त्रास होत आहे हे तेथील ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्याला वाटतं आणि तो ज्या झोपडीत हा साधू झोपलेला असतो ती झोपडीत जाळून टाकतो…. पण सामी त्या रात्री झाडावर बसलेला असतो जेथे ते झोपडी जाळण्याचा प्लॅन करतात…. त्यांना तो माफ केल्याचं ही सांगतो….
अमेरिका रिटर्न कुमार ची ही कथा यात आहे… तेथे येणारे स्वतःला शोधायला येतात. हा वेडसर सामी त्यांना कधी मारून तर कधी बोलून उपदेश करतो… अवलिया!
कालांतराने, ज्या गूढ प्रकारे तो अवतरला तशाच पद्धतीने एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून ‘शून्य’ एकाएकी नाहीसा होतो.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता, तसेच वास्तव आणि भ्रम गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते. सखोल ज्ञानावर आधारित अतिशय संयत असे हे कथाकथन आपल्याला ‘शून्या’ च्या प्रांतात घेऊन जाते. शून्यतेच्या अशा एका विश्वात जेथे गहिरी आणि चिरस्थायी शांतता सदैव नांदत असते; ही असीम शांतताच सर्व गोष्टींचे उगमस्थान आणि शेवट आहे.
या कादंबरीत काही भयंकर वास्तव मांडण्यात लेखक कचरत नाहीत. ख्रिश्चन धर्मगुरू धर्मांतरासाठी कसा पैशांचा सर्रास वापर करतात त्याचा तपशील समजतो.पैसे देऊन रुग्ण होऊन प्रार्थना सभेत जायचे आणि रोगमुक्त होण्याचं नाटक करायचे यासाठी दलाला मार्फत पैसे मिळवायचे…आणि अशा अनेक गोष्टी कादंबरीत वाचायला मिळतात.
कादंबरीची अध्यात्मिक धाटणी असली तरीही मानवी जीवनाच्या अनेक वास्तविक गोष्टी लेखकाने धीटपणे मांडले आहेत.लहान लहान प्रकरणे आणि सोपी आणि प्रवाही भाषा यामुळं ही कादंबरी सहज वाचली जाते.गूढ आणि रहस्यमय असल्याने वाचक खिळून राहतो.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈