श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ४२ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नाही हे डॉ.देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजावून सांगितलेलं होतं. त्यावेळी त्यांच्या केबिनमधे माझ्याबरोबर आलेले माझे ब्रँचमॅनेजर घोरपडे साहेब होते फक्त. ही गोष्ट घरी किंवा इतर कुणालाच मी मुद्दाम सांगितलेली नव्हती. असं असताना हे लिलाताईला कसं समजलं? मला प्रश्न पडला.)
विशेष म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी कुणाला न विचारताच त्याच दिवशी मला परस्पर मिळणार होतं आणि माझ्या दुःखावर फुंकर घालत मला
दिलासाही देणार होतं हे त्या क्षणी मात्र मला माहित नव्हतं. सगळं घडलं ते योगायोगाने घडावं तसंच.
‘ समीर पृथ्वीवरील औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेल्यामुळे तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि बरा होऊन परत येणाराय ‘
हे लिलाताईच्या पत्रातील वाक्य पुत्रवियोगाच्या धक्क्यातून मला अलगद बाहेर घेऊन आल़ं होतं. ही अंतर्ज्ञानाची खूणगाठच होती जशीकांही! एका क्षणार्धात माझं पुत्रवियोगाचं दु:ख विरुनच गेलं एकदम…
“कुणाचं पत्र..?”
“लिलाताईचं. घे. बघ तरी काय लिहलंय? वाच”
ती न बोलता उठली. ‘चहा करते..’ म्हणत आत जाऊ लागली.
“आधी वाच तरी.. मग चहा कर.”
“सांत्वनाचंच पत्र असणार. काय करू वाचून? आपला समीर गेलाय हे कटू सत्य बदलणाराय कां?” तिचा आवाज भरून आला.
“हो बदलणाराय. बघशील तू. आधी वाच..मग तूही कबूल करशील.”
तिने ते पत्र घेतलं. वाचलं. निर्विकारपणे मला परत दिलं.
“तुला हे वाचून खरंच काहीच वेगळं वाटलं नाही?”
“नाही. लिलाताईंचं मराठी भाषेवर प्रभुत्त्व आहे म्हणून त्यांनी चांगल्या भाषेत आपलं सांत्वन केलंय एवढंच. बाकी वेगळं काय आहे त्यात?” ती म्हणाली.
तिचंही बरोबरच होतं. समीरच्या आजारपणाच्या बाबतीतल्या कांही गोष्टी तिला त्रास होऊ नये म्हणून मी त्या त्या वेळी मुद्दामच सांगितल्या नव्हत्या. आता सगळं घडून गेल्यानंतर ते तिला सांगण्यात कशाचाच अडसर नव्हता. ते नाही सांगितलं तर या पत्रातलं मला जाणवलेलं वेगळेपण तिला कसं जाणवावं….? पण ती ते सगळं समजून घेण्याइतकी सावरलेली नाहीय. सगळं ऐकल्यानंतर ती बिथरली तर? नकोच ते. जे सांगायचं ते तिचा मूड पाहून तिच्या कलानेच सांगायला हवं. तरीही ती केव्हा सावरतेय याची वाट पहात आता गप्प राहून चालणार नाही. लवकरात लवकरात लवकर तिला या एकटेपणातून बाहेर काढायलाच हवं….’
कितीतरी वेळ असे उलट सुलट विचार माझ्या मनात गर्दी करत राहिले. तिने चहाचा कप माझ्यापुढे ठेवला आणि मी भानावर आलो. डोळे पुसत ती किचनमधला पसारा आवरु लागली.
“आरती, ऐक माझं. पटकन् जा आणि आवर तुझं. मी तयार होतोय..”
“कां ? कुणी येणार आहे कां?”
“नाही..” मी हसून म्हटलं “कुणीही येणार नाहीय, आपणच जायचंय..”
“आत्ता? कशाला? कुठं जायचंय..?”
मला एकदम लिलाताईच्या माहेरघराची आठवण झाली.ते सर्वजण किर्लोस्करवाडी सोडून कोल्हापूरला आले त्याला दहा वर्षं होत आली होती. सुरुवातीची एक दोन वर्ष कष्टात गेली तरी आता त्यांचं छान बस्तान बसलं होतं.स्वत:चं घर झालं. कोल्हापूरला उद्यमनगरमधे स्वतःचं वर्कशॉप होतं, दोन लेथ होते, मशिनरी स्पेअर पार्टसचं स्वतःचं दुकान होतं. सगळे भाऊ स्वतः राबत होते. दोन वर्षांपूर्वीपासून लिलाताईचे वडिल प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व पसारा मुलांच्या हवाली करून अलिकडे घरी अंथरुणाला खिळून असायचे. क्वचित मधे कधीतरी एक दोनदा कामानिमित्ताने त्या भागात गेल्यानंतर मी उभ्या उभ्या त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. पण त्यालाही बरेच दिवस गेले होते. शिवाय सगळी हालहवाल लिलाताई वाडीला भेटली की वेळोवेळी तिच्याकडून समजायचीच. माझा लहान भाऊ कोल्हापूरमधेच असल्याने नेहमी त्यांच्या संपर्कात असायचा. त्याच्याकडून चार दिवसांपूर्वीच लिलाताईचे वडील गेल्याचे समजले होते. या रविवारी मी त्यांच्या घरी भेटून यायचे ठरवले होतेच.त्यापेक्षा आरतीलाही बरोबर घेऊन आजच गेलो तर…? हा विचार मनात आला तेव्हाच आरतीने मला पुन्हा विचारले…”सांगा ना, कुठं जायचंय..?”
उद्यमनगरमधे. लिलाताईचे वडील नुकतेच गेलेत. तिच्या आईला भेटून तरी येऊ.” मी म्हणालो.
आरती गप्पच झाली एकदम.
“का गं? काय झालं?”
“नाही… नको.”
“का ?”
“आपला समीर अडीच तीन महिने दवाखान्यात अॅडमिट होता. त्यांच्यापैकी कुणी आलं होतं कां बघायला? तो गेल्याचंही समजलं असेलच ना त्यांना? त्यानंतरही कुणी आलं नाही.आपणच कां जायचं?”
मी निरुत्तर झालो. ती बोलली यात तथ्य होतंच.पण तरीही मला ते स्विकारता येईना.
हे बघ, त्यांनी केलं ते न् तसंच आपणही करायचं कां? लिलाताईचे वडीलही झोपून होते. त्यांचा कांही प्रॉब्लेम असेल. इतर कांही अडचणी असतील. त्यामुळे येणं जमलं नसेल. पण ती अगदी साधी माणसं आहेत गं. माणुसकी सोडून वागणारी तर अजिबातच नाहीयत.आणि आपण रहायला जातोय कां तिकडे? घटकाभर बसून बोलून येऊ. त्यांनाही बर वाटेल.”
ती न बोलता स्वतःचं आवरू लागली. मला तेवढं पुरेसं होतं. ती यायला तयार झालीय
हेच खूप होतं माझ्यासाठी.
त्यांच्या घराचं दार उघडंच होतं. हॉलमधे दारासमोरच्या भिंतीला टेकून लिलाताईच्या आई नेहमीसारख्या बसून होत्या.
मला दारात पहाताच त्यांना गलबलून आलं.
“ये रेss माज्या लेकरा..ये…” रडवेल्या आवाजातच त्यांनी अतीव मायेनं आमचं स्वागत केलं.आम्ही आत जाताच आरतीकडं पाहून त्यांचे डोळे भरुन आले.त्यांनी तिला जवळ बोलावलं..
“तू कां उबी? ये माझ्याजवळ.बैस अशी..” म्हणत तिला जवळ बसवून घेतलं.
” खूप आजारी होते कां हो बाबा?”
” हां तर काय? तरण्या वयापासून घाण्याला बांदलेल्या गुरासारका राबराब राबल्येला जीव त्यो. दोन वर्सं झाली आंथरुन सोडलं नव्हतं बग ल्येका. मी ही अशी.लांबून बघत बसायची निस्ती. पण समद्या पोरांनी लै शेवा केली बग त्येंंची.”
बोलता बोलता आरतीकडं लक्ष जाताच त्या बोलायचं थांबल्या.
” हे बघ बै.झालं गेलं गंगेला अर्पण करुन टाकायचं बग.त्यातच रुतून बसायचं न्है.कळतंय का? यील त्ये पदरात घ्यायचं न् पुढं जात -हायचं बग.” त्यांनी तिला समजावलं. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द त्यांच्या अंत:करणातूनच उमटलेला असावा इतका आपुलकीने ओथंबलेला होता.”गप.रडू नको. तुजा इस्वास नाई बसनार,पन इतं गेटभाईर जीप हाय नव्हं , तिची डिलीवरी कवा मिळालीती सांगू?तुजं बाळ देवधर डाकतराकडं अॅडमीट झालंय त्ये आमाला समजलं त्याच दिवशी. मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दरसन घ्यून लई वर्सं झाली बग.पोरं म्हनत हुती ‘चल.तुला उचलून नव्या जीपमंदी बशीवतो न् अंबाबाईच्या दरसनाला बी तसंच उचलून घ्यून जातो म्हणून.तवा म्या काय म्हनले ठाव हाय? मी म्हनले, त्या म्हाद्वार रस्त्यावरच अरविंदाचं बाळ हाय नव्हं दवाखान्यात? अंबाबाईचं दरसन राहूं दे.. मला उचलून त्या दवाखान्यात नेताय का सांगा.तरच मी जीपमध्ये बशीन. त्येच्या बाळाला बगून तरी येते यकडाव. पन दोन अवगड जिनं चढाय लागत्यात म्हनली पोरं.त्ये कसं जमणार हुतं? म्हनून मग जीपमदे बसनं न् देवीचं दरसन दोनी बी नगंच वाटलं. आज तुमी दोगं आला झ्याक वाटलं बगा…
आरती थक्क होऊन ऐकत होती. तिच्या मनातल्या प्रश्नाचं प्रश्न न विचारताच तिला परस्परच उत्तर मिळालं होतं!
“तुझ्या आईला न् तुला बी माजी लिलाबाई भेटती न्हवं वाडीत न्हेमी? ती सांगत असती मला…”
“हो.बऱ्याचदा भेट होते आमची”
” तिची पन लई सेवा झालीय बग दतम्हाराजांची.तुला म्हनून सांगत्ये..,तुझ्या बाबावानी लिलाबाई बोलती त्ये बी खरं व्हाय लागलंय बग.”
त्या सहज बोलायच्या ओघात बोलून गेल्या न् मग लिलाताईबद्दलच कांहीबाही सांगत राहिल्या.तिच्या वाचासिध्दीबद्दलच्या अनुभवांबद्दलच सगळं. त्यातला प्रत्येक शब्द मला निश्चिंत करणारा होता! सगळं ऐकत असताना लिलाताईच्या पत्रातला मजकूर माझ्या नजरेसमोर तरळत राहिला होता! त्यातला शब्द न् शब्द खरा होणाराय हा विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र त्याक्षणीतरी अनुत्तरीतच राहिला होता..!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈