श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्कूल तो बहुत सीख लिया, अब…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“स्कूल तो बहुत सीख लिया, कुछ दिन तो बिताये इन्सानियत सीखनें के लिए !”

काॅलेजात असताना गाडीची किल्ली हातात असणं म्हणजे चैन वाटायची. खिशात फारसे पैसेही नसायचे. अर्थात, खूप पैसे लागतही नसत. सगळीकडे सायकल दामटत फिरायचं आणि मिळेल ते खायचं, असं खूप भटकलो. 

मी सांगतोय तो काळ काही फार जुना नाहीय. पण तेव्हा स्वस्ताई जास्त होती की देणाऱ्यांचे हात मोठे होते, यात उजवं-डावं करणं कठीण आहे. 

रोज सकाळी ६ वाजता पर्वतीवर जायचा आमचा शिरस्ता. सदाशिव पेठेत राहत होतो, तिथून चालत निघायचं आणि थेट पर्वतीवरच जाऊन थांबायचं. सकाळच्या गारव्यात दोनदा पर्वती चढायची-उतरायची आणि मग पायथ्याला गरमागरम पोहे किंवा उपीट खाऊन चहा प्यायचा. दहा रूपयांत काम ओके..! एखाद्या दिवशी पैसे विसरले-बिसरले तर कुणी उपाशी जाऊ दिलं नाही आम्हांला. चहा-नाश्ता विकणारी तरी अशी कुठं श्रीमंती ऊतू जाणारी माणसं होती? शाळेत चार बुकं कमी शिकली असतील कदाचित, पण माणूसपणात मात्र तरबेज एकदम. 

दर रविवारी सिंहगड ठरलेला. पहाटे अंधारातच सायकलला टांग मारून सुटायचं, खडकवासल्यापाशी अर्धा-अर्धा कप चहा घ्यायचा. आतकरवाडीत सायकली लावून पायवाटेनं गडावर जायचं. एखाद्या मेटीवर थकून थांबलं आणि पाणी मागितलं तर नुसतं पाणी यायचं नाही. चमचाभर साखर यायची. ‘पोरांनो,चहा घ्या घोटभर’ अशी हक्काची ऑर्डर असायची. ‘पैसे किती?’ असं विचारल्यावर ‘मोठा साहेब होशील तेव्हा घेईन पैसे’ असं म्हणणारी माणसं..

गडावर पिठलं-भाकरी खायला बसावं आणि एकाच भाकरीत पान उचलायला जावं तर जमायचंच नाही. ‘एका भाकरीतच पोट कसं काय भरतंय तुमचं? खावा अजून येक भाकर’ असा आग्रह व्हायचा. कांदा बुक्कीनं फोडावा लागायचा. चुकून कच्ची मिरची दाताखाली आली की पाणी-पाणी व्हायचं. चुलीशी बसलेली बायका-माणसं लगोलग दह्याची वाडगी पुढं करायची. थंडगार ताक खरोखरच आत्मा शांत करायचं. पातेल्यात लावलेला भात हे प्रकरण चवीला अफलातूनच असतं, शिवाय पौष्टीकही. तेव्हा दह्या-ताकाचे पैसे मोजून घेत नसत. नेहमी गडावर येणाऱ्यांकडून तर नाहीच. 

गडावर सरबत विकणारा एक मित्र होता. दहावीत शाळा सोडलेला. पाच रूपयांना लिंबाचं सरबत विकायचा. चांगला दोस्ताना जमलेला. मग दोन-तीन-चार ग्लास सरबत पोटात गेलं तरी हा मात्र पाच रूपयेच घ्यायचा. का? तर ‘मित्र’ म्हणून..! मी त्याला एकदा विचारलं होतं, ‘किती कमाई होते रोजची?’ २००५ साली त्याचं उत्तर होतं, ‘रोजचे पंचवीस-तीस रूपये सुटत्यात आणि रविवारी चांगली कमाई हुती शंभर-सव्वाशे रूपये..!’ महिन्याकाठी हजार-दीड हजार रूपयांची मिळकत असणारा तो माझा मित्र मला दोन-दोन ग्लास सरबत फुकट का बरं देत असेल? 

गडावर एकवेळ मागाल तितकं ताक मिळेल पण पाणी मिळणार नाही अशी स्थिती होती. पाणी मर्यादीतच असायचं. वीजेचा पुरवठा अगदी नियमितपणे अनियमित. अशा स्थितीत पायात प्लास्टीकच्या चपला अडकवून हा दिवसभर गडावर फिरून सरबत विकायचा. संध्याकाळी खाली उतरायचा. कधी कधी त्याचा अंदाज चुकायचा अन् नुकसान व्हायचं. गडावर राबता नसला की, केलेलं सरबत वाया जायचं. दिवसही वाया जायचा, पायपीट व्हायची, पैसेही मिळायचे नाहीत आणि मालाचंही नुकसान ! मग त्याची फार चिडचिड व्हायची. पण, दोन-तीन तासांत गडी नाॅर्मल..! खिशात पैसे नव्हते, पण त्याच्याकडे दानत होती हे निश्चित. 

कलावंतीण-प्रबळगड सारख्या ट्रेकमध्ये किंवा वासोट्यासारख्या ट्रेकमध्ये आपले सगळे नखरे अक्षरश: हवेत विरून जातात. ‘कुठलंही द्या, कसलंही द्या, पण पाणी द्या’ अशी स्थिती होते तेव्हा गडावरच्या झोपड्यांचं महत्त्व समजतं. इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथं दिवसाला पाच-पंचवीस माणसं येण्याचीसुद्धा शाश्वती नाही, अशा  ठिकाणी स्टाॅलसदृश दुकान मांडून बसायचं, हा केवळ व्यवसाय असेल असं वाटत नाही. त्याही पलिकडे काहीतरी असणार..! कैऱ्या, जांभळं, करवंदं, बोरं, पेरू, आवळे, काकड्या, दही, ताक, सरबतं,चहा अशा गोष्टी विकून त्यांना श्रीमंती येत असेल का? 

महाबळेश्वरमध्ये कुल्फी विकणं वेगळं आणि माहुलीसारख्या गडावर चहा-सरबत विकणं वेगळं.. पाण्याचं महत्व आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा घोटभर पाण्यासाठीसुद्धा प्रचंड तंगडतोड करावी लागते. खिशात भरपूर नोटा असूनही उपयोग नसतो, जवळ उरलेली दोन-चार पारले बिस्कीटंसुद्धा सोन्याच्या बिस्कीटांइतकीच मौल्यवान वाटायला लागतात. एरवी आपण या गोष्टींकडे ढुंकूनही पाहणार नाही. तिथं गेल्यावर आपल्याला याची जाणीव आपोआपच होते. 

सिंधुदुर्गाला जाण्यासाठी पाॅवर बोटी आहेत. पण जंजिऱ्याला जाण्यासाठी शिडाच्या बोटी आहेत. त्या वल्हवाव्या लागतात. ते शारीरिक कष्टाचं काम आहे. वाऱ्याचा अचूक अंदाज घ्यावा लागतो. ते कौशल्य ही माणसं कुठून आणि कशी शिकत असतील? समुद्रातून वाहतूक करण्याचा व्यवसाय करणं हे मुळीच सोपं काम नाही. पावसाळ्यात चार-पाच महिने जंजिरा पर्यटकांसाठी बंद केला जातो, तेव्हा ही माणसं काय करत असतील? याचा विचार आपण कधी करत नाही. ती माणसं शिकलेली नसतील पण, समुद्राच्या घडण्या-बिघडण्याचा अंदाज घेण्यात मात्र हे बहाद्दर निष्णात असतात. 

एखाद्या गडावर आपल्याला चहा २०₹, पोहे ३०₹, भजी ५०₹ असं दिसलं की ते फार महाग वाटतं. पण, जो गड चढताना स्वत:च्या पायातल्या बुटांचंसुद्धा ओझं वाटायला लागतं, तिथं ती माणसं हे खाण्या-पिण्याचं साहित्य किती कष्टानं वर नेत असतील, हे डोळे, बुद्धी आणि मनं उघडी ठेवून पहायला हवं. जिथं घोटभर पाणीसुद्धा पायथ्यापासून घागरी-कळशांतून आणावं लागतं, तिथं लोकं ‘३०-३०₹ घेता आणि पोह्यांवर साधी कोथिंबीर-लिंबाची फोडही देत नाही तुम्ही’ अशी तक्रार करतात, तेव्हा त्यांच्या बौद्धिक पातळीची मला कीव कराविशी वाटते. ‘शी, काय हा चहा.. यात आलं सुद्धा नाही आणि २०₹ घेतात. नुसती लूट आहे ही’ असं म्हणणारी माणसं काही कमी नाहीत. त्यांनी चार दिवस त्याच ठिकाणी राहून चहा विकून दाखवावा आणि मगच असली बडबड करावी, असं मला वाटतं.

आपल्याला तर स्वयंपाकघरातून घराच्या दारापर्यंतसुद्धा सिलिंडर उचलून नेणं जमत नाही आणि ती माणसं सिलिंडर्स डोक्यावर-खांद्यावर वाहून नेतात..! स्त्रीसक्षमीकरण म्हणजे काय असतं ते गडकोटांवर जाऊन पहावं, त्याचा अभ्यास करावा, त्यावर प्रबंध तयार करून परिषदांमध्ये वाचावेत. पद्मपुरस्कारांकरिता गडकोटांवर वर्षानुवर्षं पर्यटक, इतिहासप्रेमींना सेवा देणाऱ्या एकाचंही नाव आपल्यापैकी कुणालाही सुचवावंसं वाटलं नाही. हा आपल्या सगळ्यांच्याच अज्ञानाचा, अपुऱ्या माहितीचा, अक्षम्य दुर्लक्षाचा आणि जगण्यावागण्यातल्या ओतप्रोत भरलेल्या स्वार्थीपणाचाच परिपाक नव्हे का? नारीशक्ती सन्मानाकरिता महाराष्ट्रातल्या शेकडो गडकोटांवर वर्षानुवर्षं भाकरी खाऊ घालणाऱ्या अन् पाणी देणाऱ्या एकाही माऊलीचं नाव आपण सुचवू शकलो नाही, याची आपल्याला खंतच नव्हे तर लाजही वाटली पाहिजे. 

ही लोकं गडोगडी दिसतील. या माणसांकडे पहा जरा. व्यावहारिक जगतापासून पूर्ण लांब असलेली आणि जगण्यासाठी रोजची धडपड करणारी ही माणसं.. त्यांचा परिसर सोडून शहरांकडे गेलेली नाहीत. यांची घरंदारं कशी असतील? यांची मुलं-बाळं दिवसभर काय करत असतील? ती कोणत्या शाळेत जात असतील? असे अनेक प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत घरापासून दूर डोंगरावर चौदा-पंधरा तास राबायचं, हे काम फार कठीण आहे. पण त्या बदल्यात त्यांना काय मिळतं? किती पैसे मिळतात? याचा जरा शोध घ्यायला हवा. शोधलंत तर निराळ्याच जगाचा शोध तुम्हांला लागेल.. 

मोबाईल फोन्स, इंटरनेट गेम्स, सोशल मीडीया, फुटकळ टीव्ही सीरीयल्स, रिॲलिटी शोज्, भुक्कड काॅमेडी शोज्, यांच्या विळख्यात अडकून आपण खरंखुरं जग पहायचं विसरूनच गेलो आहोत. त्यामुळेच, आपण कितीही संपन्न असलो तरीही आपल्याला ते कमीच वाटणार. आणखी मिळवण्याची लालसा कमी होणारच नाही. बहुतांश समस्यांचं मूळ हेच आहे. 

उन्हाळ्याच्या सुटीचा काळ ह्या निराळ्या जगाचा शोध घेण्यासाठी वापरायला हरकत नाही. बाहेर रखरखीत उन्हाळा पेटलेला असताना आपण घरात मस्त गार हवेत बसून ह्या माणसांविषयी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. हे जग प्रत्यक्ष जाऊन, जवळून अनुभवायला हवं. जाणून घ्यायला हवं. शक्य तितकी मदत करायला हवी. माणसांमधल्या माणूसपणाचं हे संचित जपलं पाहिजे..! 

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
SAMIR Sardesai

सर मस्त एकदम