सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हुरड्याचे दिवस… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे डिसेंबरच्या नाताळापासून आमच्या लहानपणी शाळेला सुट्ट्या लागत त्याला नाताळाची सुट्टी नाही तर हुरड्याची सुट्टी असंच नाव असे. त्यामुळे दहा दिवसाची सुट्टी असे सुट्टी लागली रे लागली की गावाकडे जायचं. 25 किलोमीटर अंतरावर गाव, पण अक्कलकोटवरून बसमधून उतरून दुसरी बस करून जावे लागे. एसटी आमच्या शेतातच थांबत असे. गाव लहान दोन अडीच हजार संख्येचा! पाच मिनिटाच्या अंतरावर घर…   गाडीतून उतरल्यापासून गावाचे अगत्य सुरू होई..  म्हाताऱ्या बायका ‘भगवानरावन मगळू’…   म्हणून आला बला काढित. कुणी हातातलं सामान घेई आणि मग आमची वरात घरी येत असे.

घरी काका काकू अतिशय हसतमुखाने स्वागत करीत. मोठं घर वाटच पाहत असे..  आमची चुलत भावंडं आणि आम्ही दंगा करायला मोकळे. घर मोठं होतं..  समोर मोठी ओसरी, ओसरीच्या पुढे मोठे अंगण..  अंगणाच्या थोडसं पुढे गोठा..  त्यात दोन-तीन दुभती जनावरं..  गोठ्याच्या बाजूला लावलेल्या शिडीवरून माळावर जायला जिन्यासारखा भाग. अंगणात पहिल्या ओसरीवर किंचित वर तुळशी वृंदावन..  तिथेच हनुमानाच्या आणि पांडुरंगाच्या मूर्ती. बाजूला मोठी पडवी..  पडवीच्या बाजूला बंद बाथरूम. ओसरीच्या थोडसं वर पत्र्यात असलेली दुसरी ओसरी त्याच्यावर दगडाने बांधलेला मोठा भाग..  तिथे झोपाळा लावलेला असे. त्याच्या बाजूला चार खोल्या, एक मोठं देवघर, सामानाची खोली आणि दोन बेडरूम. खालच्या ओसरीला लागून भलं थोरलं स्वयंपाकघर..  ज्यामध्ये जेवणाला बसण्याची सोय..  कपाट..  त्या कपाटात दही दूध ताक ठेवण्यासाठी बांधून घेतलेले कट्टे..  तिथे बरोबर ती ती भांडी बसत असत. सरपण ठेवायला एक मोठी खोली आहे. शेगडी चूल वैल आणि त्याचा धूर बाहेर जाण्यासाठी वरच्या बाजूला धुराडे ! स्वयंपाकघर शेणानी सारवून लख्ख असे. आत उतरायला दोन मोठ्या आयताकृती पायऱ्या असत. हातपाय धुऊन स्वयंपाक घरात गेलं..  थोडं खाऊन पिऊन झालं की मग शेताकडे रवाना. त्या दिवशी नुसती शेताकडे भ्रमंती व्हायची..  किरकोळ बोर डहाळा शेंगा…   !

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र उठल्याबरोबर तोंड धुतलं की कप घेऊन आम्ही गोठ्यात बसत असू. काका म्हशीची धार काढून आमच्या तोंडावरही ते सोडत असत. आमच्या कपात दुधाच्या धारा यायच्या की त्याचा फेस व्हायचा आणि मग तसा गच्च फेस भरलेला कप आम्ही तोंडाला लावायचा. त्या नीरशा दुधाची गोडी काही और असायची. दूध पिऊन झाले की चटणी मीठ इत्यादीचे डबे घेऊन आम्ही शेताकडे कुच करायचे. आमच्या आधी आमचा वाटेकरी निंगप्पा तिथे हजर असायचा. निंगप्पाची शिस्त भारी..  बंद गळ्याचा शर्ट धोतर..  झुबकेदार मिशा..  डोक्याला लाल मुंडासे..  कानामध्ये आता मुलं घालतात तशा बाळ्या किंवा रिंगा ! तो शेत इतकं उत्तम करायचा..  त्यांनी पाडलेल्या शेतातल्या सरी अगदी मापात असायच्या ! एकदा राजेसाहेब अक्कलकोट येथून शिकारीला आले होते..  सशाच्या. त्यांनी सरीतून बरोबर बाण सोडून मारले ती सरी इतकी सरळ होती त्याबद्दल राजेसाहेबांनी त्याला पारितोषिकही दिले होते..  असा तो पारितोषिक विजेता आमचा वाटेकरी निंगप्पा..  आम्हा मुलांना पाय झटकून पाय पुसून घोंगड्या वरती येऊ द्यायचा…   अगटी पेटवलेली असायची, तिच्या धुरावर मग आम्ही त्याने आणून टाकलेला डहाळा भाजून घेत असू. आगटीमधून बाहेर पडणारा त्या ज्वाला..  तो धूर..  त्या दुधाचा विशिष्ट वास…   एक वेगळेच वातावरण निर्माण करायचा ! धूर कमी होऊन फक्त ज्वाला शिल्लक राहायचे, हळूहळू त्या शांत व्हायच्या आणि मग अगदी फक्त आर उरायचा त्याला सर्व बाजूने राखेने लपेटून.

निंगप्पा कौशल्याने त्यात काढून आणलेली सुंदर कोवळी कणसे खोचायचा..  त्याच्याच थोडे बाजूबाजूने मोठी मोठी वांगी भाजायला टाकायचा. एरंडाची पानं धुवून पुसून तयार असायची. आम्ही अगटीच्या भोवती बसलो की मग प्रत्येकाला एक पान दिले जायचे. त्या पानावर मस्त दाण्याची चटणी, गुळाचे खडे, राजा राणी थोडासा फरसाण, किंवा चिवडा खास आमच्या काकांनी बनवलेले मीठ, त्यात जिरे हिंग वगैरे पदार्थ असायचे. या सगळ्यांच्यासह हुरड्याची पूर्वतयारी व्हायची. मग तो लीलया एकेक कणीस अंदाज घेत अगटीतून बाहेर काढायचा..  एका छकाटीने ते झटकायचा..  फुंकर मारायचा आणि हातावर चोळायचा…   कोवळे कोवळे लुसलुशीत हिरवे गार भाजलेले दाणे कणसातून बाहेर येत..  काळीशार घोंगडी वरती हिरवे कोवळे दाणे..  त्यांचं रूप देखणं दिसायचं ! मग सगळे तो गरम गरम हुरडा खाण्यासाठी तुटून पडायचे. शेजारी बसलेल्या माणसाच्या हातावर आपल्या हातातले कोवळे जाणे अलगद निंगप्पा ठेवत असे ! निंगप्पाच्या हातून आपल्या हातावर हुरडा येणे हे खूप भारी समजले जायचे…   आम्ही या शेताचे मालक आहोत याची जाणीव आम्हाला व्हायची…   काही म्हणा मालक असण्यात रुबाब असतो ! मग एकापाठोपाठ एक कणसं चोळून दाणे काढून तो आम्हाला देत असे ! मीठ लसणीची चटणी – शेंगाची चटणी – गूळ – भाजलेले शेंगदाणे, नुकतंच आगटीतनं काढलेले भाजलेले वांगे – याची चव अहाहा – कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पदार्थाला नाही, न कॉन्टिनेन्टल पदार्थाला आहे..  जगातले ते सगळे ऐश्वर्य भारतीय शेतकऱ्याजवळ आहे !!!

पोटभर हुरडा खाऊन झाला की मग हुरड्याच्या धाटाखालील जाड उसाचा फडशा पडत असे. कारण आम्हाला असं सांगितलं जायचं की हुरड्यानंतर तो धाटाचा ऊस खाल्ला की हुरडा पचतो. आमची पंगत संपेस्तोवर मोठी माणसे हुरड्याला येत असत. वडील असले की दोन-तीन पाहुणे बरोबर असायचे. काकू आणि आई मात्र घरी स्वयंपाक करण्यात मग्न असायच्या. पाहुण्यांची सरबराई होई आणि मोठ्या माणसाचा हुरडा खाऊन होईपर्यंत आम्ही शेतात हुंदडायला मोकळे…   मग शेतातून हिंडताना उभ्या ज्वारीच्या धाटाखाली पाथरीची भाजी, करडीची भाजी अशा रानभाज्या..  लाल भडक टोमॅटो…   कोवळ्या काकडीच्या वेलाला लागलेल्या काकड्या…   एखाद दुसरे पिकलेले शेंदाडे..  तुरीच्या कोवळ्या शेंगा..  असा ऐवज गोळा करून आम्ही झाडाखाली ठेवलेल्या किटलीतून भरपूर ताक पिऊन घरी पळत असू ! 

घरी हे सगळं सामान टाकलं की अगदी घराच्या समोर नदी..  कपडे घेऊन नदीत डुंबायला जायचं..  तिथेच काकू आणि आई धुणं धुवत असायच्या. त्यांना कपडे वाळत घालण्यासाठी मदत करायची. नदी इतकी स्वच्छ होती की खालची वाळू स्पष्ट दिसत असे. पाण्याला फार ओढ नव्हती. बोरी नदी पण हान्नूरला तिचा आकार हरिणासारखा होत असे म्हणून त्या नदीला हरणा नदी असं म्हणत ! नदीत बराच वेळ डुंबून आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत पाण्याचा मुबलक आनंद घेत आम्ही घरी परतत असू ! नदीवरून पाणी आणायचे असल्याने काकू आणि आई एक एक घागर घेऊन पुढे जात आणि आम्ही धुणे डोक्यावर घेऊन येत असू..  अर्थात कपडे वाळल्यामुळे तेव्हा ते हलकेच असायचे पण त्या दोघींना मात्र जवळजवळ अर्धा किलोमीटर पाणी घेऊन यावे लागे. बाकी पाणी भरायला गडी माणसं असत पण स्वयंपाकाचे आणि पिण्याचे पाणी मात्र घरच्या लोकांना भरावे लागे.

आमच्या आठ दिवसाच्या मुक्कामात दोन-तीन दिवस गावातल्या सरपंच पाटील इत्यादी लोकांकडून आम्हाला शिधा येत असे. त्यात हरभऱ्याची डाळ, गुळ, कणिक, भाजीपाला, आणि दूध यांचा समावेश एका मोठ्या परातीत केलेला असायचा आणि ती परात घरी यायची..  मग त्या दिवशी पुरणपोळीचा बेत केला जायचा आणि दुपारी बारा वाजता त्या घरचा माणूस येऊन ती परत घेऊन जात असे. त्यात तीन-चार पुरणाच्या पोळ्या, कटाची आमटी आणि भात भाजी त्यांच्या घरी पोहोचती केली जायची. बामणाच्या घरचा प्रसाद म्हणून ते श्रद्धेने खात असत ! 

गावातली सगळीच माणसं फार प्रेमळ होती..  मग कुणाकडे उसाचा गुऱ्हाळ असेल तर गुऱ्हाळावर निमंत्रण असायचे. इतरांच्या शेतावर हुरडा खायला निमंत्रण… 

संध्याकाळी कधीकधी काका आम्हाला नदीपलीकडच्या माळावर नेत असत. तिथे बोरीची खूप झाड होती. त्याच्याखाली एक चादर अंथरुन त्याखाली आम्ही मुले बसत असू आणि काका झाड हलवत असत आमचे बोरन्हाण व्हायचे..  अगदी खऱ्या अर्थाने….    मग ते बोराचे भले थोरले गाठोडे बांधून आम्ही घरी येत असू..  संध्याकाळी अंगणामध्ये पाटीमध्ये अगटी पेटवून काकू आणि आईसाठी स्पेशल हुरडा व्हायचा. आम्ही शेंगाचे वेल भाजून घेत असू. ओल्या हरभऱ्याचा हावळा व्हायचा म्हणजे…   वर येणाऱ्या ज्वालावर तो हरभरा भाजून घ्यायचा फार सुंदर लागायचं !आठ दिवस काका काकूंच्या प्रेमळ पाहुणचारात कसे निघून जायचे कळायचं नाही.

रात्री एका खोलीमध्ये आम्ही सगळी भावंड झोपत असू आणि मग तिथे भुतांच्या गोष्टी रंगत ! बाहेर मस्त थंडी..  पोट गच्च भरलेले..  आणि उबदार खोली..  गाढ झोप लागायची ! अस्सल मातीतले अन्न..  वाहत्या नदीचे पाणी..  शुद्ध हवा..  शेतीतला मन प्रफुल्ल करणारा आनंद ठेवा…   यांनी ते आठ दिवस कसे जायचे कळायचंच नाही. आता पाचशे रुपयांचा..  सहाशे रुपयांचा हुरडा मिळतो. पण तो आनंद पुडीत बांधून विकत घेतला तसा प्रकार आहे. हन्नूरवरून सोलापूरला येताना फार वाईट वाटायचं. येताना सामान प्रचंड वाढलेल असायचे. हरभऱ्याची भाजी, उसाच्या कांड्या, बोरं, वाळलेला हुरडा, शेंगाची चटणी, मसाले, अगदी राखुंडी सुद्धा आई बनवून घेत असे. हे सगळं भरभरून देताना काका काकूंना आनंदच व्हायचा..  साधी गरीब शेतकरी माणसं पण अतिशय प्रेमळ ! 

माझ्या शाळेतल्या शिक्षिका, कॉलेजातले प्रोफेसर, शेजार पाजार, मित्र-मैत्रिणी अशा अनेकानी आमच्या शेताचा आनंद घेतला आहे आणि त्यांना तिथे घेऊन जाण्यात आम्हालाही खूप आनंद व्हायचा. एखाद दिवसाची ती त्यांची ट्रीप त्यांच्याही आयुष्यभर लक्षात राहिलीय..  काका काकू आम्हाला स्टॅन्डपर्यंत पोचवायला यायचे. काकू आणि आईच्या डोळ्यात निघताना पाणी असायचे. आमची चुलत भावंडंही आमच्यावर तितकेच प्रेम करणारी होती. त्यामुळे हन्नूरची ओढ आजही आहे.

आता ते तितके मोठे घर, त्यात राहणारी माणसं, सारे हळूहळू वजा झाले..  शेतामधली पीकं पण संपली..  उसाचे गवत शेतात उभे राहिले..  कारण गावाला धरण झाले. सगळे गावच बदलून गेले…..     

तो गाव कुठे हरवला माहित नाही, पण मातीची ओढ मात्र कायम आहे आणि असणार…   !

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments