सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ हसण्याचे वरदान…… – भाग १ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
ती ख्रिसमसच्या दिवसाची पहाट होती, याच दिवसाची धास्ती होती मिसेस बार्टनच्या मनात. त्या जाग्या झाल्या आणि आणि आपल्या खोलीकडे बघू लागल्या, या पहाटेच्या वेळी त्या परिचित खोलीतील ओळखीच्या सर्व गोष्टी धूसर दिसत होत्या. त्यांनी पटकन आपले डोळे मिटून घेतले आणि अगदी हालचाल न करता पलंगावर पडून राहिल्या. त्यांना ज्या दिवसाचा विचारही नको वाटत होता, तो दिवस समोर येऊन उभा ठाकला होता! तीच तर कटकट होती ख्रिसमसची—- तो लांबणीवर टाकणं अशक्य होतं. तो असा काही येऊन कोसळायचा एखाद्यावर, जसा काही प्रत्यक्ष मृत्यूच, अटळ आणि खात्रीशीर!
कारण मिसेस बार्टनना ख्रिसमसची भीति वाटत होती. त्या जेंव्हा रॅनीला पाठवायच्या ख्रिसमसच्या भेटवस्तूंची खरेदी करायला गेल्या, तेंव्हा त्यांच्या हे प्रथम लक्षात आलं. त्यांना रेड क्रॉसच्या मुख्य कार्यालयातून सांगण्यात आलं होतं, की एक नोव्हेंबरलाच जर त्यांनी पाठवायची बॉक्स आणून दिली, तरच रॅनी जिथे कुठे होता, तिथे त्याला ती वेळेवर मिळू शकेल. त्यांना तो कुठे आहे हे माहित नव्हतंच, पण त्याच्या रेजिमेंटचं नाव माहित होतं, आणि रेड क्रॉस मधल्या कोणीतरी त्यांच्यासाठी साधारणपणे, निदान, ती रेजिमेंट कुठे असू शकेल, एवढं शोधून काढलं होतं. त्यामुळे त्या त्याच्यासाठी ख्रिसमसच्या भेटवस्तूंची बॉक्स वेळेत पाठवू शकणार होत्या.
ज्या दिवशी त्या खरेदीसाठी गेल्या होत्या, तेंव्हा दुकानांमधल्या सगळ्या प्रसन्न आणि मित्रत्वाने वागणाऱ्या विक्रेत्या मुलींना त्या मोठ्या अभिमानाने सांगत होत्या, की त्या ही खरेदी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी करत होत्या, “जो आघाडीवर कुठेतरी लढत आहे, ” त्या वेळी त्या आपली ख्रिसमसबद्दल वाटणारी भीति लपवू शकल्या होत्या.
मागच्या वेळच्या युद्धापेक्षा हे, या वेळचं युद्ध अधिक अवघड होतं, कारण या वेळी एक नाही, तर अनेक आघाड्यांवर युद्ध चालू होतं. मागच्या वेळी, जेंव्हा रॅनीचे वडील युद्ध आघाडीवर लढत होते, तेंव्हा अर्थातच, ते कुठेतरी युरोपमधेच आहेत, हे माहित असायचं, आणि त्या लहान होत्या, त्या वेळी त्या इतक्या वेळी युरोपला जाऊन आलेल्या होत्या, की त्या आपल्या लायब्ररीत भिंतीवर लावलेल्या नकाशावरून सहजपणे रॅनाल्डचा मागोवा घेऊ शकत असत. जेंव्हा सॉम्स येथे तो मारला गेला—तरीही, त्यांना ते ठिकाण ठाऊक होतं. पण हे युद्ध! त्यांनी कधीच न बघितलेल्या ठिकाणी आपला मुलगा युद्ध लढत असल्याच्या विचाराने त्यांचे सुंदर राखडी डोळे पाण्याने भरून येत. त्याच्या वडिलांसारखाच तोही कुठेतरी मारला गेला, तर त्यांना त्याचं थडगं बघायला तरी जाता येईल का, या विचाराने त्या शहारून गेल्या.
ती गोड विक्रेती मुलगी त्यांचे भरून आलेले डोळे बघून, त्यांच्याकडे बघून गोडसं हसली आणि तिने विचारलं, “त्याचे डोळे कुठल्या रंगाचे आहेत?”
मिसेस बार्टनचा चेहरा खुलला. “निळे, ” त्या म्हणाल्या, “कोणी कधी बघितले नसतील, इतके निळे!”
“मग हा स्वेटर त्यांना छान दिसेल, ” ती विक्रेती मुलगी म्हणाली. आणि संभाषण पुढे वाढवत म्हणाली, “मला निळ्या डोळ्यांचे पुरुष फार आवडतात. ”
“मला पण, ” मिसेस बार्टन म्हणाल्या. “त्याच्या वडिलांचे डोळे पण निळेच होते. ”
त्यानंतर ते पार्सल पाठवण्याच्या गडबडीत त्या अगदी गुंतून गेल्या होत्या. दुकानांमधे अजुनी ख्रिसमससाठीचे खास पॅकिंग किंवा पाकिटांवर लावायचे विशेष सिल्स* आलेले नव्हते, पण त्यांना आदल्या वर्षी आणलेल्या काही गोष्टी एका बॉक्समधे सापडल्या. आणलेल्या सगळ्या वस्तू पॅक केल्यानंतर खरंच फार सुरेख दिसू लागल्या. आणि त्यांनी काही चॉकलेट्स आणि सुक्या मेव्याचे डबेही आणले होते, जे अगदी गरम हवामानातही चांगले राहतील अशी हमी देण्यात आलेली होती—-पण रॅनी गरम हवेच्या ठिकाणी नव्हताच! एक फ्रुट-केकही त्यांनी त्याच्यासाठी पॅक केलेला होता. शेवटी त्या बॉक्सचा आकार एवढा मोठा झाला, की त्यांना काळजीच वाटायला लागली. समजा, ते म्हणाले, की एवढा मोठा बॉक्स आम्ही नाही पाठवू शकत—नाही, ते एखादे वेळी त्यांना काही सांगणार पण नाहीत—आणि पाठवणारच नाहीत ती बॉक्स! त्या कल्पनेने त्यांना घाबरवूनच टाकलं. आणि मग, घाई घाईने त्यांनी त्या सगळ्या वस्तू काढून तीन छोट्या पॅकेजमधे त्या वस्तू परत पॅक केल्या. या वेळेपर्यंत घरातल्या प्रत्येकालाच त्यांनी कामाला लावलं होतं. बटलर हेन्री, त्याची बायको ॲन आणि ड्रायव्हर डिकन. डिकन सैन्यात भरती होण्याच्या वयाचा होता आणि ख्रिसमसच्या आधीच त्यालाही आघाडीवर जावं लागणार होतं.
“मी तुलाही अशीच एक बॉक्स पाठवीन, डिकन, ” त्यांनी त्याला सांगितलं.
हॅटला हात लावून आदर दाखवत तो म्हणाला, ” धन्यवाद, मॅडम!”
जेंव्हा तो युद्धावर निघून गेला, तेंव्हा त्यांनी दोन्ही गाड्या गॅरेजमधे ठेऊन दिल्या, आता रॅनी येईपर्यंत त्या गाड्या वापरणार नव्हत्या. या दिवसात एक वयस्क स्त्री निदान एवढं तरी करू शकत होती, पेट्रोल आणि रबर (टायरचं) वाचवण्यासाठी! ख्रिसमसच्या आधी दोन आठवडे तो जेंव्हा जायला निघाला, तेंव्हा त्या त्याला म्हणाल्या,
“तुझी इथली ड्रायव्हरची नोकरी तुझी वाट बघतेय, हे विसरू नकोस युद्ध संपल्यावर, डिकन!”
परत त्याने आपल्या हॅटला हात लावला, आणि म्हणाला, “ धन्यवाद, मॅडम!”
त्यांच्या हृदयात एक लहानशी कळ उठली! तो अगदी लहान आणि साधा दिसत होता. मग त्यांच्या लक्षात आलं, की त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं.
“तुझं लग्न झालंय का डिकन?” त्यांनी चौकशी केली.
“नाही मॅडम, ” तो अचानकपणे आलेल्या या प्रश्नाने लाजून लालबुंद झाला.
“आई-वडील असतील ना तुला?” त्यांनी हळुवारपणे विचारलं.
“होय, मॅडम, ” तो म्हणाला.
एवढी प्रश्नोत्तरं झाल्यावर दोघांना काय बोलावं ते काही सुचेनासं झालं, जणू एक मौनाची भिंतच दोघांमधे उभी ठाकली, आणि दोघेही लाजाळू असल्याने दोघे पुढे काहीच बोलू शकले नाहीत.
“अच्छा मग, डिकन” त्या आपला हात पुढे करत म्हणाल्या. “मला नेहमी तुझी आठवण येईल आणि मी तुला शुभेच्छा देत राहीन. ”
“धन्यवाद मॅडम, ” म्हणून त्याने घाई घाईने तिच्या हातात दिलेला हात काढून घेतला. त्यांच्या लांब, सडपातळ हातात त्याचा हात मोठा, तरुण आणि जड वाटला.
या ख्रिसमसच्या दिवशी घरात त्यांच्याशिवाय फक्त म्हातारा हेन्री आणि त्याची म्हातारी बायको ॲन हे दोघेच होते. “आणि म्हातारी मी, ” त्यांनी मनातल्या मनात विनोद करायचा प्रयत्न केला! आणि डोळे मिटलेले ठेऊनच उदासपणे हसल्या, आपल्याच विनोदाला!
आता त्यांनी मान्य केलं, की त्यांना या ख्रिसमसच्या दिवसाची भीति वाटत होती. या भितीवर मात करण्यासाठी काहीतरी निश्चित असा दिवसभराचा प्लॅन बनवणं आवश्यक होतं, नाहीतर आपलं काही खरं नाही, असं त्यांना वाटत होतं. कारण त्यांच्या गुप्त अशा संवेदनशील अंतर्मनात त्यांना नेहमीच हे जाणवत असे, की एक दिवस असा येईल, की आपल्या आयुष्याकडे बघून आपल्यालाच असं वाटू शकेल की हे आयुष्य अगदी निरर्थक आहे!
त्यांच्या वडिलांनी ते साठ वर्षांचे होण्याआधीच, कोणाच्या लक्षात येईल असे काहीही कारण नसताना एकाएकी आत्महत्या केली होती. त्या लहान असताना त्यांना ते अनाकलनीय वाटलं होतं. पण जसजसा काळ पुढे जात गेला, तसतसं, त्यांनी ते का केलं असावं ते त्यांच्या अधिकाधिक लक्षात येत गेलं. आयुष्य असह्य वाटू लागण्यासाठी एखाद्या मोठ्या आपत्तीची अथवा अरिष्टाची गरज नसते. साधंसं निराशाजनक प्रसंगाचं किंवा अपेक्षाभंगाचं साठत जाणंही जीवन असह्य करू शकतं. एक असा क्षण येऊ शकतो, की जेंव्हा मनाचा तोल त्या दिशेला ढळू शकतो. केवळ रॅनीमुळेच त्यांच्या जीवनाला काही अर्थ होता. रॅनीचा जन्म झाल्यापासून त्यालाच वाहिलेलं होतं त्यांचं आयुष्य, आणि आता या युद्धाने त्याला त्यांच्यापासून दूर नेलेलं होतं. हं! हे युद्ध अशा एकुलता एक मुलगा असलेल्या त्यांच्यासारख्या आईसाठी सर्वात जास्त क्रूर होतं!
त्यांच्या मनात त्यांच्या मैत्रिणींचा विचार आला आणि त्यांचं मन कचरलं. त्यातल्या तिघी-चौघी त्यांच्याच सारख्या एकट्या होत्या. जर मी खरोखरच दयाळू असते, तर गरीब बिचाऱ्या मार्नी लुईस आणि बाकीच्यांना ख्रिसमससाठी इथे बोलावलं असतं. पण त्यांना हे माहित होतं, की त्या काही बोलावणार नाहीत. आपल्या एकटेपणात त्यांच्या एकटेपणाची भर घालण्यात काही अर्थ नव्हता. त्यापेक्षा स्वतःच स्वतःला सांभाळणं सोपं होतं. आपण उशिरा उठावं, चर्चला जाऊन यावं आणि मग रॅनीला पत्र लिहून सांगावं, आपल्याला किती एकटं वाटतं ते, असं त्यांनी ठरवलं.
आता त्यांची भीति एकाच बिंदूवर जाऊन स्थिरावली —आज चर्चला जाऊन आल्यावर, जेवण करून, रॅनीला पत्र लिहून झाल्यानंतर त्या काय करणार? निश्चितपणे, प्रत्यक्ष काय करणार त्या? त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांआडून येणाऱ्या अश्रूंनी त्यांचे डोळे चुरचुरू लागल्याची जाणीव होऊन त्या थरथरल्या. मग सावकाशपणे त्या उठल्या आणि पायात स्लीपर घालून बाथरूममधे जाऊन आंघोळ करून, केस विंचरून आल्या. परत पलंगाकडे येताना त्या खिडकीपाशी थांबल्या आणि त्यांनी बाहेर बघितलं. दिवस अगदी स्वच्छ आणि थंड वाटत होता. बर्फ पडलेला किंवा पडताना दिसत नव्हता. रॅनी लहान असताना नेहमी, ख्रिसमसच्या वेळी बर्फ पडू दे अशी प्रार्थना करत असायचा. मोठा झाल्यावरही, अगदी लहानपणासारखी प्रार्थना नाही, पण ख्रिसमसमधे बर्फ असावा अशी त्याची अगदी मनापासून इच्छा असायची, आणि त्या सकाळी बर्फ नसेल पडलेला तर त्याची निषेधात्मक प्रतिक्रिया असायचीच! त्यांच्या चेहऱ्यावर त्या आठवणीनी हसू आलं, आणि ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन तेंव्हाच आलेल्या ॲनला ते दिसल्यावर ती पण त्यांच्याकडे बघून हसली.
“मेरी ख्रिसमस मॅडम, ” ती म्हणाली. तिने ट्रेमधे हॉलीची छोटीशी फांदी ठेवली होती. पुढच्या दारापाशी लावलेली हॉलीची दोन झाडं चांगलीच मोठी झाली होती आणि या वर्षी फळांनी लगडून गेली होती. ती झाडं रॅनीच्या जन्माच्या वेळीच लावलेली होती, बरोबर 27 वर्षांपूर्वी!
“आज सकाळी बर्फ न दिसल्यामुळे रॅनी कसा चिडला असता, याचा विचार करत होते मी, ” त्या हळुवारपणे म्हणाल्या.
“खरंच बाई!”ॲनने त्यांच्या बोलण्याला संमती दर्शवली.
तिने पिवळा सॅटीनचा पलंगपोस त्या मोठ्या पलंगावर नीट घातला आणि ब्रेकफास्टचा ट्रे त्याच्यावर ठेवला.
“ती हॉलीची डहाळी किती सुंदर दिसते आहे!” मिसेस बार्टन म्हणाल्या.
“आनंददायक आणि उत्साहदायक!” ॲन म्हणाली.
“अगदी खरं!” मिसेस बार्टन म्हणाल्या.
स्वतःवरच खुश होत ॲन निघून गेली. आणि मिसेस बार्टननी खायला सुरवात केली. त्यांना फारशी भूक नव्हती, पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. कर्तव्य भावनेने त्या सावकाशपणे, एकेक घास बत्तीस वेळा चावत खात राहिल्या. आजच्या दिवशी रॅनी त्यांना काही निरोप पाठवू शकेल, हे अशक्यच होतं. पण त्याच्या गेल्या वेळच्या पत्रात त्यानी त्यांना बजावलेलंच होतं, की त्याच्याकडून बराच काळ काही पत्र, निरोप आला नाही, तरी त्यांनी काळजी करू नये. तो अगदी सुरक्षित असेल—जरी बराच काळ काही कळलं नाही, तरी तो सुरक्षित नाही, असा विचार त्यांनी करू नये. “बराच दीर्घ काळ, कदाचित, मी तुला पत्र लिहू शकणार नाही, आई!” पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना त्याचं एक कार्ड आलेलं होतं, त्यामुळे आज काही कसली अपेक्षा करण्यात अर्थ नव्हता.
– क्रमशः भाग पहिला
मूळ कथा: पर्ल बक
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈