सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ हसण्याचे वरदान…… – भाग ४ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
(हे खरोखरच खुळचटपणाचंच होतं की ! ही तरुण मुलगी त्यांच्याशी बोलत होती हेच ! “मी तसं म्हंटलं तरीही तू मला बरंच काही सांगितलं आहेस, ” त्या म्हणाल्या.) – इथून पुढे —
तेवढ्यात दार उघडून हेन्री आत आला. समोरचं दृश्य बघून त्याचे डोळे एकदम विस्फारले. आणि मिसेस बार्टनना त्या मुलीची आणि आपली जवळीक त्याला दिसली या गोष्टीने ओशाळल्यासारखे झाले. त्याच्याकडे धारदार नजरेने पहात त्यांनी विचारले, “काय पाहिजे हेन्री?”
“जेवण, मॅडम, ” तो म्हणाला. “टर्की सुकून चालली आहे. ”
ती तरुण मुलगी ताडकन उठली. “आता मला निघालंच पाहिजे, ” ती म्हणाली.
“थांब, ” मिसेस बार्टननी आज्ञेच्या स्वरात तिला विचारले, “तू तुझं ख्रिसमसचं जेवण कुठे घेणार आहेस?”
“ओह, ‘चाइल्ड्स’ मधे, बहुतेक, ” ती मुलगी कणखरपणे म्हणाली. “तिथे एका डॉलरमधे मस्त ख्रिसमसचं जेवण देतात. माझ्याकडे एक डॉलर आहे. मी त्यासाठीच वाचवून ठेवलाय!”
“तुला कोणी नातेवाईक नाहीत?” मिसेस बार्टननी विचारलं.
त्या मुलीने नकारार्थी मान हलवली. “अनाथ आहे मी, ” ती उत्साहाने म्हणाली, “मी एका अनाथालयात मोठी झाले. मला वाटतं, म्हणूनच मी म्हणते, की मला लग्नानंतर दहा मुलं झाली पाहिजेत. भरपूर माणसं असल्याशिवाय ते घर वाटणारच नाही मला. ”
“आता तू रहात नाहीस ना, अनाथालयात?” मिसेस बार्टननी चौकशी केली.
“नाही, नाही, ” ती मुलगी म्हणाली. “सतरा वर्षांचे झाल्यावर ते मुलांना बाहेर पाठवतात. अर्थात ते नोकरी वगैरे मिळवून देतात, मला त्यांनी मिळवून दिलेली नोकरी आवडली नाही, म्हणून मी दुसरी शोधून काढली. पण ते त्यांच्याकडून जितकी जास्त मदत होईल, तेवढी करतात. ”
“हेन्री, ” मिसेस बार्टन म्हणाल्या, “आणखी एक ताट मांडायला सांग टेबलवर. मिस—नाव काय तुझं?”
“जेनी, ” ती मुलगी म्हणाली, “जेनी होल्ट. ”
“मिस होल्ट माझ्याबरोबर जेवेल, ” मिसेस बार्टननी हेन्रीला सांगितलं.
“होय, मॅडम, ” हेन्री दार लावून जाताना म्हणाला, पण त्याच्या आवाजातलं आश्चर्य त्यांना जाणवलं.
“होल्ट हे तुझं खरं आडनाव आहे?” मिसेस बार्टननी विचारलं.
तिने आपली मान हलवली. “ते H मधलं पुढचं नाव होतं, ” ती म्हणाली. “हॅरीसन, होम्स, होल्ट, हटन इ. इ. ”
“म्हणजे, मूळची तू कोण आहेस, याची काहीच कल्पना नाही तुला?” मिसेस बार्टननी विचारलं.
जेनी हसली, आणि परत तिने मान हलवली. “पायरीवर सोडून दिलेलं बाळ!” ती अगदी मजेत बोलली.
मिसेस बार्टन एक क्षणभर जरा विचारात पडल्या. “हं, ” त्यांनी एक उसासा सोडला. “आश्चर्यकारक आहे! बापरे!”
पण मग त्या उठल्या आणि तिला घेऊन वरच्या मजल्यावर निघाल्या. वर गेल्यावर खरं तर त्या तिला पाहुण्यांच्या खोलीत थांबायला सांगणार होत्या, पण एकदम कुठल्या प्रेरणेने कोणजाणे, पण त्यांनी तिला रॅनीच्या खोलीकडे बोट करत सांगितलं, “ही त्याची खोली आहे, तुला हात पाय धुवून फ्रेश व्हायचं असेल तर तिथे जाऊ शकतेस आणि तुला तुझी हॅट काढून ठेवायची असेल तर तिथे ठेऊ शकतेस. ”
“ओह! थॅन्क्यू” जेनी म्हणाली.
त्या आपल्या खोलीत गेल्या आणि दार बंद करून पलंगावर बसून राहिल्या. मग त्यांना वाटलं, की फोटोतल्या रॅनीचे डोळे हळुवार झाले आहेत आणि त्या हॉलीच्या फांदीआडून आपल्याकडे प्रेमाने बघत आहेत.
स्वार्थी, त्यांच्या मनात आलं. होय, मला वाटतं, तो स्वार्थीपणाच होता— तुझ्याशिवाय रहाण्याच्या भितीमागे. ते तरुण डोळे जिवंत असल्यासारखे भासले त्यांना आणि त्यांचे डोळे भरून आले. “ही माझी चूक मी कशी दुरुस्त करू?” त्या पुटपुटल्या. एक दीर्घ क्षण ते डोळे त्यांच्याकडे बघून हसत राहिले. “अर्थातच, मी करू शकते, ”अर्थातच मी करीन. ”
— पण म्हाताऱ्या हेन्रीसमोर काही बोलता येत नव्हतं आणि औपचारिकता पाळण्याच्या गरजेमुळे जेनी थोडीशी वेड्यासारखी आणखी आनंदी बडबड करत होती. या बदामी रंगाच्या डोळ्यातला तो लहान मुलांसारखा मिश्कीलपणा आणि आनंद याला प्रतिसाद न देता रहाणं शक्यच नव्हतं! मिसेस बार्टनना स्वतःच्या हसण्याचं आणि आणि तिच्या बोलण्यावर आपण केलेल्या टिप्पण्यांचं स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. आणि म्हाता-या हेन्रीला तर हे काय चाललंय हेच कळत नव्हतं. त्यांना त्याच्या डोळ्यातला गोंधळ आणि घाबरटपणा बघून आणखी हसू येत होतं. हेन्री जेंव्हा खोलीतून बाहेर गेला, तेंव्हा जेनीने आपलं छोटासा सावळा हात पुढे करून मिसेस बार्टनच्या हिऱ्याची अंगठी घातलेल्या हातावर थोपटलं.
“टिगरने तुमच्यावर अन्याय केलाय असं वाटतंय मला, ” ती अगदी प्रेमाने म्हणाली. “खरं तर त्याला तुम्ही कळलाच नाहीयेत, आणि मी त्याला हे सांगणार आहे. ”
मिसेस बार्टन हे ऐकून गंभीर झाल्या, आणि म्हणाल्या, “म्हणजे, काय म्हणायचं आहे तुला?”
“टिगर कायम म्हणायचा, की तुम्ही फार नाजूक आणि थोड्याशा कठोर आहात, ” जेनी समजून सांगू लागली, “खरं तर तो घाबरतो तुम्हाला. ”
“तो घाबरतो मला?” मिसेस बार्टन म्हणाल्या.
“होय, खरंच घाबरतो तो तुम्हाला, ” जेनी प्रामाणिकपणे म्हणाली. “पण तुम्ही तर छानच आहात, खरंच! मिसेस बार्टन, तुमची विनोदबुद्धी अद्भुत आहे! मला तुमची अजिबात भीति वाटत नाही. ”
मिसेस बार्टननी हातातला चमचा खाली ठेवला आणि त्या एक क्षणभर शांत बसल्या. मग त्यांनी पुढे वाकून जेनीच्या गालावर थोपटलं.
“माझ्या––माझ्या लाडक्या मुली, तू माझ्या मुलाला नक्की सांग, की त्यानं मला घाबरायची गरज नाही!”
त्याचं क्षणी हेन्री प्लम पुडिंग घेऊन आत आला. वर टाकलेली व्होडका पेटवल्यामुळे ते पुडिंग नुसतं झगमगत होतं. त्याच्या वर ठेवलेली हॉलीची छोटी डहाळी पण पेटली होती आणि त्यामुळे पुडिंग वर टाकलेल्या बेरी रत्नांसारख्या झगमगत होत्या.
“ओह!” जेनी अत्यानंदाने म्हणाली, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी असं पूर्ण आणि पेटवलेलं प्लम पुडिंग बघते आहे!” तिने दोन वेळा पुडिंगचे मोठे तुकडे घेऊन चवीने खाल्ले, आणि त्याच्यावरचं हार्ड सॉस तिला क्रीमइतकं मऊ लागलं.
नंतर, लायब्ररीच्या खोलीत फायरप्लेस समोर बसून कॉफी घेताना अचानकपणे मिसेस बार्टनना कित्येक दिवसात वाटलेलं नव्हतं, इतकं शांत आणि आरामशीर वाटायला लागलं. त्यांनी आजचं सुग्रास जेवण अगदी भरपेट खाल्लं होतं, नेहमीपेक्षा खूपच जास्त जेवल्या होत्या त्या, पण त्यांना ते सगळं आपण व्यवस्थित पचवू शकू याची खात्री वाटत होती.
“एक सांगू का तुला?” त्या जेनीला म्हणाल्या, “रॅनी युद्धावर गेल्यापासून मी हसलेच नव्हते. हसण्याजोगी एकही गोष्ट घडली नव्हती, की दिसली नव्हती. ”
त्यांनी त्या चमकदार बदामी डोळ्यांकडे पाहिलं, ते डोळे नेहमीच हसण्याने काठोकाठ भरलेले असायचे. ते बघून परत त्यांना हसू आलं. त्यांनी आपले डोळे रुमालाने पुसले आणि म्हणाल्या, “मी का हसते आहे, कोणजाणे, पण हसल्याने छान वाटतं आहे! युद्ध चालू असलं तरी रॅनी जिवंत आहे! तुलाही असंच वाटतंय ना?”
“मला माहित आहे, तो आहेच!” जेनी ठामपणे म्हणाली.
“पण तुला कसं माहित आहे?” मिसेस बार्टन कुजबुजल्या.
“जर त्याचं काही बरं-वाईट झालं—तर—त्याच क्षणी मला ते कळेल, ” जेनी म्हणाली.
मिसेस बार्टन पुढे झुकल्या. “तू प्रेम करतेस त्याच्यावर, ” त्या म्हणाल्या.
जेनीने होकारार्थी मान हलवली. “माझ्या हृदयाच्या गाभ्यातून, ” ती साधेपणाने म्हणाली.
मिसेस बार्टननी तिच्या हातावर आपलं हात ठेवला आणि विचारलं, “मग, माझ्या लाडक्या मुली, तू त्याच्याशी लग्न करायला नाही का म्हणतेस?”
जेनीचे डोळे भरून आले. “कारण —लग्न करायची भीति वाटते मला, ” ती म्हणाली.
“जेनी, प्लीज!” मिसेस बार्टन म्हणाल्या. “जर तो तुझ्यावर सर्वाधिक प्रेम करणार असेल तर? जर मला वाटत असेल की त्यानं तुझ्यावर सर्वाधिक प्रेम करावं, तर?”
त्या दोघी एकमेकींकडे अत्यंत गांभि-याने बघत होत्या.
“माझ्या मुलाशी तू लग्न करावंस असं मी तुला सांगते आहे!” मिसेस बार्टन हळुवारपणे म्हणाल्या.
“रॅनीएवढ्याच जवळपास तुम्हीही एखाद्याला पटवण्यात पटाईत आहात!” जेनी म्हणाली.
अचानकपणे त्या दोघीही एकदम हसायला लागल्या आणि जेनी उडी मारून उठली आणि तिने मिसेस बार्टनना मिठी मारली. “तुम्ही खरंच मला मोहात पाडलंय!” ती म्हणाली. “मी रॅनीला अगदी सहजपणे नाही म्हणाले होते, पण तुम्हाला नाही म्हणणं अवघड आहे! तुम्ही माझी आई होणार हे मला फार छान वाटतंय. ओह! माझी किती इच्छा होती, मला आई मिळावी अशी! अनाथालयात सगळे माझ्याशी चांगले वागायचे, पण आपली स्वतःची आई असणं ही गोष्टच वेगळी आहे!”
मिसेस बार्टननी आपले हात तिच्याभोवती वेढून तिला जवळ घेतलं, आणि म्हणाल्या, “मग, मला तुझी आई होऊ देशील ना?”
जेनी थोडी मागे सरकली, आणि त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाली, “खरंच वाटतंय का तुम्हाला असं?”
“अगदी हृदयाच्या तळापासून सांगतोय आम्ही, मी आणि रॅनी. लाडक्या मुली, आता येऊन इथेच माझ्या बरोबर रहा आणि रॅनीसाठी छान घर बनव हे!”
जेनीने त्यांच्या गालावर ओठ टेकवले. आणि मग त्यांच्या मिठीतून दूर होऊन आपले हात गालावर ठेऊन बघत राहिली. तिचे गाल गुलाबी झाले होते आणि डोळे चमकत होते.
“पण मी माझी नोकरी चालू ठेवीन हं, मिसेस बार्टन—तो परत येईपर्यंत. ”
“खुशाल चालू ठेव तुझी नोकरी!” मिसेस बार्टन म्हणाल्या.
जेनी ताठ उभी राहिली आणि म्हणाली, “मी रहाण्याचे आणि जेवणाचे पैसे देणार पण!”
“अर्थातच, ” तिच्या स्वाभिमानी वृत्तीचा आदर ठेवत त्या म्हणाल्या.
मग जराशा अनिश्चिततेत ती मागे सरकली आणि मागच्या मोठ्या कोरीव टेबलाला टेकत म्हणाली, “मिसेस बार्टन, मी आता –तुम्ही सांगता का– माझी आणि टिगरची एंगेजमेंट झाली असं समजू शकते का मी?”
“मी नक्कीच म्हणेन तसं, ” मिसेस बार्टन हळुवारपणे बोलल्या.
त्या खोलीतलं वातावारणच एकदम बदलून गेलं. ते मिसेस बार्टनना आधी जाणवलं, कारण जेनीमधला बदल त्यांना दिसत होता. एक प्रकारचं तेज जाणवत होतं तिच्यात. जेनीच्या डोळ्यातून जणू एक प्रकारचा प्रकाश बाहेर पडत होता, आणि संगीतही होतं, शेजारच्या घरातून घन्टांमधून ख्रिसमस कॅरोल्स वाजताना ऐकू येत होत्या. ते संगीत स्वर्गीय वाटत होतं.
“आपण रॅनीला एक तार पाठवायला हवी. ” मिसेस बार्टन हळुवार स्वरात बोलल्या. “अर्थातच आपल्याला ती युद्ध विभागाकडे पाठवायला लागेल, पण त्या तारेत काय आहे ते पाहिल्यावर बहुदा ते ती पुढे त्याला पाठवतील. काय लिहायचं त्यात जेनी?”
“त्याला सांगूया–, ” जेनी अस्पष्ट आवाजात म्हणाली. “त्याला सांगा—“ तिने मान हलवली आणि मग तिला काय बोलावे, ते न सुचल्याने ती गप्पच झाली.
मिसेस बार्टन हसल्या. “मी लिहिते, की तुझं ख्रिसमस प्रेझेंट मिळालं आणि आवडलं. ”
जेनीने होकारार्थी मान हलवली.
“आणखी काय लिहायचं?” मिसेस बार्टननी विचारलं.
बराच विचार करून जेनी म्हणाली, “लिहा की त्याचं लग्न ठरलंय, आणि त्या खाली तुमची सही करा, आणि टिग्रेस लिहा, त्याला समजेल मग. ”
मिसेस बार्टन परत हसल्या. त्यांना असं जाणवत होतं, की इथून पुढे त्यांचं आयुष्य हसण्याने भरून जाणार होतं. त्यांनी खरोखरच रॅनीबाबत केलेली चूक पूर्णतः सुधारली होती!
– समाप्त –
मूळ कथा: पर्ल बक
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान! वाचकांना खिळवून ठेवते.