सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
माहेर नसलेल्या मुली
कुठं जात असतील सणावाराला?
सासरी थकून गेल्यावर
चार दिवसांच्या माहेरपणाला?
कुणाला सांगत असतील
नवऱ्यानं झोडपल्यावर
भरलेल्या घरात
पोरकं पोरकं वाटल्यावर?
माहेर नसलेल्या मुलींचं
गाव कोणतं असेल?
कुठून घेत असतील त्या साडी चोळी
कुणाला बांधत असतील राखी
वडील भावाची ढाल नाही म्हणून
त्या नेहमी भिऊन राहत असतील का जगाला?
दुसऱ्यांच्या आईचा खरखरीत हात
नातवांच्या तोंडावरून मायेनं फिरताना पाहून
काळीज जळत असेल का त्यांचं?
माहेर नसलेली मुलगी
आपल्या लेकरांना कसं सांगत असेल
मामा- मामी आजी- आजोबा या हक्काच्या नात्यांबद्दल?
मामाच्या गावाला जायचं
गात असतील का तिचीपण मुलं?
आईनं दिलेल्या वानवळ्याच्या पिशव्या कोणी पोचवत असेल का त्यांना?
बापानं उष्टावून आणलेला रानातला पेरू
कधी मिळत असेल का त्यांना खायला?
माहेर नसलेल्या मुली
निवांत झोपू शकत असतील का कुठं
जिथून त्यांना कुणीही लवकर उठवणार नाही?
कधी घेत असतील का त्या मोकळा श्वास
फक्त त्यांचाच अधिकार असलेला?
माहेर नसलेल्या मुलींना
येत असतील का रोज आईचे फोन
तू बरी हाईस का विचारणारे?
कधी तिला आवडतं म्हणून घरात काही बनतं का
की ती उपाशी निजली
तरी कुणाच्या लक्षातही येत नसेल?
माहेर नसलेल्या मुलींचे हुंदके
विरत असतील का हवेत
कुणीही तिला उराशी न कवटाळता?
किंकाळी फोडून रडावं
अशी कूस असलेली जागा मिळते का त्यांना कधी कुठं?
माहेरचा आधार नाही म्हणून
माहेर नसलेल्या मुलींना
जास्तच छळत नसेल ना नवरा?
त्रास असह्य झाल्यावर
माहेरला निघून जाईन
अशी धमकी देत असतील का त्या नवऱ्याला?
घर सोडून कुठंतरी जावं या भावनेनं
हजारदा भरलेली पिशवी पुन्हा फडताळात ठेवताना
चिंध्या होत असतील का त्यांच्या काळजाच्या?
माहेरची माणसं असूनही
माहेर नसलेल्या मुलींची वेदना खोल
की माहेरच्या माणसाचा मागमूसही न राहिलेल्या मुलीची जखम ओली
हे ठरवता येत नाही
माहेर नसलेल्या मुली
त्यांच्या लेकी-सुनांचं माहेर बनून
भरून काढत असतील का
स्वत:ला माहेर नसण्याची उणीव?
माहेर नसलेल्या मुलींना
आयुष्याच्या शेवटाला
कोण नेसवत असेल माहेरची साडी
की निघून जात असतील त्या
या जगातून
‘माहेर नसलेली मुलगी’
हेच नाव धारण करून?
☆
कवयित्री : सौ. लक्ष्मी यादव
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
फारंच सुंदर काव्य.
मनाची घालमेल.
आक्रंदून गेलेलं मन.
भाव विश्वाचा झालेला चुराडा.
कुठेच ठाव नसलेलं विश्व.
स्त्री जन्मा ची ही कहाणी
अतिशय सुंदर कवित्वात
गुंफलेली असली तरी
” माहेर नसलेल्या स्त्री चे
जीवन हे वाचकाला देखील
आंदोलित करते
तेंव्हा स्त्री च्या मनाला
किती वेदना होत असतील
ह्याची कल्पना करवत नाही.
अ.ल. देशपांडे अमरावती.
9225705884
वेचलेले , संग्रहित केलेल्या
काव्य मोत्यांची माळ पण सुंदरंच.