श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ नेत्रदान–एक राष्ट्रीय गरज :👁️👁️ – लेखक : श्री. वि. आगाशे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जगातील एकूण नेत्रहीन व्यक्तिंपैकी २० टक्के म्हणजे सव्वा कोटी नेत्रहीन भारतात असून त्यातील ३० लाख नेत्रहीन व्यक्तिंना नेत्ररोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. सगळ्याच नेत्रहीनांना नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकत नाही. ज्यांची पारपटले निकामी झाली आहेत, परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे, त्यांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते कारण नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्याचे रोपण नव्हे तर फक्त ह्या पटलाचेच रोपण होय. ह्यालाच सर्वसाधारणपणे आपण नेत्ररोपण म्हणतो. मृत व्यक्तींच्या नेत्रदानामुळेच हे नेत्ररोपण करणे शक्य होते. नेत्रदान हे रक्तदानाप्रमाणे जिवंतपणी नव्हे तर ते मरणोत्तरच करावयाचे असते. कुठल्याही जिवंत व्यक्तीस नेत्रदान करता येत नाही.

तीस लाखांना दृष्टी देणे आपल्याला सोपे वाटेल, पण तसे नाही, कारण आपली भयानक, तिडीक आणणारी निंद्य अनास्था आणि मला काय त्याचे ही वृत्ती!😪

दरवर्षी भारतात सुमारे ८० लाख मृत्यु होतात. परंतु ह्यातील फक्त सुमारे ३० हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते. भारतात जी नेत्ररोपणे होतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात दान केलेले नेत्र हे श्रीलंकेसारख्या आपल्या छोट्याशा शेजारी राष्ट्राकडून आलेले असतात. भुवया उंचावल्या ना? ही भयानक वस्तुस्थिती आपल्यासारख्या १४० कोटी लोकसंख्येच्या मोठ्या राष्ट्राला आत्यंतिक लाजिरवाणीच नव्हे काय?

आपला देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण होत आहे. तो ह्या आघाडीवरही स्वयंपूर्ण व्हावा असे आपल्यासही नक्कीच वाटेल. म्हणूनच ही एक राष्ट्रीय गरज ठरते.

नेत्रदान कोण करू शकते?

* जन्मजात बालकापासून अगदी १०० वर्षांच्या स्त्री-पुरुषांपर्यंत कोणाचेही नेत्रदान होऊ शकते.

* कोठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले, मधुमेही आणि रक्तदाब पिडीतही नेत्रदान करू शकतात.

* मृत व्यक्तिस एड्स, अलार्क (रेबीज), कावीळ, कर्करोग, सिफीलीस, धनुर्वात किंवा विषाणूंपासून होणारे रोग, तसेच नेत्रपटलाचे रोग असल्यास अशा व्यक्तिंचे नेत्र रोपणासाठी निरुपयोगी ठरतात. परंतु ही नेत्रपटले सराव आणि संशोधनासाठी वापरतात. तेव्हा अशा व्यक्तिंचे नेत्रदान व्हावे की नाही हे कृपया नेत्रपेढीच्या डॉक्टरांनाच ठरवू द्यावे. आपणच काहीतरी ठरवू नये.

* अपघातात मृत झालेल्या व्यक्तिंचे डोळे, म्हणजेच नेत्रपटल चांगल्या स्थितीत असल्यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेत्रदान होऊ शकते.

* ज्यांचे पारपटल चांगले आहे, परंतु इतर काही दोषांमुळे अंधत्व आलेले आहे अशा अंधांचेही नेत्रदान होऊ शकते. म्हणजेच अशा अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.

* *मृत्युनंतर लवकरात लवकर, ३ ते ४ तासांपर्यंत (अपवादात्मक स्थितीत ६ तासांपर्यंत) नेत्रदान होणे आवश्यक असते. म्हणूनच नेत्रदानाची इच्छा मृत्युपत्रांत व्यक्त करु नये. ते निरर्थक असते. कारण मृत्युपत्र काही दिवसांनंतरही उघडले जाते.

* नेत्रदानासाठी जवळच्या नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र मात्र जरुर भरावे. त्यातून आपली इच्छा लेखी स्वरुपात व्यक्त होऊन ती साक्षीदार म्हणून सही करणाऱ्या जवळच्या नातलगांना वारसांना माहीत होते. आपली इच्छा जवळचे नातलग, शेजारी, मित्र-मैत्रिणी ह्यांनाही आवर्जून सांगावी, किंबहुना प्रतिज्ञापत्र भरताना ते सामूहिकपणे, एकत्र बसून चर्चा करून भरणे सर्वोत्तम होय! त्यातून आपली इच्छा आणि ह्या कार्यासही एक सामूहिक बळ प्राप्त होते. तसेच आपली इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता वाढते.

* नेत्रपेढीकडून आपल्यास डोनर कार्ड मिळते. आपण नेत्रदान केलेले असल्याचे दर्शविणारे हे कार्ड कायम आपल्यासोबत बाळगावे.

* आपल्या डायरीत आसपासच्या सर्व नेत्रपेढ्यांचे दूरध्वनी क्रमांक ठळकपणे नोंदवून ठेवावेत तसेच भिंतीवरही लावावेत.

* नेत्रदात्याच्या मृत्युनंतर नेत्रपेढीला लगेच नेत्रदानाविषयी कळविणे महत्त्वाचे असून हे काम नातलग, शेजारी, मित्र-मैत्रिणी करु शकतात. त्या वेळेच्या भावनात्मक स्थितीचे कारण काही जण सांगतात परंतु ते लटके आहे. अशा स्थितीतच जेव्हा आपण नातलग, ओळखीच्यांना वगैरे दूरध्वनीवरून कळवितो तसेच नेत्रपेढीलाही दूरध्वनीवरुन कळवायचे एवढेच!

* मृत व्यक्तिने ज्या नेत्रपेढीचे प्रतिज्ञापत्र भरले आहे त्याच नेत्रपेढीला कळविणे आवश्यक नाही. त्या ठिकाणच्या जवळच्या नेत्रपेढीला कळविणे वेळेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

* मृत व्यक्तिने प्रतिज्ञापत्र भरलेले नसतानाही वारसदार व्यक्ती मृत व्यक्तिचे नेत्रदान नेत्रपेढीला कळवून करु शकतात. ह्या दृष्टिने नेत्रदानाचे महत्त्व, राष्ट्रीय आवश्यकता पाहता कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की आपल्या परिसरात, नात्यात कुणाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तिच्या नातलगांना नेत्रदानाविषयी जरुर सुचवावे, त्यासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करावेत. अशा प्रकारे जिवंतपणीच आपण नेत्रदानविषयक मोठे काम करु शकाल.

* नेत्रदानास धार्मिक बंधन नाही. कोठला धर्म अशा महान कार्यास विरोध करेल ?

नेत्रपेढीला कळवितानाच खालील बाबी पार पाडाव्यात –

* डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र त्वरित मिळवावे. शक्यतो त्यांनाच १० सी. सी. रक्ताचा नमुना घेऊन ठेवण्यास सांगावे.

* मृताचे डोळे व्यवस्थित बंद करुन पापण्यांवर बर्फ अथवा ओल्या कापसाच्या/कापडाच्या घड्या ठेवाव्यात. शक्य असल्यास डोळ्यात जरुर आयड्रॉप्स टाकावेत.

* पंखे बंद करावेत तसेच वातानुकुलन यंत्र असल्यास ते जरुर चालू ठेवावे. जवळ प्रखर दिवे नसावेत.

* मृत व्यक्तिस शक्यतो कॉटवर ठेवावे आणि मृत व्यक्तिचे डोके २ उशांवर ठेवावे.

* नेत्रपेढीला कळविल्यावर नेत्रपेढीचे डॉक्टर मृत व्यक्ती जेथे असेल तेथे येऊन अर्ध्या तासात नेत्र काढून नेतात, त्यासाठी जंतुविरहित खोलीची आवश्यकता नसते. नेत्र काढल्यावर कृत्रिम नेत्र किंवा कापसाचे बोळे ठेवून पापण्या व्यवस्थितपणे बंद केल्या जातात त्यामुळे मृत व्यक्तिचा चेहरा विद्रूप दिसत नाही.

* हे नेत्र खास फ्लास्कमधून नेत्रपेढीत नेले जातात. त्यावर काही प्रक्रिया करून ४८ तासांच्या आत नेत्रपेढीच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे दोन ते सहा नेत्रहीन व्यक्तींना बसविले जाऊन त्यांना नवजीवनच देण्याचे महान कार्य करतात.

* आपणही हे अमूल्य दान करु शकतो. कदाचित जीवनभर समाजाच्या उपयोगी पडलो नाही तरी मरणोत्तर नेत्रदानाने दोन ते सहा दृष्टिहिनांच्या रंगहीन जीवनात अमूल्य दृष्टिचे रंग भरु शकतो, त्यांना नवजीवनच देऊ शकतो.

 

लेखक… श्री. वि. आगाशे

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments