श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

योजकस्तत्र दुर्लभ:! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कै. संतोष नरहर काळे

योजकस्तत्र दुर्लभ:! 

अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:! 

अर्थात कोणतीही व्यक्ती (पूर्णांशाने) अयोग्य नसतेच. फक्त त्या व्यक्तीचा योग्य त्या कार्यात उपयोग करणारे दुर्लभ असतात. हे आठवायचं कारण म्हणजे अशा एका योजक व्यक्तीचं तसं अकाली निघून जाणं होय. कदाचित या योजकाची जगाच्या योजकाला आवश्यकता काहीशी तातडीने भासली असावी. अन्यथा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सेवा कार्यात अग्रेसर राहून अगणित लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत पूजनीय स्थान प्राप्त करण्याच्या मार्गावर खूप पुढे गेलेल्या माणसाचं, अर्थात संतोष नरहर काळे गुरुजी यांचे वयाच्या पासष्टीमध्ये निधन होणं मनाला पटणारं नाही. त्याचं जाणं अकाली म्हणता येत नसलं तरी अशा माणसाची समाजाला आणखी गरज होती, हे मात्र त्या दिवशी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेला विविध क्षेत्रांमधील समुदाय पाहून दिसले. असो.

पुण्याच्या जवळच्या निगडीच्या काहीशा ओबडधोबड माळरानामध्ये प्राधिकरण नावाची एक सुनियोजित वस्ती उभारण्यात आली. नियोजनानुसार ही वस्ती चहूबाजूंनी फुलली सुद्धा. येथे समान शील… सख्यम न्यायाने एकसमान विचारधारेची माणसं एकत्रित येणंही साहजिकच आणि त्यांच्या नेतृत्वाची गरजही तितकीच नैसर्गिक.

नेमक्या याच पोकळीत बी. एस्सी. पदवी प्राप्त एक तरुण, अक्षरश: हरहुन्नरी कार्यकर्ता येऊन स्थिरावला आणि त्याने माणसं जमवायला सुरुवात केली. नोकरी हा त्याच्या पत्रिकेत अजिबात नसलेला ग्रह. त्यामुळे नोकरीच्या फंदात सहसा न पडता त्याने आपला बराचसा वेळ ज्योतिषाचा अभ्यास, गड-किल्ल्यांचा अभ्यास, पोवाडे गायन, इतिहास संशोधन आणि या क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या सहवासात आणि चौफेर भ्रमंती यात व्यतीत करायला आरंभ केला आणि हाच क्रम शेवटपर्यंत राहिला. नाही म्हणायला दहावीपर्यंतचे गणित-शास्राच्या शिकवण्या घेणे, किल्ल्यांची स्वत: काढलेली छायाचित्रे ग्रीटींग कार्ड स्वरुपात छापून त्यांची विक्री करणे, वैशिष्ट्यपूर्ण दैनंदिनी छापून घेणे, मसाला-लोणची घाऊक विक्री अशा अनेक उद्योगांतून त्याने पैसे वगळता अनेक गोष्टी कमावल्या! यातील अनेक उद्योग तर त्याने संपर्कातील तरुणांना चांगल्या अर्थाने ‘चांगलेच कामाला’ लावण्यासाठीच केले असावेत! 

पण यातील शिकवणी घेणे या एका गृहोद्योगातून त्याच्या प्रभावक्षेत्रात कित्येक युवक युवती आले. मग हीच लहान मोठी मुले-मुली त्याच्यासोबत किल्यावर बागडताना दिसू लागली. काहीजण त्याच्या सोबत पोवाड्यात साथ करायला जाऊ लागली. हे कार्य करता करता अनेक मुलांच्यात असलेला कार्यकर्ता तो विकसित करूही शकला.

छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी मुक्कामी राहून तेथे त्यांचा पोवाडा सादर करण्याची कल्पनाही त्याचीच. त्या कार्यक्रमासाठी साठी दरवेळी नवनवीन मुलांना तेथे घेऊन जाणे याकडे त्याचा कटाक्ष असे.

आपल्या भाग्यात काय लिहिले आहे किंबहुना आपल्या भाग्यरेषा आपल्या जीवनाला कुठे घेऊन जाताहेत, हे समजून घेण्याची सामान्यजणांची ओढ आणि निकड त्याने खूप आधी ओळखली होती. पत्रिका दाखवायला आलेल्या माणसांच्या पत्रिकेत समाजसेवेचा अगदी सामान्यातला सामान्य ग्रह जरी याला दिसला… की त्या माणसाच्या सामाजिक पत्रिकेतील भाग्यस्थानी एखादा तरी चांगला कर्मग्रह अलगद येऊन बसायचा. व्यक्तीची एकूण सर्वसाधारण मनोवृत्ती लक्षात घेऊन, त्या व्यक्तीला बिलकुल घाबरवून न ठेवता त्याचे भविष्य तो अचूक वर्तवायाचा. त्यामुळे त्याच्या घरी विद्यार्थ्यांचा, पालकांचा, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. जोडीला अनेक व्याधींवरील देशी उपचार ज्ञात असलेल्या या माणसाकडे औषधीविषयक सल्लाही उत्तम मिळायचा! 

निगडी प्राधिकरणात महामार्ग ते रेल्वे रूळ असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज चौक असा एक भाळा मोठा, रुंद रस्ता आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आहेत. या दुभाजकाच्या मधल्या जागेत कचरा टाकावा असे कुणाला कधी सांगावे लागले नाही. ही समस्या लक्षात घेऊन आपल्या या लेख नायकाने या जागेत शोभेची झाडे, वनस्पती लावाव्यात अशी कल्पना मांडली. ज्यांनी या कल्पनेला अनुमोदन दिले ते लोक ही बाब काही गांभीर्याने घेत बसले नाहीत. पण या महाशयांनी मात्र संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करीत राहून ते काम सुरु होईल असे पाहिले. आणि आरंभी स्वत: त्या कामाचा ठेका घेतला… अर्थात केवळ ठेका. अर्थप्राप्ती आणि हा माणूस यांत आधीपासून होता तो दुभाजक कायमच राहिला. आज हा दोन तीन किलोमीटर्सचा रस्ता वाहतुकीतला एक प्रेक्षणीय भाग आहे.

हा माणूस बहुदा जन्मत:च ज्येष्ठ वगैरे असावा. कारण तो तरुण कधी दिसलाच नाही, पण कायम तरुणांमध्ये दिसला, लहान मुलांमध्ये दिसला. पोरांना किल्ले दाखवायचे आणि मग ते दिवाळीत करायला लावायचे त्याला जमायचे. लहान मुलांचा काका व्हायला तर त्याने अजिबात वेळ लावला नाही. इतरांसाठी दादा तर तो होताच पण त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान पोरं त्याला एकेरीत सुद्धा हाक मारू शकायची, यातच त्यांचं सामाजिक यश सामावलेलं होतं.

डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा. त्यातून दिसणारे चमकदार डोळे. आणि त्या डोळ्यांतून त्याचं ते माणसांकडे पाहणे… एकदम स्पष्ट असे. बोलता बोलता उजवा हात नाकावरून घासत थेट कपाळापर्यंत नेणे, ही लकब. आणि हसणं अगदी खळखळून. सर्व वयाच्या लोकांसाठी त्याच्याकडे स्वतंत्र किस्से आणि विनोद होते.

त्याचे बाबा सुद्धा अगदी लहान मुलांची इंग्लिशची शिकवणी घेत असत. त्यामुळे हे लहानगेच पुढे बढती मिळून याचे विद्यार्थी बनत.

ज्योतिषाचा पसारा वाढत गेल्यावर हे मग गुरुजी म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले. पत्रिका दाखवायला येणारा माणूस सुरुवातीला क्लाएन्ट असायचा आणि थोड्याच वेळात त्याचे स्नेह्यात रुपांतर व्हायचे.

एक अफाट उपक्रम काळे गुरुजींनी हाती आणि डोक्यात घेतला होता. आणि तो म्हणजे वेदअध्ययन आणि अध्यापन. त्यासाठी या आधुनिक काळात किती साधना करावी लागत असेल याची कल्पना आपल्यासारख्या सामान्य लोकांना येणार नाही.

पुण्याजवळच्या ग्रामीण भागात त्यांनी एक रीतसर आश्रमसुद्धा उभारला होता. यासाठीची आर्थिक तरतूद ही केवळ त्यांचे समाजाशी असलेले आणि जोपासलेले वैय्यक्तिक संबंध आणि प्रामाणिक हेतू यांमुळेच होत असावी. अन्यथा अर्थप्राप्तीचा कुठलाही मोठा स्रोत नसताना अशी मोठी कामे उभी राहणे, केवळ अशक्य. आणि एवढं सगळं होत असताना संसारिक माणूस सुख-दुखा:चे, वैद्यकीय समस्यांचे प्रसंग जे अपरिहार्यपणे भोगतो… ते त्यांनाही चुकले नाहीत. पण एक मोठा माणूस होण्याच्या त्यांच्या अखंड प्रवासात हे भोग त्यांनी शांतपणे पचवले! त्यांच्या निधनाची वार्ता कानी येताच त्यांच्या घराकडे लागलेली रीघ पाहून सौर्हादाची श्रीमंती कमावलेला मनुष्य समाजाने गमावला आहे, ही जाणीव गडद होत होती!

पण गेली काही वर्षे ते त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला एक स्वप्नवत योजना सांगत असतच… भव्य चौसष्ठ योगिनी मंदिर! या मंदिराची सर्व योजना, आराखडा, रेखाटने त्यांच्या खिशात कायम असत. या कामासाठी त्यांनी अनेक माणसं योजून ठेवली होती. ही भव्य योजना ऐकून ही योजना यशस्वी होईल किंवा कशी होईल, अशी काळजी ऐकणा-याच्या चेहर-यावर दिसू लागली की काळे त्याच्याकडे पाहून फक्त गूढ हसत… जणू म्हणत…. बरंचसं काम झालंय रे… तू फक्त तुझा वाटा उचल! आणि खरोखरच मागील काही दिवसांत चौसष्ठ योगिनीच्या मूर्ती तयार झाल्याही होत्या. आता योजनेचा पुढील अध्याय सुरु व्हायचा होता… पण संतोष काळे गुरुजींच्या श्वासांचा अध्याय समाप्त झाला !

असे योजक दुर्लभ असतात हे खरे ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments