श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ ‘जग’ ‘जग’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

शीर्षक वाचल्यावर वाचकांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की कोणाला ‘जग’ ‘जग’ म्हणून सांगितले जातेय. अहो, आपल्यालाच. आता दुसरा प्रश्न पडला असेल की आम्ही जगतोय आहोत मग आणखी कसे जगायचे ? हा प्रश्न मात्र अधिक खरा आणि आपल्या विषयाशी निगडित आहे असे मला वाटते. या जगात अनेक जीवजंतू, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आणि स्वाभाविक मनुष्य जगत असतात. यातील मनुष्य वगळता इतर सर्व योनीतील जीव प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम नैसर्गिकरित्या जगत असतात. मनुष्य मात्र या सर्वांस अपवाद आहे. त्यालाही प्रारब्धक्रमाने लाभलेला जीवनक्रम असतोच परंतु मनुष्याला बुद्धीचे/ विचार करण्याचे विशेष वरदान लाभल्यामुळे मनुष्य कधी सुखी तर कधी दुःखी होताना आपण पाहतो.

हे जग (सृष्टि) भगवंताने निर्माण केली आहे असे आपण मानतो. जर ती भगवंताने निर्माण केली असेल तर ती नक्कीच आनंददायी असली पाहिजे. पण दैनंदिन जीवनात मनुष्य आनंदी असल्याचे आपल्या दृष्टीस पडतेच असे नाही. असे का होत असावे ? आपल्याला कोणी विचारले की तुम्हाला सुखात जगायला आवडेल की दुःखात ? तर माझ्यामते येथील प्रत्येक जण सुखात जगायला आवडेल असेच सांगेल. मग तरीही बरीचशी माणसे दुःखात असल्याचे आपल्या निदर्शनास येते, असे का व्हावे ? जग भगवंताने निर्माण केलेले असूनही बरीचशी माणसे दुःखात आहेत याचा अर्थ कोणीतरी नक्की चुकत असलेच पाहिजे. एकतर भगवंत किंवा मनुष्य. भगवंत चुकणे शक्यच नाही म्हणजे जर चुकी असेलच तर ती फक्त मनुष्याची असली पाहिजे.

शिर्षकातील पहिला ‘जग’ हा सृष्टी (जगाचा) दर्शक आहे. म्हणून आपण त्या ‘जगा’बद्दल चिंतन करू. दैनंदिन जीवनात ‘जग काय म्हणेल’?, जगाची चिंता करू नये ? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न एकतर आपल्याला पडतात किंवा कोणीतरी असे प्रश्न विचारेल याची आपल्याला सतत भीती वाटत असते. आणि विशेष म्हणजे आपल्या कसोटीच्या क्षणी, आपल्या पडत्या काळात या ‘जगा’तील फार थोडी मंडळी आपल्याला मदत करायला पुढे येतात आणि तरीही मनुष्याला ‘जग काय म्हणेल याची चिंता असते हे नवल नव्हे काय ?

‘जिवो जीवस्य जीवनम्’ असा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वाभाविकपणे प्रत्येक मनुष्यास लागू पडतो. याचा सरळ अर्थ असा आहे की या जगातील प्रत्येक प्राणी कोणत्या न कोणत्या स्वरूपात एकमेकांवर अवलंबून आहे. बाकीच्या प्राण्यांचे सोडून दिले आणि आपण फक्त मनुष्याचा विचार केला तरी मनुष्य ‘सामाजिक’ प्राणी असल्यामुळे तो एकटा राहू शकत नाही. त्यामुळे जगण्यासाठी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागते. आदिम काळापासून तो समूहानेच राहत आलेला आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे मनुष्याला ‘विचार’ करण्याची विशेष देणगी प्राप्त आहे. त्यामुळे मनुष्याने आपली सर्वच क्षेत्रात प्रगती करून घेतली आहे आणि स्वतःची सर्वांगीण उन्नत्ती करून घेतली आहे. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात मनुष्याने उत्तुंग आदर्श निर्माण करून ठेवले आहेत. इतके सारे असूनही मनुष्य खऱ्या अर्थाने ने आनंदी झाला, ‘जगायला’ शिकला असे मात्र आपण छातीठोकपणे म्हणू शकत नाही. आता ‘जगणे’ आणि ‘जगणे’ यात काय फरक असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

एकदा शांत बसून मनाला प्रश्न विचारला की आपण आज खरंच जगलो की नाईलाजाने दिवस ढकलला ? उत्तर आपल्यापाशीच आहे. सर्वसामान्य मनुष्य रोजच्या धकाधकीमुळे गांजून गेला आहे असे आपल्याला जाणवेल. श्रीराम

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खरं आहे अगदी! मानवाला जास्तीची देणगी म्हणजे नीतीनियम बनवता येतात,तोडता येतात,त्याचं समर्थन करता येते.बाकी आपणही जंगलातील पशुंच्या कायद्यांनीच रहातो.