श्री कमलाकर नाईक
वाचताना वेचलेले
☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
काही घटना, काही शब्द, काही ओळी काळजावर छिन्नीने अशा कोरल्या जातात की सदैव दिसत राहतात. काळाची धूळ बसली तरी तो झिरझिरीत पडदा त्यांचे अस्तित्व पुसू शकत नाही. कधीतरी आनुषंगिक संदर्भ ती धूळ पुसतात आणि मग ते कोरीव काम लख्ख दिसू लागते.
गेली अनेक वर्षे अशी अनेक कोरीव लेणी मनात टिकून राहिली आहेत.
काल आपटे हायस्कूलच्या एका माजी विद्यार्थ्याने एक जुना फोटो पाठवला. त्याच्या खाली त्याने लिहिले होते, ” बाई, सततआठवते का?”
ही आव्हाने जितकी नाजूक असतात, तितकीच मुश्किलही असतात. पण एखाद्या लहान मुलीने स्वतःच डोक्यावर चादर घ्यावी आणि काही क्षणात स्वतःच ती दूर करून बोळके पसरून हसावे तशी त्यांच्यावरची अनेक आवरणं झुगारून ती कधीकधी स्वतःच उघड होतात.
तसेच झाले आणि त्या फोटोतला काळ दूर गेलाच नसल्यासारखा समोर येऊन उलगडला.
परमवीरचक्र विजेत्या पैगंबरवासी अब्दुल हमीदच्या वीरपत्नीला शिवणकाम करून पोट भरावे लागते, अशा बातमीने व्यथित होऊन ती मी माझ्या ९ वी ब च्या वर्गात वाचून दाखवली. त्या व्यथेतून एक मोठा उपक्रम आकाराला आला-‘ पै. अब्दुल हमीद कृतज्ञता निधी. ‘७८ मुलांच्या वर्गानं स्वकमाईने ‘कृतज्ञता निधी’ उभारला. त्यात नंतर ९वी क देखील सामील झाला व समाजातल्या काही संवेदनशील व्यक्तींनीही थोडी भर घातली.
पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात, एका भव्य कार्यक्रमात, ल. आपटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पु. ग. वैद्य, श्री. शशिकांत सुतार, विक्रम बोके, पुण्यात स्थायिक झालेल्या परमवीरचक्र विजेत्या श्री. रामराव राणे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती राजेश्वरी राणे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत दै. सकाळचे तत्कालीन व्यवस्थापक श्री. के मो. भिडे यांच्याकडे तो निधी जाहीरपणे सुपूर्त केला गेला.
याची दोन कारणे होती. एक म्हणजे तो उपक्रम दै. सकाळमधील बातमीमुळेच आकाराला आला होता आणि दुसरे म्हणजे हा निधी सार्वजनिक कामातून उभा राहिला होता म्हणून तो सार्वजनिक रूपातच जाहीरपणे हस्तांतरित होणे गरजेचे होते.
राखीपौर्णिमेचा दिवस यासाठी निवडला होता कारण ती भावनाही या कार्यक्रमाच्या मागे होती. मुलांच्या तुडुंब उत्साही गर्दीत कार्यक्रम शानदारपणे पार पडला. पाटेकरांनीही या निधीत मोलाची भर घातली. व्यासपीठावरच्या संपूर्ण कार्यक्रमातल्या सर्व भूमिका मुलांनी जबाबदारीने अचूक पार पाडल्या. कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावरच्या सन्माननीय व्यक्तींना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. त्यांच्यासाठी चहा-बिस्किटे सतत मागवली जात होती. टिळक स्मारकच्या खालच्या कँटिनमधून भरलेले ट्रे वर येत होते. माझ्याही भोवती गर्दी असल्याने मला याचा कोणताही हिशेब ठेवता येत नव्हता….
हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला आणि कँटिनचे मालक श्री. भागवत माझ्याजवळ आले. त्यांच्या हातात झालेल्या चहापाण्याचे बिल होते. माझ्या पोटात गोळा आला. स्टेजवर जाणारे ते भरलेले ट्रे दिसू लागले. किती रक्कम मांडली असेल कोणास ठाऊक अशा विचारातच मी ते बिल हातात घेतले.
बिलातल्या रकमेच्या खालच्या जागेत लिहिले होते- ‘ही रक्कम आमच्यातर्फे आपल्या ‘कृतज्ञता निधी’त जमा करावी. ‘ उपक्रमाचे कौतुक करून, नमस्कार करून ते शांतपणे निघून गेले. शाळेत शिकवत असलेल्या कवितेच्या कोरीव ओळी माझ्या डोळ्यासमोर नाचू लागल्या-
‘ज्योत ज्योतीने जागवा
करा प्रकाश सोहळा
इवल्याश्या पणतीने
होई काळोख पांगळा. ‘
* * *
आपटे प्रशालेच्या नववी ब व ९ वी क च्या मुलांनी हा ‘कृतज्ञता निधी’ जिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उभारला होता त्या वीरपत्नीला – श्रीमती रसूलन बेगम यांना उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून ८० किलो मीटर दूर असलेल्या धामुपूर येथे प्रत्यक्ष जाऊन तो देण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हते.
दै. सकाळने मुलांचे कष्ट, त्यांच्या भावना व त्यांच्यातील सामाजिक कर्तव्यांचे भान यांचे मोल जाणून त्यांचे लखनौ येथील प्रतिनिधी श्री. शरद प्रधान यांच्याकडे हे काम सोपवले. मुलांनी वीरपत्नीसाठी हिंदी व उर्दूमध्ये लिहिलेले प्रातिनिधिक, हृदयस्पर्शी पत्रही त्यांच्याकडे दिले होते.
गाझियाबादपासून धामुपूर येथे जाण्यासाठी वेळेवर काही वाहन न मिळाल्याने श्री. प्रधान यांनी एका ट्रकचालकाला विनंती केली. त्यासाठी शंभर रुपये आकार मान्य करून प्रधान ट्रकमध्ये चालकाशेजारी बसले. वाटेत गप्पा सुरू झाल्या. इतक्या आडगावात हा सुशिक्षित माणूस कशासाठी चालला आहे, अशी उत्सुकता त्याला वाटणे स्वाभाविक होते. दूरवरच्या महाराष्ट्रातल्या एका पुणे नावाच्या गावातल्या शाळकरी मुलांनी स्वतः कष्ट करून हा निधी उभा केला आहे, हे कळताच त्याचे डोळे विस्फारले. “साब, इतने साल यहाँ से आते-जाते हॆं, कभी उनसे मिलने की भी बात हमारे दिमाग में नहीं आई और इतनी बड़ी बात इतनी दूर के छोटे बच्चों ने सोची?”
बोलता बोलता धामुपूर गाव दिसू लागलं. प्रधानांनी आपल्या पाकिटातून शंभराची नोट काढून चालकापुढे धरली. त्यांचे हात हातात धरीत चालक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ” नहीं, नहीं साहब! ये पॆसे लूँगा तो अपने आपको आइने में नहीं देख पाऊँगा! शरमिंदा मत कीजिए। चलो, इस बहाने हमसे भी देश की थोड़ी-सी सेवा हो गई।”
प्रधान खाली उतरले आणि ती नोट त्यांनी मुलांनी दिलेल्या मखमली बटव्यात सरकवून दिली. नंतर फोन करून त्यांनी ही गोष्ट मला कळवली व फोटो पाठवले.
एक शाळकरी ज्योत किती ज्योती लावत गेली…. गोष्ट जुनी पण आज आठवली.. !
(‘आत्मचित्र’ मधून)
लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈