सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य 

भारतरत्न पं. भीमसेन जोशी

☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

मिले सूर मेरा तुम्हारा ssssss हे गाणे माहित नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.

झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून “मेरा भारत महान” हि संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.

*

संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र :

या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.

*

विश्वविक्रमी गाणे :

15 ऑगस्ट 1988 रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार पं. भीमसेन जोशी, भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियुष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.

*

लतादीदीची एन्ट्री :

खरेतर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, “पंडितजी…. मला हि संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते”

आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे…. कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले. आणि मग लता दीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असूद्यात ! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

*

प्रसिद्ध धबधबा :

या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे ! हाच तो धबधबा आहे जिथं लिरिल साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर “लिरिल फॉल्स” असेच नाव पडले !

*

ताजमहाल शूटिंग किस्सा :

या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.

*

गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिजर्व पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.

*

दोन महत्वाच्या रेल्वे :

या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन ! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी हि रेल्वे येते !

आहे न अभिमानाची गोष्ट !

*

कोरस मंडळींचा मोठेपणा :

या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजंसी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कुल मध्ये झाले आहे.

*

स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार :

गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले. आणि अवघ्या दहा मिनिटात तो सिन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शुटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.

*

कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री

दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं ? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण…. त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय”

यावर कैलाशजी म्हणाले की, ” संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही “

आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.

*

जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी :

एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखादं गाणं इतकं अजरामर का होतं…. त्या मागे किती काय काय घडत असत अन किती जणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसतं. ते माहित असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच !

थोडक्यात सांगायचं तर… 

… असं गाणं पुन्हा होणे नाही !!!

*

लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे 

प्रस्तुती : सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments