श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ४३ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- लिलाताईच्या आई सहज बोलण्याच्या ओघात बराच वेळ लिलाताईच्या वाचासिद्धीच्या
अनुभवांबद्दलच सांगत होत्या. ते सगळं आरतीला अचंबित आणि मला निश्चिंत करणारच होतं! सगळं ऐकता ऐकता माझ्या नजरेसमोर लिलाताईच्या पत्रातला शब्द न् शब्द तरळत होता. तो प्रत्येक शब्द खरा होणाराय हा माझ्या मनातला विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला होता!)
तिथून बाहेर पडल्यावर पुत्रवियोगाच्या दुःखातून आरतीला सावरायची हीच योग्य वेळ आहे असंच मला वाटत राहिलं. ती मात्र गप्प गप्पच होती.
“लीलाताईच्या आईना भेटायला आलो ते बरं झालं ना?” मी विषयाला हात घातला. तिने होकारार्थी मान हलवली. मला तेवढं पुरेसं होतं.
“तुला.. एक सांगायचं होतं.. “
“कशाबद्दल?”
“हेच. समीरबद्दल. “
“त्याचं काय.. ?”
“.. जे तुला माहित नाहीय असं.. बरंच कांही… “
“म्हणजे?”तिने आश्चर्याने विचारले.
“म्हणजे जे मी फक्त तुलाच नव्हे तर कुणालाच सांगितलेलं नाहीय असं.. “
तेवढ्यांत समोरून रिक्षा येताना दिसताच मी रिक्षा थांबवली. एकतर रस्त्यात सगळं सांगणं शक्य नव्हतं न् योग्यही. जे सांगायचं ते मनात जिवंत होऊन मलाच अस्वस्थ करत राहिलं होतं.
डाॅ. जोशींकडून त्यांच्या मनाविरुद्ध डिस्चार्ज घेऊन बाहेर पडल्यानंतर जवळजवळ महिनाभर समीर डाॅ. देवधरांच्या निगराणीखाली होता तेव्हाची गोष्ट. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे कणाकणानं कां होईना समीर सुधारु लागला होता. तरीही तेव्हाचे त्याचे हाल आणि अवस्था सातत्याने सुरु असलेल्या ऍलोपॅथी औषधांच्या अपरिहार्यतेमुळे अतिशय नाजूक आणि केविलवाणी होत चालली होती. त्या दरम्यानचा एक अतिशय करूण प्रसंग आठवला तरी अजूनसुध्दा अंगावर सरसरून काटा येतो.. !
डाॅ. देवधरांकडे ट्रिटमेंट सुरु झाली तेव्हा सुरुवातीला समीरला सलाईन लावल्यावर ‘थेंबभर पाणीही त्याच्या पोटात घालू नका’ असं नर्सने बजावून सांगितलं होतं. मी तिथे गेलो तेव्हा आरतीने मला अजिबात आवाज न करण्याची खूण केली.
“का?” मी हलक्या आवाजात विचारलं.
“खूप रडत होता. सलाईन
लावल्यामुळे त्याचा हातही दुखत असेल. सकाळपासून थेंबभरही पाणी पोटात नाहीये. त्यामुळे तहानही लागली असेल. बघा ना हो किती सुकून गेलाय.. ” आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली. ते ऐकणंही मला वेदनादायी वाटत होतं. समीरच्या चेहऱ्यावरचं थिजून गेलेलं दुःख आणि केविलवाणेपण मला त्रास देऊ लागलं. तिथेच मागे टेबलवर भरून ठेवलेल्या तांब्याभांड्याकडे सहजच माझं लक्ष गेलं आणि तहानेने कधीपासून आपल्या घशाला कोरड पडलीय हे मला प्रथमच जाणवलं. मी उठलो. ते तांब्याभांडं अलगद उचललं. तांब्यातलं पाणी भांड्यात ओतत असताना त्या बारीकशा धारेच्या आवाजानेच जणू संकेत दिल्यासारखे समीरने इवलेसे डोळे उघडून त्या आवाजात लपून राहिलेल्या तृप्तीच्या हव्यासानेच जणू आपली व्याकुळ नजर त्या दिशेला वळवली. त्या नजरेचा त्या पाण्याच्या धारेला स्पर्श झाला मात्र.. तळपत्या उन्हातल्या तहानलेल्या कुत्र्यासारखी त्याची जीभ आत बाहेर लवलव करु लागली. तहानेने व्याकुळ झालेल्या माझ्या बाळाला मी
थेंबभर पाणीही देऊ शकत नसताना भांड्यातलं ते पाणी माझ्या घशाखाली उतरणं शक्य तरी होतं का? समीरची अगतिक अवस्था पाहून मी तहान विसरलो. भांड्यातलं पाणी न पिताच तसंच तांब्यात ओतून ते तांब्याभांडं कोरडेपणानं बाजूला सारलं. पाणी दृष्टीआड होताच बाळाच्या जिभेची लवलव मार खाल्ल्यासारखी थांबली, पण ती कासावीस करणारी तहान मात्र त्याच्या केविलवाण्या नजरेतून झिरपतच होती.. !
“बोला ना.. गप्प कां असे? काय सांगत होतात?”
घरी येताच आरतीने विचारले.
“हो.. सांगतो. पण तू शांतपणे ऐकून घेणार असशील, तेच मनात ठेवून त्रास करून घेणार नसशील तरच सांगतो.. ” मी बोललो आणि पाय धुवायला आत निघून गेलो.
मला सांगणं टाळायचं तर नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं. डॉक्टरांच्या औषधोपचारांनी समीरची तब्येत थोडीफार सुधारु लागली होती. त्याचं किरकिरणं, रडणं बऱ्याच प्रमाणात कमी होत चाललं होतं. अधूनमधून घोटभर पाणी, अंदाज घेत दिलेलं दोन-तीन चमचे दूध हळूहळू पचू लागलं होतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना आणि समीरबाळाच्या सहनशक्तीला यश मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आमच्या मनावरचं भीतीचं सावट विरु लागलं. त्याला सलग शांत झोप लागू लागली तसं मी जमेल तसं दोन-तीन तास बँकेत जाऊन साचत राहिलेली महत्त्वाची कामे हातावेगळी करू लागलो. आरती न् मी जवळजवळ दोन महिने अक्षरशः जागून काढले होते. घरी माझी आई, लहान भाऊ, सासूसासरे सर्वजण मदतीला होतेच. तेही आता आलटून पालटून दवाखान्यात येऊन आम्हाला थोडावेळ रिलिव्ह करु लागले.
पण… हे सकारात्मक बदल, हा दिलासा हे सगळं एक चकवाच होतं याचा प्रत्यय पुढं चार-सहा दिवसातच आम्हाला आला आणि तोही अतिशय धक्कादायक पध्दतीनं! तो आजारी पडला तेव्हापासूनचे हे दोन अडीच महिने तेव्हाचे माझे ब्रॅंच मॅनेजर श्री. घोरपडेसाहेब यांनी मला अतिशय मोलाचा असा भावनिक आधार दिला होता. आता त्यांचं कामाचं ओझं कमी करणं हे माझं कर्तव्य होतं. त्यामुळेच समीरची तब्येत थोडी सुधारु लागल्यानंतर मी बँकेत हजर झालो. एक-दोन दिवस निर्विघ्नपणे गेले. तो शनिवार होता. रविवारी आमच्या पुण्यातल्या रीजनल ऑफिसमधे ब्रॅंच मॅनेजर्स मीटिंग होती. त्यासाठी घोरपडे साहेबांना संध्याकाळी उशिरा बसून मीटिंगची तयारी करण्यासाठी मी मदत करत होतो. मिटींगला जाताना एक महत्त्वाचं लोन प्रपोजल त्यांना तयार करुन अॅप्रूव्हलसाठी न्यायचं होतं. ते तयार करत आम्ही त्यांच्या केबिनमधे बसलो होतो. टायपिस्ट घरी गेल्यामुळे आता हे प्रपोजल स्वतःच लिहिणे आवश्यक होते. घोरपडे साहेबांचा हात लिहिताना थरथरत असे. त्यामुळे मला ते डिक्टेट करीत आणि मी ते लिहित होतो. ते पावसाळ्याचे दिवस होते. सगळं काम आवरत आलं. खूप अंधारून आलंय हे लक्षात आलं ते केबिनच्या खिडकीबाहेर उभं राहून धुवांधार पावसात कशीबशी छत्री सावरत उभ्या माझ्या आईने आणि लहान भावाने मला हाक मारली तेव्हा!
“बाळ खूप सिरीयस आहे. डॉक्टरनी तुला लगेच बोलवलंय. ” आई सांगत होती.
“आम्ही रिक्षानेच आलोय. रिक्षा थांबवलीय.. चल लगेच ” भाऊ म्हणाला. मी मनातून थोडा हबकलो. समीरच्या काळजीने व्याकुळ झालो. पण नेमक्या त्या क्षणीचं माझं घोरपडे साहेबांच्या संदर्भातलं माझं कर्तव्य मी विसरूही शकत नव्हतो.
” हो.. मी.. मी आलोच. लग्गेच निघतो. पण तुम्ही थांबू नका. त्या रिक्षानं तुम्ही पुढं व्हा. मागोमाग मीही पोचतोच.. “
आई आणि भाऊ क्षणभर घुटमळले.
“आरती तिथं एकटी असेल.. खरंच निघा तुम्ही.. मी आलोच.. “
ते घाईघाईने निघाले. लोन प्रपोजलमधली शेवटची ओळ मी पूर्ण करू लागलो.
“एs.. वेडा आहेस का तू? काय करतोयस हे ? जा.. ऊठ मुकाट्यानं.. थांबव त्यांना.. नीघ तूही.. ” घोरपडे साहेब ओरडले. माझ्या हातातलं पेन काढून घ्यायला त्यांनी हात पुढं केला. मी अजिजीनं त्यांच्याकडं पाहिलं.
“साहेब, मी हे रिकमंडेशनचं शेवटचं एक वाक्य राहिलंय फक्त ते पूर्ण करतो न् निघतोच लगेच. तुम्हाला सलग लिहिता येणार नाही. अक्षरात फरक पडू नये म्हणून. झालंच. “
मी माझी सही करून प्रस्ताव त्यांच्यापुढे सरकवला आणि ताडकन् उठलो. तो स्वतःच्या ब्रिफकेसमधे ठेवून घोरपडे साहेबही घाईघाईने उठलेच.
” एक.. एक मिनिट. मीही आलोच. पाऊस थांबलाय तोवर मी तुला बाईकवरून हॉस्पिटलमधे सोडतो न् मग घरी जातो ” ते म्हणाले.
मी घड्याळ्याकडे पाहिलं.
“नाही सर. तुमचं जेवण व्हायचंय अजून. ट्रेन चुकेल. मी जाईन रिक्षानं. खरंच. “
बोलता बोलता मी ब्रॅंचचं ग्रील ओढून कुलूप लावलं. तोवर घोरपडेसाहेबांनी त्यांची बाईक गेटच्या बाहेर काढलीही होती.
“बैस लवकर.. “
हॉस्पिटल येताच मी पटकन् उतरून निघालो तोवर बाईक लॉक करून तेही माझ्या मागून येत होते.
” मी जाईन. तुम्ही नका येऊ… खरंच. “
“हो.. मी थांबणार नाहीय.. पण डॉक्टरांना भेटतो न् निघतो लगेच.. “
आम्ही आत गेलो तेव्हा आरती, माझी आई आणि भाऊ केबिनच्या बाहेर खुर्च्यांवर बसले होते. तिघांचेही डोळे भरून वहात होते. मी आरतीजवळ गेलो..
“काय झालंय.. ?कसा आहे समीर.. ?”
तिला हुंदकाच आला.
“तो सिरियस आहे.. डाॅक्टर तुझीच वाट बघतायत. जा लगेच.. बोल त्यांच्याशी… “आई म्हणाली.
आत माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल या आशंकेनेच मी कसंबसं स्वत:ला सावरत डाॅक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली…!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈