श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ माणूसपण… ☆
☆
परवा ह्या झाडाखाली बसलो
तेव्हा खूप छान वाटलं
आज त्याचे हाल पाहून
टचकन डोळ्यात पाणी दाटलं..!
म्हटलं विचारावं झाडाला
नक्की झालं तरी काय?
कोणत्या नराधमाने
त्याचे तोडले हात पाय
मी म्हटलं… ऐकना रे झाडा
तुझ्याशी थोडं बोलायचंय
तुझ्या मनातलं आज मला
सारं काही ऐकायचंय..!
सुरवातीला झाड …
काही एक बोललं नाही;
आणि नंतर कितीतरी वेळ
त्याचं रडणं काही थांबलं नाही..!
मी म्हटलं झाडा असं
रडू नको थांब
काय झालं एकदा
मला तरी सांग
काय सांगू मित्रा तुला
झालं काल काय ..?
कुणीतरी येऊन माझे
तोडू लागलं पाय..!
पायाबरोबर जेव्हा माझे
हात सुध्दा तोडू लागले
तेव्हा मात्र माझ्या मनातले
माणूसपण पुसू लागले..!
मी जोर जोरात
ओरडत होतो
पण ऐकलं नाही कुणी
आणि तेव्हा कळलं देवानं
आपल्याला दिली नाही वाणी.
काय चूक झाली माझी
मला सुद्धा कळलं नाही
इतकी वर्षे सावली दिली
ती कुणालाच कशी दिसली नाही..?
कुणीतरी म्हटलं तितक्यात
उद्या येऊन झाडाचे बारीक तुकडे करा..!
बारीक बारीक तुकडे नंतर
गाडीमध्ये भरा…!
अरे सावली देणारे हातांचे
असं कुणी तुकडे तुकडे करतं का..?
तूच सांग मित्रा माणसांचं
हे वागणं तुला तरी पटतं का..?
माझे हाल झाले त्याचं..
मला काहीच वाटत नाही
पण..आज परतून येणा-या पाखरांना
त्याचं घर मात्र दिसणार नाही
मित्रा…
झाडांमध्ये ही जीव असतो
हे माणसांना आता कळायला हवं
आणि आमचा आवाज ऐकू येईल
इतकं माणूसपण तरी टिकायला हवं..!
☆
© श्री सुजित कदम
मो.7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈