श्री हेमन्त बावनकर 

? इंद्रधनुष्य ?

 “व्हॅलेंटाईन डे…– लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर

“ १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.“

काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे.  आपण का म्हणून साजरा करायचा ?

… आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि  व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ? 

व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून  व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार ! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली. 

रोमच्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला. व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”. हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६. 

तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात. 

दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे  म्हणता येईल. 

आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दिवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही. 

सगळ्या  सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गाकरता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं. 

पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार ! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत.  भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा  करतो. 

असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give. 

… कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण —  

True love knows no reason 

आणि  

Love has no boundaries. 

सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे. 

पूर्वी सगळे नोकरदार  एक तारखेला खुश असायचे – 

“खुश है जमाना, आज पहिली तारीख है”.  

… आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला पण खुश असतात – 

“ खुश है जमाना, आज  व्हॅलेंटाईन डे है”. 

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : श्री सुधीर करंदीकर 

मोबा 9225631100 इमेल <[email protected]>

प्रस्तुती : श्री हेमन्त बावनकर 

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments