📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “वन बेडरुम फ्लॅट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

माझ्या वडिलांचे स्वप्न होते, की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागावे. जेव्हा मी अमेरिकेत आलो, तेव्हा हे स्वप्न जवळपास पूर्ण होत आले होते.

आता शेवटी, मला जिथे हवे तिथे मी पोहोचलो होतो. मी असे ठरवले होते की पाच वर्ष मी इथे राहून बक्कळ पैसा कमवेन, जेणेकरुन भारतात गेलो की पुण्यासारख्या शहरात सेटल होईन.

माझे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट अन तुटपुंजी पेन्शन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे होते. घरची, आई-बाबाची खूप आठवण यायची. एकटं वाटू लागायचं. स्वस्तातलं एक फोन कार्ड वापरून मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना कॉल करत होतो. दिवस वार्‍यासारखे उडत होते. दोन वर्षं पिझ्झा- बर्गर खाण्यात गेली. अजून दोन वर्षं परकीय चलनाचे दर पाहण्यात गेली. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.

लग्नासाठी रोज नवनवीन स्थळ येत होती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले, मला फक्त दहा दिवसांची सुट्टी मिळेल. त्या दहा दिवसातच सर्व काही झालं पाहिजे. स्वस्तातलं तिकीट पाहून मी दहा दिवसांची सुट्टी घेतली. मी खूश होतो. आईबाबांना भेटणार होतो. नातेवाईक व मित्रांसाठी खूप सार्‍या भेटवस्तू घ्यायच्या होत्या, त्याही राहून गेल्या.

घरी पोहोचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फोटो मी पाहिले. वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडील समजूतदार होते. दोन दिवसांत माझे लग्न लागले. खूप सारे मित्र येतील, असं वाटत असताना फक्त बोटावर मोजता येतील, इतकेच मित्र लग्नाला आले.

लग्नानंतर काही पैसे आईबाबांच्या हातावर टेकवले. “आम्हाला तुझे पैसे नकोत रे पोरा. पण वरचेवर भेटायला येत जा, ” असं बाबांनी सांगताना त्यांचा आवाज खोल गेला होता. बाबा आता थकले होते. चेहर्‍यावरच्या सुरकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करून देत होत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पोहोचलो.

पहिली दोन वर्षं बायकोला हा देश खूप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नॅशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत होतं. बचत कमी होऊ लागली, पण ती खूश होती. हळूहळू तिला एकाकी वाटू लागलं. कधीकधी ती आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा भारतात फोन करु लागली. दोन वर्षांनी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना कॉल करायचो, तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे होते.

दरवर्षी मी सहकुटुंब भारतात जायचे ठरवायचो. पण पैशाचं गणित काही जुळायचं नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागून वर्षं सरत होती. भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले होते.

एक दिवस अचानक ऑफीसमध्ये असताना भारतातून कॅाल आला, “मोहन, बाबा सकाळीच गेले रे”. खूप प्रयत्न केला, पण सुट्टी काही मिळाली नाही, अग्नीला तर सोडाच, पण नंतरच्या विधींनापण जायला जमलं नाही. मन उद्विग्न झालं. दहा दिवसात दुसरा कॅाल आला, आईची पण प्राणज्योत मालवली होती. सोसायटीतील लोकांनी विधी केले. नातवंडांचे तोंड न पाहताच आई-वडील ह्या जगातून निघून गेले होते.

आई- बाबा जाऊन दोन वर्षं सरली. ते गेल्यानंतर एक पोकळी तयार झालेली. आईबाबांची शेवटची इच्छा, इच्छाच राहिलेली.

मुलांचा विरोध असतानाही भारतात येऊन स्थिरस्थावर होण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात होती. राहण्यासाठी घर शोधत होतो, पण आता पैसे कमी पडत होते. नवीन घरही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत आलो. मुले भारतात राहायला तयार नसल्याने त्यांनापण घेऊन आलो.

मुले मोठी झाली. मुलीने अमेरिकी मुलासोबत लग्न केलं. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो.

मी ठरविले, आता पुरे झाले. गाशा गुंडाळून भारतात आलो. चांगल्या सोसायटीत ‘दोन बेडरुमचा’ फ्लॅट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे होते. फ्लॅटही घेतला.

आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या ‘दोन बेडरुमच्या’ फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहतो. उरलेलं आयुष्य जिच्यासोबत आनंदात घालवायचं ठरवलेलं, तिने इथेच जीव सोडला.

कधीकधी मला वाटते, हा सर्व खटाटोप केला, तो कशासाठी? याचे मोल ते काय?

माझे वडील भारतात राहत होते, तेव्हा त्यांच्या नावावरही एक फ्लॅट होता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडील गमावले, मुलांना सोडून आलो, बायको पण गेली.

खिडकीतून बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते. त्या सुंदर आठवणी मनात फेर धरू लागतात.

अधूनमधून मुलांचा अमेरिकेतून फोन येतो. ते माझ्या तब्येतीची चौकशी करतात. अजूनही त्यांना माझी आठवण येते, यातच समाधान आहे.

आता जेव्हा माझा मृत्यु होईल, तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांचं भलं करो.

पुन्हा प्रश्न कायम आहे – हे सर्व कशासाठी अन काय किंमत मोजून?

मी अजूनही उत्तर शोधतोय.

फक्त एका बेडरुम साठी?

जगण्याचे मोल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लावू नका.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments