वाचताना वेचलेले
प्रेमाची ताकद… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर
एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले.
गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते.
अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला ,पण राधा शांतचित्त होती.
गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…..
“कसे आहात द्वारकाधीश ?”
जी राधा त्याला ‘कान्हा’ ‘कान्हा’ म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, “राधे, मी आजही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.”
राधा म्हणाली, “खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही.”
“कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास. त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस, म्हणून मी कधी रडलेच नाही.
प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?”
श्रीकृष्ण ऐकतच राहिला…
राधा म्हणाली, “तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे, गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस.तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली.
पण ह्या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जाऊन पोहोचलास ( द्वारका समुद्रकिनारी होती/आहे).
एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास!
कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस!
कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….?
तू कान्हा असतास, तर तू सुदामाच्या घरी गेला असतास. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं!
प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … ‘युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो’. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही !
तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस.महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास?
तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस?
तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास,ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले?
तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना? आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास !
इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ. …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध.
नाही सापडणार तुला शोधूनही !
जिथे जाशील तिथे घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन.
होय. कान्हा मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पूज्य मानतात .पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात.
गीतेमध्ये माझा – राधेचा – तर दुरूनही उल्लेख नाहीये.पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद्गीतेचा- समारोप करताना ‘राधेकृष्ण राधेकृष्ण’ असाच जप करतात!”
हीच ती प्रेमाची खरी ताकद…!
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ.प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈