सुश्री मानसी विजय चिटणीस
विविधा
☆ “नदी…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆
समुद्र तहान थोडीच भागवतो? त्यासाठी हवी असते नदी.. मग ती कोणतीही असो.. प्रत्येक तहानेचं उत्तर नदीकडे असतं.. जोवर ती आटत नाही किंवा संपून जात नाही.. आपल्या प्रवाहात येणार्या प्रत्येकाला भिजवत, त्याची तहान भागवत नदी वाहत राहते. स्वत:चे तट, चौकटीत सांभाळते. आपल्यातील अमृताचा झरा ती रिकामा करते वर्षानुवर्ष, येणार्या पुढच्या प्रत्येक पिढीसाठी. हे नदीचे दायीत्व आहे की तिच्याकडे येणार्या प्रत्येकाला तिथे तृप्त करावे, सांभाळावे, प्रसंगी पोटात घ्यावे. पण नदीही आटते कधीकधी. पोटातले सारे विकार, भावना, साल यांचा गाळ साठत जातो. क्षणांचे थरावर थर साचत जातात आणि वाहती नदी साचायला लागते जागोजागी. तिची निर्मळता, स्वच्छता, शुचिता संपायला लागते आणि मग नदीचे डबके होते. या भावना तरी कशा असतात? सगळीकडून सारख्या वाहणार्या. असलाच तर थोडाफार किंचितसा इकडचा, तिकडचा फरक असेल कदाचित. या भावना काळसापेक्ष असतात बर्याचदा. काळ बदलेल तशा बदलतात. नदीही प्रवाह बदलतेच की पण तिचा प्रवाह बदलण्याची क्रिया खूप संथ होते. एखाद्या संसारात मुरत गेलेली बाई जशी कालांतराने शांत होते तशीच नदी खोल खोल होत जाते नाहीतर मग किनार्यांच्या चौकटी मोडते.
नदीलाही हवाच की पाण्याचा पुरवठा सतत प्रवाही राहण्यासाठी. नदी आटायला लागली की आपण पात्र खोल करतो. नदीचे झरे मोकळे करतो नदीला प्रवाहित करण्यासाठी.. आपल्या मनाचंही असचं असतं थोडफार. तुझं आहे तुजपाशी असं असताना आपण शोधत राहतो बाह्यजगात.. मग वाटत राहातं.. आधी होतं तेच चांगलं होतं
‘वक़्त बीतने के बाद अक्सर ये अहसास होता है…
कि, जो छूट गया वो लम्हा ज्यादा बेहतर था…. ‘
दुःख माणसाला जगण्याची सवौत्तम अनुभूती देतं, फक्त ते.. प्रवाहित करता यायला हवं. मला नेहमी वाटत बायका या नदीसारख्या असतात. कधी अल्लड झर्यासारख्या गात सुटलेल्या, कधी भावनांच्या दरीत स्वत:ला झोकून देणार्या धबधब्यासारख्या, साचलेल्या डोहासारख्या गहन आणि गूढ. कधी तारुण्याच्या अवखळ काठावर ; पाणी भरायला आलेल्या तरुणीसारख्या किंवा मग वेगाबौंड होत रस्त्यातले सारे खाच-खळगे पार करणार्या, वाटेतल्या दगड-धोंड्यांना स्वत:च्या प्रवाहासोबत वाहून नेणार्या, प्रसंगी रौद्ररूप धारण करून आपलं अस्तित्व दाखवणार्या, आसपासच्या परिसराला तृप्त करून… त्या हिरवाईला स्वतःच्या अंगावर दागिन्यांसारखे मिरवणार्या या परिपक्व बाया कायम नदीसारख्याचं दिसतात मला..
अनेक कथा-कहाण्या स्वत:सोबत जगताना नदी, आपलेच काठ रुंदावत जाते. स्वत:च्या विचारांच्या कक्षा वाढाव्यात तशी आपली सारी निर्मळता काठांनी जपत राहते. एखाद्या युगाची पापनाशिनी होवून उद्धारत राहते पिढ्या न पिढ्या. नदी सामावून घेते तिच्याजवळ येणार्या प्रत्येकाला जशी आई आपले तान्हुले कुशीत घेते. किंवा मिठीत घेते तिच्यावर प्रेम करणार्याला प्रत्येकाला, तिच्या आसर्याला आलेल्या प्रत्येकाला. बाया पण तशाच तर असतात. जरी भावनांनी कोरड्या झाल्या तरी मधूनच त्यांना मायेचे उमाळे फुटतात आणि त्या वाहू लागतात अविरत. अशावेळी जाणवतो तो त्यांच्यातला मायेचा अथांग समुद्र. प्रत्येक बाई आपल्यात समुद्राचा उणापुरा एक तरी अंश जपतेच. बायका आणि नदी सारख्याच असतात सर्वार्थाने. आपल्यातले प्रवाहीपण जपताना दोघीही.. जिवंत रहात, खळाळत जगताना आपल्यातला समुद्र काही मरू देत नाहीत.
अशावेळी जिथे नदी समुद्राला जावून मिळते तिथे तिचा, तिच्या वाहण्याचा अंत होतो हे माहिती असूनही ती कोणत्या ओढीने समुद्राकडे धावते ? हे न उमजणारे कोडे आहे. का आहे हे नदीचे संपूर्ण समर्पण? नव्या जन्माच्या ओढीने की संपून जाणार्या प्रवाहाला जपण्यासाठी? काहीही असो ती जीवन संपवते हे निश्चित. हेच तर… आहेही आणि नाहीही… मनात रुजलेला क्षण सांभाळायचा, वाढवायचा, फुलवायचा आणि तो सरला की कृष्णार्पणमस्तू म्हणून पुढच्या क्षणाचं स्वागत करायचं. इतकं सोपं असतं जगणं? नदी होणं? आणि बाई ही होणं?
© सुश्री मानसी विजय चिटणीस
केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈