सौ. स्मिता पंडित
वाचताना वेचलेले
☆ मीच माझी व्हॅलेंटाईन!... कवी : सौ. शुभांगी पुरोहित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
☆
माझ्या मनाचे गाणे
माझ्यासाठीच गाईन
आवडत्या ठिकाणी माझ्या,
माझ्याच बरोबर जाईन.
कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,
मीच माझी व्हॅलेंटाईन.
इतरांसाठी जगण्याचा
काळ मागे गेला,
वाळूसारखा हातातून
काळ निसटून गेला.
दुसऱ्यांचे शब्द जितके
फुलासारखे झेलले.
तितके तितके तेही मला
गृहीत धरत गेले.
ताट होते माझे
पण मेन्यू होता त्यांचा.
प्रवास होता माझा
पण व्हेन्यू होता त्यांचा.
यालाच मी प्रेमाची
व्याख्या म्हणत गेले.
बेमालूमपणे मनाला
अलगद फसवत गेले.
फसवे असले बंध सारे
हलकेच सोडवत जाईन.
कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,
मीच माझी व्हॅलेंटाईन.
मित्र मैत्रिणी, सगे सोयरेही
महत्त्वाचे असतात.
स्टेशन येता ज्याचे त्याचे
उतरून सर्व जातात.
कुठे माहीत कोणा कोणाची
कुठपर्यंत साथ?
आपल्या हाती शेवटपर्यंत
फक्त आपलाच हात.
सन्मान करेन स्वतःचा,
स्वानंदात राहीन.
कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,
मीच माझी व्हॅलेंटाईन.
गुलाबाची सुंदर फुले
स्वतःलाच घ्यायची.
दुसरं कोणी देईल म्हणून
वाट कशाला पाहायची?
शुगर आहे, बी पी आहे
असायचंच की आता.
देवाइतकाच धन्वंतरी
या देहाचा त्राता.
८०% डार्क चॉकलेटचा
अख्खा बार घेईन.
कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,
मीच माझी व्हॅलेंटाईन.
☆
कवी: सौ. शुभांगी पुरोहित
प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈