डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
नवीन वर्षाचा पहिला महिना…
एक वर्ष आणखी सरलं…
जन्मल्यापासूनचा आयुष्य पट कधी कधी आपोआप समोर ठाकतो.
मनात असो का नसो…. !
आयुष्यात केलेल्या भल्या बुऱ्या गोष्टी, नाठाळपणा, अवखळपणा, अजाणतेपणे केलेल्या अनेक चुका आठवतात….
कधी हसू येतं… कधी रडायला होतं… !
सारं काही पुस्तकात मांडलंय…
पण पुस्तकाने तरी माझ्या किती गोष्टी झेलायच्या आणि सहन करायच्या ?
मला आठवतं, मी लहान होतो….
अंगात भरपूर “कळा” होत्या, पण एकही “कला” नाही… !
शाळेत गॅदरिंग असायचं…
माझ्या शाळेतली मुलं मुली याप्रसंगी विविध गुणांचे प्रदर्शन करायची…
यावेळी गॅदरिंग चा फायदा घेऊन मी सुद्धा “गुन” उधळायचो… !
गॅदरिंग च्या शेवटच्या दिवशी, बक्षीस समारंभ असायचा….. स्टेजवर खुर्च्या लावण्याची तयारी सुरू असायची… त्यात प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या खुर्च्या असायच्या.
जमिनीवर उकिडवे बसावे….
तसा मी चप्पल घालून या खुर्च्यांवर बसायचो… आणि काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्याच वयाच्या मुलांच्या चुका काढत राहायचो.
एकदा मुख्याध्यापकांनी हे पाहिलं, काही न बोलता त्यांनी हातातल्या पट्टीने मला फोडून काढलं.
तरीही, स्स हा…. स्स… म्हणत मी सरांना विचारलं होतं, सर नुस्ता खुर्चीत बसलो होतो, इतकं का मारताय ?
‘नालायका, तुला माहित आहे का ? या खुर्च्या कोणाच्या आहेत ?’
‘हा सर, आपल्या शाळेच्या आहेत, म्हणून तर बसलो ना… ‘
‘कळली तुझी अक्कल बावळटा, आपले आजचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव जे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत…
या खुर्च्या त्यांच्यासाठी मांडल्या आहेत… ‘
‘हा मं… ते यायच्या आधी मी बसलो तं काय झालं मं… ‘ मी तक्रारीच्या सुरात, पायाच्या अंगठ्याने जमीन टोकरत बोललो….
सोबत माझं स्स… हा… चालूच होतं.
त्यांना माझा धीटपणा आवडला ?
की माझी निरागसता ?
माहित नाही….
परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला…
ते मला म्हणाले बाळा, ‘प्रत्येक खुर्ची ही खुर्चीच असते… पण त्यावर कोण बसतो; यावर त्या खुर्चीची किंमत ठरते. ‘
‘खुडचीची किंमत काय आसंल सर… ?’ माझा भाबडा मध्यमवर्गीय प्रश्न.
आभाळाकडे पहात ते म्हणाले, ‘आपलं आयुष्य जो दुसऱ्यासाठी खर्ची घालतो, त्या प्रत्येकाला अशा खुर्च्या सन्मानाने मिळतात बाळा… याची किंमत पैशात नाही रे… ‘
‘मला पण पायजे अशी खुडची’ जेवताना मीठ मागावं, तितक्या सहजतेने सरांना मी बोलून गेलो.
‘तुझे एकूण गुण पाहता, हि खुर्ची तुझ्या नशिबात नाही… या खुर्चीत तुला बसायचं असेल तर अंगात काहीतरी पात्रता निर्माण कर… लायक हो… नालायका… !’
हे शब्द आहेत साताऱ्यामधल्या माझ्या शाळेचे, माझ्या वेळेचे मुख्याध्यापक सर यांचे… !
माझ्या याच शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी मला पाच वर्षांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार दिला….
शाळा तीच… प्रांगण तेच… स्टेज तेच…
मी बदललो होतो… !
मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले होते.
मी अट घातली होती, कार्यक्रमाला आदरणीय मुख्याध्यापक सरच हवेत…
स्टेजवर मी सन्माननीय म्हणून लिहिलेल्या खुर्चीवर आखडून बसलो होतो… पण यावेळी पाय खुर्चीवर नाही, जमिनीवर होते…
संयोजकांना मी विनंती केली होती, जे काही मला द्याल ते मुख्याध्यापक सरांच्या हातूनच मला द्यावं…. !
सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.
माझ्या विनंतीनुसार, मुख्याध्यापक सरांनी मला ते मानपत्र दिलं…
सरांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना म्हणालो, ‘सर मला ओळखलं का ?’
त्यांनी चष्मा वर खाली करून मला ओळखण्याचा प्रयत्न केला… पण नाही… !
मी सर्वसामान्य माणूस….
किती विद्यार्थी त्यांच्या हातून गेले असतील… ?
ते मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखतील ? आणि मी तरी असे काय दिवे लावले होते त्यांनी मला ओळखायला ?
देवाला तरी सगळ्याच लोकांचे चेहरे कुठे आठवत असतात… ???
मग मी त्यांना शाळेतल्या दोन-चार आठवणी सांगितल्या…
आत्ता सरांना आठवले….
‘अरे गधड्या… नालायका… मूर्खा… बावळटा… तुच आहेस होय तो DOCTOR FOR BEGGARS?’
मी खाली मान घालून हो म्हणालो… !
यावर अत्यानंदाने त्यांनी मला मिठी मारली… ‘
यानंतर सरांचे वृद्ध डोळे चकमक चकमक…. चकाकत होते… !
कष्टाने वाढवलेल्या, जगवलेल्या झाडाला पहिलं फळ येतं, तेव्हा शेतकरी ज्या कौतुकाने त्या झाडाकडे बघेल… त्याच नजरेने सर माझ्याकडे बघत होते.
‘मी तुझ्या कामात काय मदत करू ? मी तुला आता काय देऊ ?
ती वृद्ध माऊली, इकडे तिकडे पहात, जुन्या सफारीच्या खिशात भांबावून उगीचच इकडे तिकडे हात घालत बोलली… ‘
जुन्या सफारीची विण उसवली होती…
हे माझ्या नजरेतून सुटलं नाही…
मी खिशात जाणारे त्यांचे दोन्ही हात पकडून बोललो… ‘सर, काही द्यायचं असेल तर हातावर एक छडी द्या… माझी तितकीच पात्रता आणि लायकी आहे सर…. ‘
यावर लहान मुलासारखे ओठ मुडपून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला…
तो हसण्याचा प्रयत्न होता की रडू आवरण्याचा… ? मला कळलं नाही… !
ते म्हणाले… ‘गधड्या…. नालायका… मला वाटलं आता तरी तू सुधारला असशील…
पण तू अजून सुधारला नाहीस रे…. ‘ असं म्हणत माझ्या नावाच्या खुर्चीवर सरांनी मला हाताला धरून बसवलं…. !
आता ओठ मुडपून, हसणं आवरण्याची आणि रडणं सावरण्याची माझी कसरत सुरू झाली…
जाताना कानात म्हणाले, ‘आता या खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय वर ठेवून बसलास तरी चालेल, मी तुला ओरडणार नाही… हि खुर्ची तु कमावली आहेस बाळा… ‘
यानंतर ते स्टेजच्या मागे निघून गेले….
यानंतर माझ्या कौतुकाची भाषणांवर भाषणे झाली….
मला यातलं काहीही ऐकू आलं नाही….
मला फक्त ऐकू आले…. ते माझ्या मास्तरचे हुंदके… !!!
———+++++++++———–++++++++
साताऱ्यात त्यावेळी खूप साहित्य संमेलनं व्हायची…
आम्ही दोन चार मित्र या संमेलनाला जायचो…
व्हीआयपी लोकांसाठी तिथे एक कॉर्नर केला होता… त्यावेळी एसी नव्हते, पण कुलर होते…
वर्गात उकडतंय, म्हणून या कुलरचं वारं घेण्यासाठी आम्ही येत होतो, अन्यथा साहित्यातलं आम्हाला काय ढेकळं कळतंय… ?
निर्लज्जपणे आम्ही खुर्च्यांवर पाय ठेवून कुलरचं वारं घेत बसायचो…
संयोजक मंडळी येऊन मग आम्हाला कुत्रं हाकलल्यागत हाकलून द्यायचे…
——++++++—+++++——+++–+++
एखाद्या कार्यक्रमात पहिल्या तीन रांगा व्हीआयपी साठी असतात… आम्ही पोरं पहिल्या रांगेमध्ये बसायचो… इथूनही संयोजक आम्हाला कानाला धरून उठवायचे… !
मागून शब्द कानावर पडायचे… लायकी आहे का तुमची पहिल्या रांगेत बसायची ?
या सर्व जुन्या बाबी मी अजून विसरलो नाही.
आज किती वेळा मी प्रमुख पाहुणा झालो असेन, अध्यक्ष झालो असेन, वक्ता झालो असेन… पण त्या खुर्चीत बसलो की अजूनही मला भीती वाटते…
मुख्याध्यापक सर येतील पट्टी घेऊन….
आज कित्येक मोठ्या मोठ्या साहित्यिकांमध्ये, अनेक मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठबस होते… व्हीआयपी लाउंज मध्ये बसवलं जातं… पण आजही भीती वाटते आपल्याला इथून कोणी उठ म्हटलं तर… ?
हाताला धरून आज पहिल्या रांगेमध्ये बसवलं जातं…. तरीही माझ्या नजरेत धाकधूक असते… आपल्याला इथून कोणी उठवलं तर… ?
पूर्वी एखाद्या कार्यक्रमांमध्ये माईक चालू असायचा….
कोणाचं लक्ष नाही असं पाहून, मी माईक हातात घ्यायचो… उं… ऐं… खर्र… खिस्स…. फीस्स… असे आवाज काढून बघायचो… माइक वर आपला आवाज कसा येतो ते बघायचो… मीच गालातल्या गालात हसायचो.
तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या, आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈