डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या, आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.) – इथून पुढे —– 

मागील दहा वर्षात किमान पाच हजार व्याख्यानासाठी उभा राहिलो असेन….

मात्र अजूनही माईक पुढे गेलो, तरी भीती वाटते…. मागून कोणी तरी येईल आणि पट्टीचा फटका मारेल…. !त्यावेळी केलेल्या चुकांची अजूनही भीती वाटते…

मी केलेल्या चुका या “गुन्हा” नव्हत्या… पण त्या चुकाच होत्या… ! हे आज कळतंय.

आमचे एक गुरुजी होते… ते म्हणायचे, ‘आपल्याला आपली चूक समजली म्हणजे समजा निम्मी सुधारणा झाली… !’ 

‘आपल्याला आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर कायम माघार घ्यायची, कुणाशी वाद घालायचा नाही… ‘ हे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं आहे.

– – पण माझ्यासारख्या रेड्याला हे काय कळणार ? पण ज्ञानेश्वर माऊली होऊन माझ्या शिक्षकांनी मला हे सांगितलं.

‘बाळा कुणाच्या कर्जात राहू नकोस पण आयुष्यभर एखाद्याच्या ऋणात रहा… ‘ हे सांगणारी माणसं, आता देवा घरी निघून गेली….

देवाचीच माणसं ही… तिथेच जाणार… !

मी अजूनही शोधतोय यांना…

तुमच्या आयुष्यात जर अशी माणसं असतील, तर हृदयाच्या तळ कप्प्यात आत्ताच यांना सांभाळून ठेवा, पुन्हा ते भेटत नाहीत माऊली !

वो फिर नही आते… वो… फिर नही आ…. ते… !!!

गतकाळात केलेल्या या चुका पुसायची मला जरी संधी मिळाली तरी मी त्या पुसणार नाही.

कारण या चुकांनीच मला बरंच काही शिकवलं…

“मान” म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी एकदा अपमानाची चव घ्यावीच लागते…

पोट भरल्यानंतर जी “तृप्तता” येते ती अनुभवण्यासाठी, कधीतरी उपाशी राहण्याची कळ सोसावीच लागते…

आपण “बरोबर” आहोत हे समजण्यासाठी आधी खूप चुका कराव्या लागतात…

जिथं अंधाराचं अस्तित्व असतं, तिथंच प्रकाशाला किंमत मिळते…

पौर्णिमेच्या चंद्राचं कौतुक सर्वांनाच असतं… पण हा चंद्र पाहायला सुद्धा रात्र काळीकुट्टच असावी लागते… ! त्याच्या प्रकाशाला काळ्या मध्यरात्रीचीच किनार लाभलेली असते… नाहीतर दिवसा दिसणाऱ्या चंद्राकडे कोण पाहतं ? आपल्या आयुष्यात आलेल्या काळ्या रात्री आपणही अशाच जपून ठेवायच्या…

आता थोड्याच वेळात उजाडणार आहे; हे स्वतःलाच सांगत राहायचं…

अमावस्या काय कायमची नसते…

बस्स पंधराच दिवसात माझ्याही आयुष्यात पौर्णिमा येणार आहे, हे स्वतःला बजावत राहायचं… ! 

– – आणि पुढे पुढे चालत राहायचं… !!!

नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन, या महिन्यात केलेले काम थोडक्यात सांगतो.

  1. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा पाच ताई आपल्या मुलाबाळांसह भीक मागायच्या. या पाचही जणींना कामाला तयार केलं आहे. त्यांना नवीन हातगाड्या घेऊन दिल्या आहेत. 26 जानेवारी या पवित्र दिवसापासून त्यांनी काम सुरू करून भिकेपासून स्वातंत्र्य मिळवले आहे.

भिक्षेकरी म्हणून नाही तर गावकरी म्हणून जगायला सुरुवात केली आहे… भारताचे नागरिक आणि प्रजा म्हणून त्यांना आता ओळख मिळेल… माझ्यासाठी खऱ्या अर्थाने यावेळचा 26 जानेवारी प्रजासत्ताक झाला.! 

  1. रस्त्यावर पडलेली एक ताई, हॉस्पिटलमध्ये उपचार करून हिला बरं केलं. काम सुरू कर भीक मागणं सोड अशी गळ घातली. तिने मान्य केलं. तिची एकूण प्रकृती आणि अशक्तपणा पाहता हातगाडी ढकलणे तिला शक्य नव्हते.

हॉस्पिटलमध्ये तिच्याशी बोलत असताना, बाबागाडीमध्ये बाळाला बसवून एक ताई चाललेल्या मला दिसल्या.

हिच आयडिया मी उचलून धरली, विक्री करायचे साहित्य बाबा गाडीत ठेवून विक्री करायची, बाबागाडी ढकलायला सुद्धा सोपी…

समाजात आवाहन केले, आपणास गरज नसेल तर, तुम्ही वापरत नसाल तर मला बाबागाडी द्या…

बाबागाडीचा हट्ट लहानपणी कधी केला नाही, आज मोठेपणी मात्र मी बाबागाडी मागितली…

“लहान बाळाचा हट्ट” समजून, समाजाने माझा हा हट्ट सुध्दा पुरा केला.

हि ताई कॅम्प परिसरात बाबा गाडीत साहित्य ठेवून बऱ्याच वस्तूंची विक्री करते.

बाबागाडीचा उपयोग बाळाला फक्त “फिरवण्यासाठीच” होतो असं नाही… “फिरलेलं” आयुष्य पुन्हा “सरळ” करण्यासाठी सुद्धा होतो… ! 

  1. मागे एकदा एक परिचित भेटले. मला म्हणाले, ‘घरात काही जुन्या चपला आहेत, तुला देऊ का ?’ 

मी द्या म्हणालो 

त्यांच्या सोबतीने त्यांच्या इतर मित्रांनी सुद्धा घरातल्या नको असलेल्या चपला आणून दिल्या.

आठ दहा पोत्यांमध्ये भरलेल्या या चपलांच्या आता जोड्या कशा जुळवायच्या ? 

चौथी की पाचवीच्या परीक्षेत जोड्या जुळवा असा एक प्रश्न असायचा, माझ्या तो आवडीचा.

आज डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा जोड्या जुळवा हाच प्रश्न समोर पुन्हा एकदा आला.

मग आमच्या काही भिक्षेकरी मंडळींना हाताशी घेतलं, साधारण निर्जन स्थळी जाऊन सगळी पोती खाली केली… आणि आम्ही सगळेजण लागलो जोड्या जुळवायला… ! 

काही चपला आमच्या लोकांना वापरायला दिल्या, उर्वरित चपला जुन्या बाजारात आमच्या लोकांना विकायला दिल्या.

“चपलीची पण किंमत नाही” असा आपल्याकडे एक शब्द प्रयोग आहे. पण याच चपला विकून, आमच्यातले अनेक लोक भीक मागणे सोडून प्रतिष्ठा मिळवत आहेत.

चप्पलला किंमत असेल – नसेल; पण आमच्या लोकांची किंमत वाढवली ती या पायताणांनीच…! 

माझ्या दृष्टीने या चपलांची किंमत अनमोल आहे…! 

  1. दोन लोकांना ओळखीच्या माध्यमातून स्वच्छता सेवक आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस लावून दिले आहे.
  2. रस्त्यावर ते जिथे बसतात रस्त्यावर दवाखाना थाटून वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे सुरू आहे, डोळ्यांचे ऑपरेशन करणे, चष्मे देणे, रक्ताच्या विविध तपासण्या करणे, कानाची तपासणी करून ऐकायचे मशीन देणे इत्यादी इत्यादी वैद्यकीय बाबी सुरू आहेत.
  3. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या गरीब रुग्णांना रोजच्या रोज जेवण देत आहोत. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांची एक टीम तयार करून त्यांच्याकडून सार्वजनिक भाग स्वच्छ करून घेत आहोत त्या बदल्यात त्यांना कोरडा शिधा देत आहोत, साबण टूथपेस्ट, टूथ ब्रश या सुद्धा गोष्टी पुरवत आहोत.

(सध्या भीक मागणाऱ्या अनेक लोकांना भीक मागणे सोडायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही. अशांसाठी एखादे प्रशिक्षण केंद्र तयार करून, त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही वस्तू तयार करून घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची; असे स्वप्न गेल्या सहा वर्षांपासून पाहत आहे, अनेक कारणांमुळे ते सत्यात येऊ शकले नाही. परंतु येत्या महिन्याभरात असे प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती काही दिवसात देणार आहे)

असो..

आपण ज्या समाजात राहतो तिथे वय वाढलेल्या लोकांना ज्येष्ठ म्हटलं जातं…

मी ज्या समाजासाठी काम करतो, तिथे वय वाढलेल्या लोकांना म्हातारडा – म्हातारडी थेरडा – थेरडी म्हटलं जातं…

आपण ज्या समाजात राहतो तिथे कुणी गेलं तर, ते देवा घरी गेले, कैलासवासी झाले असे शब्दप्रयोग केले जातात.

आमच्याकडचं कोणी गेलं तर म्हणतात… त्ये मेलं… खपलं 

– – वरील सर्व शब्द; अर्थ जरी एकच सांगत असले, तरीसुद्धा शब्दाशब्दांमध्ये प्रचंड अंतर आहे.

– – हे अंतर आहे… हा फरक आहे फक्त प्रतिष्ठेचा… ! 

हे जे काम आपल्या सर्वांच्या साथीनं सुरू आहे, ते फक्त या शब्दातले अंतर कमी करण्यासाठी…

शब्दातला फरक मिटवण्यासाठी…

“प्रतिष्ठा” नावाचा “गंध” त्यांच्या कपाळी लावण्यासाठी…!!! 

— समाप्त —  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खूपच छान काम आहे डॉक्टरांचा शतशः नमन डॉक्टरांना.