सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘विस्मृतीतील मोती…. स्क्वाड्रन लीडर देवय्या!!’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

‘६ सप्टेंबर हा दिवस पाकिस्तानचा संरक्षण दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पाकिस्तानसाठी या दिवसाचं महत्व किती असेल याची कल्पना करा! आणि ते तसं होतंच! 

कारण त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानने आपल्या पठाणकोट, आदमपूर आणि हलवारा या हवाईदलाच्या तीन तळांवर अकस्मात हल्ले केले होते. महत्वाची बाब म्हणजे तेव्हा अधिकृतपणे युद्ध सुरू झाल्याची घोषणा होणे बाकी होते! अर्थात ऑगस्ट महिन्यापासूनच सीमेवर चकमकी चालू होत्या. आपल्या छाम्ब क्षेत्रात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात रणगाडे घुसविले होते. त्यामुळे छाम्ब क्षेत्रावर दबाव आला होता. हा दबाव कमी करण्यासाठी आपल्या हवाईदलाने ६ सप्टेंबरला सकाळी लाहोरवर बॉम्ब वर्षाव केला होता. त्याला फारसा विरोध झाला नव्हता, कदाचित म्हणून आपण थोडे बेसावध असू.

तर या तीन ठिकाणांपैकी आदमपूर आणि हलवारा या दोन तळांवर आपल्या हवाईदलाच्या गस्त आणि प्रखर प्रतिकारामुळे आलेली पाकिस्तानची विमाने फारसे नुकसान करू शकली नाहीत. मात्र पठाणकोटवर झालेला हल्ला एवढा अनपेक्षित आणि अकस्मात होता की आपल्या हवाईदलाला प्रतिकार करायलाही उसंत मिळाली नाही! तेथील तळावर असलेली आपली दहा विमाने जागेवरच नष्ट झाली!! पाकिस्तानच्या दृष्टीने हा विजय किती मोठा असेल याची आपण कल्पना करू शकतो! 

त्या वेळची पाकिस्तान आणि भारताची विमानदलांची तौलनिक स्थिती काय होती.. तर आपल्याकडे नॅट, हंटर, व्हॅम्पायर्स, कॅनबेरा, माईस्टर्स, आणि मिग २१ अशी त्या काळी सुद्धा जवळपास कालबाह्य झालेली विमाने होती!! तर पाकिस्तानकडे होती एफ १०४ स्टार फायटर्स.. त्या काळची जगातील सर्वोत्तम फायटर् विमाने.. जी अमेरिकेने त्यांना जवळ जवळ फुकट दिली होती. त्या शिवाय एफ ८६ सॅबरजेट, बी ५७ कॅनबेरा बॉम्बर, एच ४३, एस ए १६, सी १३० अशी हवाई क्षेत्रातील सर्वात बलाढ्य आणि आपल्या विमानांच्या तुलनेत चौपट वेगवान विमाने!! 

आपल्या वायुदलाला ही वस्तुस्थिती माहीत नव्हती काय?? नक्कीच माहीत होती. त्यांनी आपल्यापाशीही अशी वेगवान विमाने असावीत म्हणून तात्कालीन सरकारकडे शेकडो वेळा मागणी केली होती. पण आपल्या सरकारचे ‘शांती’ हे ब्रीदवाक्य होते. युद्ध या शब्दाचा त्यांना प्रचंड तिटकारा होता. त्यातच चीनकडून प्रचंड पराभव झाल्याने सरकारमधील श्रेष्ठी आधीच खचले होते. त्यात हवाईदलाची ही मागणी म्हणजे पुन्हा युद्ध.. आणि युद्ध करण्याच्या मानसिकतेत सरकार नव्हते. सबब आहे त्या तुटपुंज्या साधनांनी लढणे तिन्ही दलांना क्रमप्राप्त होते.. याची अपरिहार्य परिणती आपल्या सैन्याचे, वायुदल, नौदलाचे प्रचंड प्रमाणात नाहक शिरकाण होण्यात होणार, हे नक्की होते! सर्व सेनादलांचे प्रमुख यांना ही गोष्ट स्पष्ट दिसत होती.. पण प्राणपणाने लढणे एवढेच त्यांच्या हातात होते…!!

तर सहा तारखेच्या त्या जबरदस्त अपमानाचा बदला घेण्याचे त्याच रात्री ठरले. या वेळी नशीब म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मान. यशवंतराव चव्हाणसाहेब हे केंद्रात संरक्षणमंत्री होते. त्यांनी तात्काळ प्रतिकाराचे आदेश दिले.

आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाणार हे नक्की होते. अर्थात पाकिस्तानला हे अपेक्षित असणार हे लक्षात घेऊन सीमेवरच्या हवाई तळांवर हल्ले न करता पाकच्या आत खोलवर.. जिथे एफ १०४ स्टार फायटर्सचा मुख्य तळ होता, त्या सरगोधा या अति महत्वाच्या तळावर घाव घालण्याचे नक्की झाले. या हल्ल्याची कमान आदमपूर येथील हवाई तळाने स्वीकारली.

आणि सात तारखेला पहाटे आपल्या आठ विमानांनी उड्डाण केले. सुरुवातीला बारा विमाने पाठविण्याचे ठरले होते, पण ऐन वेळी फक्त आठ विमाने या मोहिमेसाठी निवडली गेली. सूडाच्या आगीने धुमसत असलेल्या आपल्या आठही वैमानिकांनी प्रचंड त्वेषाने शक्य तेवढ्या वेगाने जात सरगोधा हवाईतळ गाठला. सर्व पाकिस्तानी तळ गाफील होता. पाकिस्तानच्या एवढ्या आत असलेल्या आणि अति वेगवान अशा बारा एफ १०४ स्टार फायटर्सचा तळ असलेल्या जागी आपल्या पठाणकोटवरच्या विजयी हल्ल्याच्या फक्त बारा तासांच्या आत भारतीय विमानदल धडक मारेल हे पाकिस्तानी विमानदलाच्या स्वप्नातही आले नसेल आणि रात्रीच्या विजयाच्या आनंदात युद्धातील विजयाचे स्वप्न पहाणाऱ्या त्या पाकी तळावर वीज कोसळावी, तसा आपल्या आदमपूर येथील वीर वैमानिकांनी भयानक हल्ला चढवला. त्यांची ११ – एफ १०४ स्टार फायटर्स विमाने उभ्या जागी अल्लाला प्यारी झाली. संपूर्ण तळ जवळपास नष्ट झाला. मात्र तशाही स्थितीत एक एफ १०४ स्टार फायटर आकाशात उडाले. तोपर्यंत आपली विमाने परतीच्या प्रवासाला लागली होती. पण एफ १०४ स्टार फायटरचा वेग एवढा प्रचंड होता की, त्याने आपल्या विमानांना जवळ जवळ गाठलेच.. त्या पाकी विमानात अत्याधुनिक मिसाईल्स होती. जर त्याला अडविले नसते तर आपल्या सर्व विमानांचा विनाश ठरलेला होता!!

पण अडवणार तरी कसे.. त्या विमानाचा वेग आपल्यापेक्षा चौपट.. शिवाय मिसाईल्स..

आणि अशा वेळी त्या विमानाला अंगावर घेतले ते आपल्या एका असामान्य शूर वीराने.. श्री. अजामदा बोपय्या देवय्या हे त्या शूर वैमानिकाचे नाव..

या असामान्य शूर वीराने आपले विमान सरळ त्या अजस्त्र एफ् १०४ स्टार फायटरच्या अंगावर घातले! सरळ समोरासमोर धडकवले! याची परिणती काय होणार, हे देवय्यांना पुरेपूर माहीत होते.. तरीही भारतमातेच्या या सुपुत्राने आपल्या हवाईदलासाठी अत्यन्त बहुमूल्य असलेल्या उरलेल्या सात विमानांसाठी आणि त्या पेक्षाही बहुमोल असलेल्या आपल्या वैमानिकांसाठी आपल्या प्राणाची या यज्ञात आहुती देण्याचे ठरविले होते. इतर कोणत्याही प्रकारे ते विमान पाडणे, त्या वेळी शक्य नव्हते.. आणि सरळ आपल्या अंगावर धावून येत असलेल्या या मृत्यूला पाहून त्या पाकी विमानाच्या वैमानिकाने पॅराशूटमधून सरळ खाली उडी मारली! स्क्वाड्रन लीडर देवय्या आपले विमान घेऊन सरळ त्या विमानावर वेगाने आदळले!! त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहेऱ्यावर विजयाची स्मितरेषा नक्की चमकली असेल, याची मला पूर्ण खात्री आहे..

आपल्या परतलेल्या सातही वैमानिकांना युद्ध समाप्तीनंतर वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. परंतु स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता. त्यांना बहुधा अपघात होऊन त्यांचे विमान पाकिस्तानात पडले किंवा पाडले गेले असावे आणि त्यांना युद्धकैदी बनविले गेले असावे, असे भारतातील वायुदलाच्या क्षेत्रात समजले जात होते.

परंतु जवळपास बावीस वर्षांनी एका पुस्तकामुळे देवय्यांचा हा पराक्रम उजेडात आला. ब्रिटिश लेखक जॉन फ्रिकर यांना पाकिस्तानने १९६५च्या युद्धाचा अभ्यास करण्यासाठी बोलाविले, तेव्हा त्यांनी केलेल्या संशोधनात सत्य उलगडले. आपल्यामागून आपला पाठलाग होतोय आणि जर हा संभाव्य हल्ला आपण रोखला नाही तर आपला सर्वांचा विनाश आहे हे ओळखून ते मागे फिरले आणि त्यांनी ते अजस्त्र एफ १०४ स्टार फायटर अंगावर घेतले! याला विमानयुद्धाच्या भाषेत ‘बुल फाईट’ म्हणतात. आणि यात आपल्या चिरकूट विमानाने एफ १०४ पाडले.. हे प्रचंड आश्चर्य!! हा आश्चर्याचा धक्का हे विमान बनविणाऱ्या त्या लॉकहिड मार्टिन कंपनीलाही बसला. त्यांनी या घटनेचा समग्र अभ्यास केला आणि आपल्या विमानात नंतर सुधारणा केल्या! 

स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा हा भीमपराक्रम समजायला आपल्याला बावीस वर्षे लागली. मात्र आपल्या सरकारने त्या नंतर त्यांना तेवीस वर्षानंतर ‘मरणोत्तर महावीर चक्र’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. महावीर चक्र हा युद्ध काळातील परमवीर चक्राच्या खालोखालचा सन्मान आहे!! देशाच्या इतिहासात मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त करणारे एकमेव नाव आहे – – 

– – स्क्वाड्रन लीडर देवय्या!! 

ही आहे कहाणी स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची! भारतमातेच्या या थोर सुपुत्राची.

आज ही कहाणी ज्ञात होण्याचे कारण म्हणजे श्री. अक्षयकुमार यांचा आजच पाहिलेला ‘स्काय फोर्स’ हा अप्रतिम चित्रपट.. संपूर्ण चित्रपटभर आपला ऊर अभिमानाने भरून येतो. तर कधी देवय्याजी आणि त्यांच्या सोबत्यांच्या कहाणीने डोळ्यांतून अखंड अश्रू वाहतात. त्या वेळच्या सैन्यदलांच्या अवस्थेने मन विषण्ण होते. आपल्या सरकारच्या बेफिकीरीमुळे आपल्या सैनिकांच्या निष्कारण होणाऱ्या मृत्यूंमुळे मन हळहळते..

तर मंडळी, एकदा चित्रपटगृहात जाऊन हा देशप्रेमाचा.. स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची, भारतमातेच्या या थोर सुपुत्राची कहाणी सांगणारा हा चित्रपट जरूर पहा.. !! 

लेखक : श्री सुनील कुळकर्णी

तळे, पुणे

लेखक : श्री विनीत वर्तक ( माहिती स्त्रोत :- गुगल, नासा )

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments