श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि विज्ञानाचे मर्म…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.
राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की, अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा पहिला नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी मग तीच मुक्ररर झाली. तोच आज आपण साजरा करत असतो, तो हा राष्ट्रीय विज्ञान दिन.
विज्ञान म्हणजे काय?
एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यांपुढे कसल्या प्रतिमा येतात? चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठमोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकडय़ांची गिचमिड, पृथ्वीभोवती गरगरणारे तारे, ग्रह, धुमाकेतू, आकाशात होणारी ग्रहणे, फ्रिज, टीव्ही, मोबाईल फोनसारखी दररोजच्या वापरातील अत्याधुनिक उपकरणे, पांढऱ्या कोटातले रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे दिसणारे शास्त्रज्ञ… आणि मनात कुठले शब्द येतात? न्यूटन, आइनस्टाइन, निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय. हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे; पण विज्ञान याच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास तर—
१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.
२. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.
३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही, तर सत्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते. अशाप्रकारे विज्ञान हे निरंतर सत्याचा शोध घेत असते.
४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.
५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच शेकडो शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत, त्यात आपले योगदान देऊन विज्ञानाला आणि स्वत:लाही समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.
वैज्ञानिक पद्धत कशी असते?
काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू म्हणजे गृहीतक ठरविणे. त्यानंतर या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता… प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धत परत परत तपासून पहात पुन्हा नव्याने सुरुवात करणे. आपले गृहीतक चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे. जर अनेक प्रयोगांनी चुकीचे ठरले नाही तरच ते गृहीतक स्वीकारणे आणि वैज्ञानिक सिद्धांत तयार करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते. तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयाचा जर आपण अलिप्तपणे विचार केला नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यातून मग छद्मविज्ञानाची निर्मिती होईल. छद्मविज्ञानात आपण निष्कर्षाला पूरक असे प्रयोग करत जातो. त्यामुळे विज्ञानाची हानी तर होते पण लोकांमध्ये अंधश्रद्धाही बळावतात.
विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो. या वैज्ञानिक तत्वांची आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते… असायला हवी. विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. आणि ते सत्य शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव वैज्ञानिक पद्धत.
खऱ्या वैज्ञानिक पद्धतीमुळेच आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले आहे. स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाचे नाव आपण ऐकले असेलच. त्यांनी केलेल्या निरीक्षण प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले आहे की, हे विश्व भौतिक आणि रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे या विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या सगळ्या घटना आणि यापुढे भविष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनाही भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचा परिपाक आहेत आणि असणार आहेत. म्हणूनच या विश्वाचा कोणी निर्माता नाही. हे विश्व भौतिक-रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे स्वयंभू आहे. या घटना विविध पातळीवर निरंतर घडत राहत असतात आणि म्हणूनच विज्ञानसुद्धा निरंतर असते.
थोडक्यात काय तर, विज्ञान ही एक सत्याचा शोध घेण्याची पध्दत वा प्रक्रिया आहे. वैज्ञानिक सत्य हे सर्वांनाच एकसारखे लागू पडते. अमुक एक ह्या धर्माचा, ह्या वर्णाचा, गटाचा, पंथाचा, म्हणून त्याच्यासाठी हे वैज्ञानिक सत्य, तमुक एक त्या धर्माचा, वर्णाचा, पंथाचा म्हणून त्याच्यासाठी वेगळे वैज्ञानिक सत्य हे असे घडत नसते. म्हणून विज्ञानाने शोधलेले सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. विज्ञानाची सत्ये सर्वकालीक असून जगभर सर्वांना सारखीच लागू पडतात. तसेच ती सर्वमान्य असतात. कारण ते कोणालाही पडताळून पाहता येते. म्हणून आपण आपले जगणे, राहणे, वावरणे या वैज्ञानिक सत्याच्या प्रकाशातच पारखून घ्यायला पाहिजे. आपले जीवन वैज्ञानिक सत्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?
कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण. अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल. किंवा असंही म्हणता येईल की, जेवढा पुरावा उपलब्ध आहे तेवढाच विश्वास ठेवणे. एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण”निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग.” या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपली दृष्टी कशी प्रगल्भ होते हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया…
वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकरतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकांना मूर्खात काढण्याचं प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात. चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते. जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले आणि दुष्ट शक्तिमुळे वाईट घडते असे अजिबात होत नाही. जे काही घडते त्यामागे निश्चितच कारण असते, आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते.
विज्ञानाचे मर्म काय —
– – तेव्हा विज्ञानाचे मर्म ओळखण्यासाठी लक्षात ठेवा…
*
विज्ञान म्हणजे जग जाणण्याची कृती,
तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची कृती.
*
विज्ञान असते निसर्ग निर्मित
तंत्रज्ञान असते मानव निर्मित.
*
विज्ञानाचा शेवट होतो तत्वज्ञानात
तंत्रज्ञानाचा शेवट होतो मनवी मनात.
*
म्हणूनच विज्ञान नाही शाप नाही वरदान
तंत्रज्ञान मात्र शाप आणि वरदानही.
*
विज्ञान दाखवते नेहमी प्रगतीची वाट
तंत्रज्ञान कधीकधी धरते अधोगतीची वाट.
*
विज्ञानाचे असे हे दुधारी शस्त्र
तंत्रज्ञान मात्र कधीकधी होते अस्त्र.
*
विज्ञानाने उजळतात निसर्गाच्या दशदिशा
मानवी मन मात्र ठरवते तंत्रज्ञानाची दिशा.
*
विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञाने जन्मती
तंत्रज्ञानाचे सुकाणू मात्र मानवाच्या हाती.
*
विज्ञानाचा विघातक उपयोग मानवच करिती,
तरीही विज्ञानालाच शिक्षित मंडळी दोष देती…
*
म्हणून समस्त मानवा प्रार्थितो जगदीशा,
मानवाच्याच उद्धारा निवडावी विज्ञानाची दिशा.
*
© जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अतिशय सुंदर आणि विज्ञानाची परिभाषा सुस्पष्ट शब्दात सांगणारा लेख!