सुश्री सुनीला वैशंपायन
वाचतांना वेचलेले
☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
☆
एके दिवशी तुकोबा
असे तीरावरी आले..
अन् इंद्रायणीलागी थोडे
हसून म्हणाले…
*
तुला द्यायचीच होती
माझी गाथा परतुन..
मग पहिल्याच दिशी,
दिली का न तू आणून?
*
उगा मला तिष्ठविले असे
तुझिया काठाला
दिस चवदा असा तू माझा
अंत का पाहिला.. ?
*
बोले इंद्रायणी मग..
तुम्ही भक्तांचे भूषण
अशा जगाच्या गुरुचा
अंत मी कसा पाहीन.. ?
*
ऐका तुकोबा..
कधीच कोणा कळली न मात..
काय घडले सांगते
खोल माझिया डोहात..
*
अशी गाथा त्या दिवशी
आली डोहाच्या तळाशी..
जणू कुबेराचे धन
आले माझिया हाताशी..
*
असा अमृताचा घट
येता सहजी चालून..
कोणी देईल का ??
थोडी चव घेतल्या वाचून ?
*
तशी गाथा अवचित
माझ्या हाताला लागली..
सारे विसरून जग
मीही वाचाया घेतली..
*
पुरे चवदा दिवस केले
तिचे पारायण
आणि मगच तुकोबा..
दिली तुम्हा परतून.. !
*
तुम्ही आभाळाएव्हढे..
अंत मी काय पाहीन..
गाथा तारी जगताला
तिला मी काय तारीन ?
*
सारे जग शुद्ध होते..
बुडी माझ्यात घेऊन..
गाथा वाचून तुमची
गेले मीच उद्धरून
☆
कवी : केशवानंद
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈