श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
शेवटी काल मी माझे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रयत्न होता तो बायकोला टू व्हीलर शिकवण्याचा. यासाठी मी सगळे प्रयत्न केले.
तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… फोर व्हीलर सारखं खूप किचकट नाही… किती दिवस तू माझ्यावर किंवा रिक्षावर अवलंबून राहशील… अशा प्रोत्साहन देणाऱ्या अनेक वाक्यांपैकी काही मी मनापासून ऐकवली… तर काही मनात नसतांना सुध्दा…
आता नवीन गाड्या आहेत. किक फार कमी वेळा मारावी लागते. बटन दाबलं की सुरू होते. पाय जमिनीवर टेकतील इतकीच उंची असते. आणि एक्सीलरेटर हळूहळू वाढवलं कि आपोआप पुढे जाते. असा अभ्यासक्रमाचा काही भाग तोंडी सांगून झाला होता.
थोडफार प्रात्यक्षिक सुध्दा सुरू झालं होतं. पण त्यात गाडी शिकण्यापेक्षा सुरुवातीला अडचण आली ती साइड मिररची…
ते गोल गोल आरसे काढून टाका, आणि दुसरे चांगले चौकोनी, उभे, आणि स्लिम असतील ते लावा… पहिली सुचना…
आता काय झालं मला काही सुचेना… का?… असं विचारण्याची मी हिंमत केली. तसंही बऱ्याचदा का?… असं हिंमत करुनच विचारावं लागतं…
त्या गोल आरशात मी गोल गोलच दिसते…
अगं पहिला मुद्दा तो आरसा आपल्या स्वत:ला पाहण्यासाठी नसतोच. मागून कोण येतय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी असतो. आणि असंही बाहेर पडतांना तु मोठ्या, पूर्ण उंचीच्या, आणि गोल नसलेल्या आरशात पाहूनच बाहेर पडतेस नां. मग परत त्या छोट्या आरशात स्वत:ला पाहण्याची काय गरज… आणि आरसा जे आहे तसंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न करतो… शेवटचं वाक्य मी हळूच म्हंटल. तरीसुद्धा माझा चेहरा चौकोनी आणि तिचा गोल झाला आहे असं उगाचच पण खरं तेच वाटल…
मागून कोण येतंय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आरसा असतो हे वाक्य तिला पाठ झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या प्रात्यक्षिकात ती गाडी चालवत असतांनाच तिने गाडीचा वेग कमी केला, आणि थोडी बाजूला करून उभी राहिली…
आता काय झालं?… माझा प्रश्न..
काही नाही, आरशात एक बाई मागून येते आहे ती दिसली… म्हणून…
तीला पुढे जायचं असेल तर ती जाईल नां… तितकी जागा आहे… पण तु वेग कमी करत बाजूला गाडी थांबवली हे मस्त…
प्रश्न तिला जायला जागा आहे का नाही याचा नाहीच… तिची साडी मस्त आहे… कुठली आहे… आणि पदर कसा आहे हे बघायचं आहे… त्या बाईंच सोडा, पण या आरशात साडी काही नीट दिसलीच नाही…
मी निरुत्तर…
पण या थांबण्यामुळे तिने साडी सह बाईंकडे… आणि मी त्या… बाईंसह साडीकडे पाहून घेतलं…
पण या कारणांमुळे मी माझे प्रयत्न सोडले असं नाही. त्याला कारण वेगळंच होतं…
आज सुटिचा दिवस होता. रोज दोघांच सकाळी कामावर जाणं. सकाळचं जेवण डब्यात. यामुळे घरी नाश्ता हा प्रकार जवळपास नसतोच. आज मी सहज म्हटलं. खायला जरा पोहे करा… वर मस्त नारळाचा किंवा खोबऱ्याचा किस… कोथिंबीर… लिंबू… मजा येइल…
त्यावर उत्तर आलं… हं तो वरचा डबा घ्या… पोहे आहेत त्यात… चाळणीने चाळून घ्या… थोडे भिजवा… दोनचार मिरच्यांचे तुकडे करा… बाकी फोडणी, मीठ, हळद हे मी सांगते… आणि खोबऱ्याचं पण बघते…
एखाद्या गोष्टीचं खोबरं होण म्हणजे काय असतं, ते मला समजलं…
येवढ्यावरच ते बोलणं थांबलं नाही, तर फक्त रिक्षेचा उल्लेख सोडला तर माझी वाक्य…
तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… हि वाक्य तशीच, तेवढ्याच तन्मयतेने आणि उत्साहाने मलाच ऐकून दाखवली…
यात परत फोर व्हीलर सारखं किचकट नाही, या माझ्या वाक्याप्रमाणे पाकातले चिरोटे करण्याइतकं किंवा अनारशा सारखं किचकट नाही… असं पण ऐकाव लागलं.
आणि मी माझे शिकवण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे ठरवलं… तिला फक्त गाडी शिकवायची होती… पण मला बरंच काही शिकावं लागलं असतं… शिकवणं कठिण असेल पण शिकणंही सोप्पं नसतं…
आता काय?… तिने पोहे करायला घेतले आहेत… आणि पोहे खाऊन झाल्यावर तिला एका ठिकाणी जायचं आहे तिथे सोडायला मी…
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈