पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘हेलावल्या सुवासात कशा डुंबती चिमण्या…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(28 फेब्रुवारी.. राष्ट्रीय विज्ञान दिन.. एक अनमोल आठवण)

माझी मैत्रीण आणि मराठी विज्ञान परिषदेची कार्यकर्ती, डॉ. मानसी राजाध्यक्षने मला बीएआरसीमधील ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदे’च्या, सुवर्णमहोत्सवी अधिवेशनात ‘मंगलदीप’ कार्यक्रमासाठी विचारले नि अत्यानंदाने मी या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमास होकार दिला. तत्क्षणी डोळ्यांपुढे मी सर्व वैज्ञानिकांसमोर गातेय असे मनोहारी दृश्य तरळले आणि एका इतिहास घडवणार्‍या कार्यक्रमाचा वर्तमानपट चालू झाला. हा कार्यक्रम सर्वांच्या चिरंतन स्मरणात रहावा, या ध्येयानं मी झपाटले. गाण्याबरोबर विज्ञानाशी सांगड घालून निवेदनही उत्तम व्हावे, या तळमळीने विज्ञानावरची माहिती जळी-स्थळी, मधुमक्षिकेप्रमाणे गोळा करत गेले.

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून रियाझ करताना ‘मंगलदीप’ डोळ्यांसमोर फेर धरू लागला. कोर्‍या कॅनव्हासवर माझे रंगांचे फटकारे सुरू झाले. संध्याकाळी प्रचंड मोठे आवार असलेल्या जगप्रसिद्ध बीएआरसीमध्ये शिरताना ‘उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा’ असा आनंद होत होता. खचाखच भरलेल्या सभागृहात समोरच बसलेले थोर वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. जयंतराव नारळीकर, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी व अनेक विद्वान मंडळी मला ऐकायला आलेली पाहून मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटला! ‘‘बालपणी शाळेच्या पुस्तकात ज्या दिग्गजांची नावे वाचली त्यांना पाहण्यासाठी, ते दिसतात कसे, बोलतात कसे हे ऐकण्यासाठी हा कार्यक्रम मी त्वरित घेतला, ’’ असे सांगितले. यावर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात देशाच्या खर्‍या हिरोंचे स्वागतच केले. ‘न हि ज्ञानेन सदृशमं, पवित्रं इह विद्यते, ’… ‘‘या जगात ज्ञानाशिवाय इतकी पवित्र आणि सुंदर कुठलीच गोष्ट नाही, ’’ असे सांगून या बुद्धिवंतांसमोर ‘मंगलचरणा गजानना’ या बुद्धिदेवतेच्या वंदनेने प्रारंभ केला. नंतर कविवर्य शंकर रामाणींच्या ‘दिवे लागले रे दिवे लागले’ या कवितेविषयी म्हटले, ‘‘ही एका स्पेशल जागी म्हणजे न्हाणीघरात स्वरबद्ध झालीय! जिथं कॉन्सन्ट्रेशन होतं. ’’ अशाच जागी आर्किमिडीजलाही त्याचा सिद्धांत सुचल्यावर तो ‘युरेका युरेका’ म्हणत ध्यानमग्न अवस्थेत बाहेर आल्याचे सांगताच, छप्पर फाड के टाळ्या कोसळल्या! अक्षरशः लाव्हारस भूगर्भातून उसळल्यासारखा! एकाच वेळी माझ्या नि हजार बुद्धिमंतांच्या मनातले विचार, एक होऊन त्याला अशा टाळ्या येणं याला मी ‘परमेश्‍वरी कृपाप्रसाद’ म्हणेन. मी म्हटलं, ‘दिवे लागले…’ ही कविता शंकर रामाणींऐवजी थोर शास्त्रज्ञ एडिसननेच विजेच्या दिव्याचा शोध लावल्यावर ‘युरेका युरेका’ म्हणण्याऐवजी ‘दिवे लागले रे दिवे लागले… तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले…’ असेच म्हटले असेल.

त्या काळी विजेच्या दिव्याचा अन् अनेक शोध लावून एडिसनने संपूर्ण जग देदीप्यमान केलं, उजळवलं आणि तुमच्यासारख्या विद्वान मंडळींनी समाजाला असं भरभरून दिलंय, की ‘कुणी जागले रे कुणी जागले…’ आपण सारे एकत्र गाऊन हे सभागृह सुरांनी उजळूया… विज्ञानाशी व एडिसन, आर्किमिडीज यांच्याशी नाळ जुळल्याने सारे सभागृह गात गातच टाळ्या वाजवत समरसून गेले.

आत्तापर्यंत संपूर्ण हॉलभर रसिकांनी ‘पद्मजाला’ अलवारपणे ओंजळीत उचलून, एका सुंदरशा कमळाच्या पाकळ्यांवरती स्टेजवर विराजमान केलं होतं.

पुढचे काव्य इंदिरा संतांचे! केवळ सजीवच नाही, तर संपूर्ण निसर्गातल्या निर्जीव गोष्टींनाही जिवंतपणे मांडण्याची ताकद त्यांच्या कवितेत दिसते. तसंच वनस्पतींनाही प्राण्यांप्रमाणे जीव असतो, त्याही श्‍वासोच्छ्‌वास करतात, असं सिद्ध करणार्‍या थोर वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचं कार्य आणि इंदिराबाईंच्या काव्याची गुंफण घालून ‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…’ म्हणत सोनचाफ्याच्या पावलांनी आलेल्या सर्वांचे पुन्हा स्वागत केले. शास्त्रज्ञ हा कल्पनेची मोठी झेप घेतो आणि त्याचे स्वप्न सत्यात उतरवतो. ‘स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले…’ हेच खरं! परंतु कवीच्या बाबतीत मात्र ‘जे ना देखे रवी ते देखे कवी, ’ असं म्हणतात. मंगेश पाडगांवकरांबद्दल हेच म्हणावे लागेल. कारण मध्यंतरी ‘‘शुक्र हा ग्रह आहे की तारा?’’ असं विचारल्यावर अनेक सुजाण मंडळींनी अगदी सहज तारा असं उत्तर दिलं 

( हशा!) ‘शुक्रतारा मंद वारा ’सारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे शुक्र हा नक्कीच ‘तारा’ आहे, असा सर्वांचा ‘ग्रह’ होतो. पण माझा तसा ‘आग्रह’ नाही. हा श्‍लेष ऐकून प्रत्येकजण खळाळून दाद देत होता. नंतर पाडगांवकरांची ‘मी तुझी कुणी नव्हते’ कविता गायले, ज्यातही शुक्रतारा आहेच!

त्यानंतर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत !… सूर्याच्या आकंठ प्रेमात बुडालेली पृथ्वी (कणखर स्त्री) सूर्याला म्हणते…

‘‘परी भव्य ते तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे,

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे…’’

हे संगीतात माळलेलं, पृथ्वीचं परिवलन नि परिभ्रमणही सादर केलं. ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ मांडणारे नि ‘आकाशाशी जडले नाते’ असलेल्या डॉ. नारळीकरांना मी हे गीत अर्पण केलं. टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना स्वीकारताना त्यांच्या चेहर्‍यावर अतुलनीय आनंद दिसत होता.

त्यानंतर ‘केव्हा तरी पहाटे…’ झाल्यावरच्या धो धो टाळ्या म्हणजे ‘उरले उरात काही आवाज चांदण्यांचेच…’ होते. मी म्हटले, ‘‘इथं अनेक स्वयंप्रकाशी, देदीप्यमान तारे या नभांगणात तेजाळत आहेत. ’’ तेव्हा या चांदण्यारूपी टाळ्या म्हणजे अंगावर प्राजक्ताचा सडाच होता !

यानंतर भारताला ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ हा महामंत्र देणार्‍या, तसंच १९९८ च्या पोखरण अणुचाचणीनंतर भारताची ज्ञान आणि विज्ञानातली प्रगती, यांचं महत्त्व ज्यांनी अधोरेखित केलं, असे भारताचे लाडके माजी पंतप्रधान… अटलजींची कविता ‘गीत नया गाता हूँ…’ किस्सा सांगून सादर केली. अटलजींच्या कवितांचे रेकॉर्डिंग त्यांना ऐकवण्याकरिता आम्ही १३ मे १९९८ ला दिल्लीला गेलो. त्याच दिवशी नेमकी पोखरण अणुचाचणी झाल्याने पी. एम. हाऊस मीडियावाल्यांनी गच्च भरलेले.

भारतावर इतर देशांचा प्रचंड दबाव असल्याने तणावामुळे अटलजींना भेटणे कठीण होते.

शेवटी ३ मिनिटे ठरलेली भेट, ते त्यांच्या कवितेत रममाण झाल्याने २० मिनिटांपर्यंत लाभली… या चाचणीने शांतताप्रिय भारताने, ‘हम भी कुछ कम नहीं’ हे जगाला दाखवून दिले. ‘‘या चाचणीच्या मुख्य चमूचे तसेच थोरियमवर आधारित भारतीय अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक असलेल्या डॉ. अनिल काकोडकर यांना मी अभिवादन करते…’’ 

माझे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच टाळ्यांचा महापूर झाला! 

डॉ. काकोडकरांचा हजार शास्त्रज्ञांच्या साक्षीने त्यांच्याच बीएआरसीमध्ये माझ्या सुरांनी सन्मान करतानाच्या अलौकिक क्षणी, माझा ऊर नि डोळे अभिमानाने भरून आले.

कार्यक्रमाची सांगता मी संगीत नि शास्त्रज्ञांचे नाते उलगडत केली. ‘‘भारतरत्न डॉ. कलाम साहेब उत्तम वीणा वाजवत. ’’ हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या चेहर्‍यावर १००० व्हॅटचा तेजस्वी प्रकाश होता. आज ते असते तर कार्यक्रमाचा मुकुटमणी ठरले असते.

दिल्लीतील माझ्या संसदेच्या कार्यक्रमात डॉ. राजारामण्णांना उत्कृष्ट पियानो वाजवताना जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ. राजारामण्णांचे नाव ऐकताच, आपल्याच घरच्या व्यक्तीचे नाव घेतल्याचा आनंद आणि टाळ्या टाळ्या टाळ्या…! (नंतर मला कळले की, ते डॉ. काकोडकरांसारख्या अनेक महान वैज्ञानिकांचे गुरू होते.)

तसेच फॅबियोला गियानोटी ही स्त्री वैज्ञानिकही उत्तम पियानो वाजवते. हर्शेलसारख्या संगीतकाराने सूर्यमालेतील सातव्या ग्रहाचा, युरेनसचा शोध लावून मग खगोल शास्त्रज्ञ म्हणून नाव केले.

‘‘विश्‍वातला प्रत्येक शास्त्रज्ञ हा देश व मानव कल्याणासाठी झटत असतो. ज्ञानेश्‍वरी तर विश्‍वकल्याणाचे सार आहे, ’’ असे सांगत मी संपूर्ण वंदे मातरम्‌ने सांगता केली.

रसिकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर मी डॉ. नारळीकरांना भेटले. ‘‘पृथ्वीचे प्रेमगीत मला परत कुठे ऐकायला मिळेल?’’…. हा प्रश्‍न ‘वन्स मोअर’सारखा आनंद देऊन गेला.

डॉ. काकोडकरांना भेटल्यावर, ‘‘तुमचे शब्द गातात नि सूर बोलतात’’ असा त्यांनी गौरव केला.

संपूर्ण कार्यक्रम नि टाळ्यांचा पूर आजही मनात इंदिराबाईंच्या शब्दाप्रमाणे रुंजी घालतोय… 

‘‘खाली सुगंधित तळे 

उडी घेतात चांदण्या,

हेलावल्या सुवासात,

कशा डुंबती चिमण्या…’’

…. ते क्षण मी पुन्हा पुन्हा जगतेय.

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments