श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ पिल्लू (सोडणे) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
लेखाचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ! हा ‘ पिल्लू सोडणे ‘ काय प्रकार आहे हे मला खरोखरच काही वर्षांपूर्वी माहिती नव्हतं. पहिल्यांदा माझ्या एका मित्राकडून हा वाक्प्रचार मी ऐकला. मला त्या शब्दाची मोठी गंमत वाटली. मग मी कुतूहलाने त्याचे बोलणे ऐकत राहिलो. माझा हा मित्र एका राष्ट्रीयकृत बँकेत कामाला होता. त्याच्या बँकेत घडलेल्या गमतीजमती तो संध्याकाळी फिरायला जायचे वेळी मला सांगायचा. अमुक एक असं म्हणाला. तो तसं म्हणाला. काही लोकांकडे खूप कामं असायची. नेमून दिलेली कामं करणं त्यांच्या जीवावर यायचं. मग ते काहीतरी पिल्लू सोडून द्यायचे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मॅनेजरला अशी काहीतरी गोष्ट सांगायचे की ती त्याला नाकारताही यायची नाही. म्हणजेच एखादी सांगयाची. ती गोष्ट मॅनेजर खरी मानून चालायचा आणि पुढे चालून ती प्रथा पडायची. म्हणजेच ते सोडून दिलेलं पिल्लू हळूहळू मोठं व्हायचं.
आपल्या अवतीभवती सुद्धा असे अनेक लोक आपण पाहतो. काहीही माहिती नसताना ते एखादं पिल्लू सोडून देतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते अफवा पसरवण्याचं काम करतात. यालाच कोणी कंड्या पिकवणे असेही म्हणतात. असं एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून देऊन हे लोक नामानिराळे होतात आणि मग आपण सोडून दिलेलं पिल्लू मोठं होताना पाहून त्यांना मोठी गंमत वाटते किंबहुना तो त्यांचा एक खेळच असतो. मग त्यामुळे कोणाला मनस्ताप झाला, कोणाचे नुकसान झाले तरी त्यांना पर्वा नसते किंबहुना तसे व्हावे हीच त्यांची सुप्त इच्छा असते. जाणाऱ्याचा जीव जातो पण पाहणाऱ्याचा खेळ होतो अशातला हा प्रकार !
एकदा सोडून दिलेले असे पिल्लू म्हणजे जणू काही अनाथ पोर ! त्याला ना आई, ना बाप ! मग ते हळूहळू मोठे होत जाते. ते कसेही वागले तरी त्याची जबाबदारी कोणावरच नसते. दुपारी माध्यान्हाच्या वेळेला पडणारी आपली सावली लहान असते, पण जसजशी संध्याकाळ होत जाते तसतशी ती मोठी होत जाते. तसेच हे पिल्लू ही सुरुवातीला लहान असते. नंतर मोठे होत जाते. पण सावलीमुळे कोणाचे नुकसान होत असल्याचे ऐकिवात नाही. फक्त भयपटात सावल्या भीती दाखवण्याचे काम करतात तो भाग वेगळा ! पण हे असली पिले मोठी झाली म्हणजे समाजाचे भयंकर नुकसान करतात.
कोरोनाच्या कालावधीत तर कितीतरी भयंकर अफवा पसरवण्यात आल्या किंवा पिल्लू सोडण्यात आले. त्यामुळे काही लोकांचा फायदा झाला असेलही पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. काहींनी नको त्या गोष्टी सांगून लोकांना घाबरवले कोणी अमुक एक औषध उपलब्ध नाही म्हणून अफवा पसरवली. कोणी काही तर कोणी काही. त्रास मात्र सगळ्यांना झाला.
सध्या जे दहा रुपयाचे नाणे चलनात आहे, त्याबद्दलही मध्यंतरी कोणीतरी पिल्लू सोडून दिलं होतं की हे नाणे बंद झाले आहे. आमच्या गावातील तर बऱ्याच लोकांनी ते दहा रुपयाचे नाणे घेणे बंद केलं होतं. बँकेतील लोकांना विचारले तर ते म्हणाले की असा कोणताही निर्णय रिझर्व बँकेने घेतला नाही शेवटी रिझर्व बँकेलाच असं जाहीर करावं लागलं की हे नाणं बंद केलेलं नाही, ते चलनात आहे. पण तोपर्यंत बऱ्याच लोकांना मनस्ताप सोसावा लागला होता.
हल्ली सोशल मीडिया हे कुठले तरी पिल्लू सोडून देण्याचे एक प्रभावी माध्यम झाले आहे लोकांच्या जातीय किंवा धार्मिक भावना भडकतील अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडिया वरून बऱ्याच वेळा पसरवल्या जातात आणि मग पोलिसांना किंवा राज्य शासनाला अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करावे लागते. पूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याबद्दलही विविध अथवा उठवल्या होत्या. अमुक एक तेल आरोग्यासाठी चांगलं आहे आणि अमुक एक तेल आरोग्यासाठी घातक आहे अशा प्रकारची खेळी तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या जीवाशी अनेक वेळा खेळली आहे आणि आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. शेंगदाणा तेल आरोग्यासाठी वाईट, खोबरेल तेल आरोग्यासाठी वाईट अशा प्रकारचा अपप्रचार त्यासाठी करण्यात आला. या सुद्धा एक प्रकारच्या अफवाच होत.
काही दिवसांपूर्वी जळगावजवळ एका रेल्वे अपघातात १२ जणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ही नुकतीच घडलेली घटना आहे. त्यालाही अशा प्रकारची अफवाच कारणीभूत होती. कोणीतरी अशी अफवा पसरवली की रेल्वेच्या डब्यात आग लागली आहे. लागलीच त्या डब्यातील प्रवाशांनी घाबरून रेल्वेबाहेर उड्या मारल्या. त्यावेळी गाडी एका रेल्वे वळणावरून धावत होती. विरुद्ध बाजूने वेगाने येणारी एक्सप्रेस लोकांना वळण असल्यामुळे दिसली नाही. त्यांनी बाजूच्या रेल्वे रुळावर उड्या घेतल्या आणि क्षणार्धात त्या गाडीखाली सापडून त्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. एखादी अफवा पसरवण्याचे परिणाम केवढे भयंकर होतात ! मग ती जाणूनबुजून पसरवलेली असो की नसो !
बऱ्याच वेळा अशा अफवा पसरवल्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगे घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारची अफवा पसरवणारे हेतूपुरस्सर अशा अफवा पसरवतात आणि आपला अनिष्ट हेतू साधून घेतात. काही राजकीय व्यक्तींचा देखील अशा घटनांमध्ये सहभाग असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. चित्रपटातूनही आपण अशा घटना पाहतो. त्यांनीही अशाच प्रकारे आपली पोळी भाजून घेतली आहे. पण याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागले आहेत त्याशिवाय समाजात दुफळी निर्माण होते ती वेगळीच ! बऱ्याच वेळा गर्दीच्या ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा जत्रेत कोणीतरी काहीतरी अफवा पसरवतं आणि मग चेंगराचेंगरी होऊन हजारो लोकांचे बळी जातात. अशाही अनेक घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. पण समाज शहाणा होत नाही हे दुर्दैव !
म्हणून समाजाचे देखील एक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे. ती म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवणे. त्यासाठी आपल्याला पोलीस, विविध स्वयंसेवी संस्था, बँका वेळोवेळी आवाहन करीत असतातच. अशी एखादी संवेदनशील गोष्ट आपल्या कानावर पडली तर आपण त्यावर विश्वास न ठेवता त्या गोष्टीची खात्री करून घ्यावी आणि मगच योग्य ती पावले उचलावी. एक जबाबदार नागरिक म्हणून अशी खबरदारी आपण तर घेतलीच पाहिजे परंतु आपल्या मुलांना देखील अशा गोष्टींवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही अशी शिकवण दिली पाहिजे. शाळा, कॉलेजेस मधून सुद्धा अशा प्रकारची जागृती घडवून आणणे आवश्यक आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण अफवा न पसरवण्याचा आणि खात्री केल्याशिवाय अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचा निश्चय करूया.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈