सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 262
☆ सहचर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
मी केली नाही कधीच….
खास तुझ्यासाठी कविता !
अधून मधून,
डोकवायचे तुझे संदर्भ….
कधी चांगुलपणाचे,
कधी कडवटपणाचे!
खरंतर किती साधं असतं आयुष्य,
आपणच बनवतो अवघड!
नाहीच भरता आले रंग,
एकत्र,
आयुष्याच्या रांगोळीत!
समांतर रेषांसारखे,
जगत राहिलो,
आता सांजसावल्या,
झेलत असताना,
तू जास्त थकलेला दिसतोस,
भर उन्हातही….
ताठ कण्याने उभा होतास,
मावळतीची उन्हंही,
तशीच झेलत रहा….
सहचरा…..
नाहीच देता आलं काही,
जन्मभर!
स्वर्गात बांधलेल्या गाठी मात्र
निभावल्या गेल्या आपसूकच,
स्वर्गस्थ ईश्वरानंच करावा न्याय,
देता आलंच काही,
तर सहचरा—
देईन तुला उरल्या आयुष्याचं दान!
दयाघना तू आहेसच ना,
इतका महान!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈