सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
इंद्रधनुष्य
☆ पुस्तकंसुद्धा युद्धावर गेली होती त्याची गोष्ट – – ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
मध्यंतरी ‘लोकसत्ता’ मधील बुकमार्कच्या पानावर आलेला ‘आणि पुस्तके चालू लागली’ हा लेख वाचल्यावर साहजिकच नुकतंच हाती आलेलं पुस्तक आठवलं. पुस्तकाचं नाव: ‘When Books Went To War’ आणि लेखिका आहे, मॉली गप्टील मॅनिंग. माझी एक सवय आहे पूर्वीपासून, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचत असताना, त्यात कधी, कुठे त्यांनी वाचलेल्या चांगल्या पुस्तकाचं नाव, संदर्भ आला, की मी लगेच ते नाव माझ्या वाचायच्या पुस्तकांच्या यादीत लिहून ठेवते. असंच या पुस्तकाबद्दल मी बहुधा निरंजन घाटे यांच्या ‘मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट’ या पुस्तकात वाचून लिहून ठेवलेलं होतं. हे पुस्तक तेंव्हा माझ्या मुलानं मला पाठवलं होतं.
1933 च्या सुमारास जर्मनीमधे अर्थातच, हिटलर आणि त्याचा लाडका सेनापती गोबेल्स यांच्या डोक्यातून निघालेली आणि शाळा-कॉलेज मधे शिकणाऱ्या उत्साही किशोरवयीन आणि तरुण मुलांमार्फत राबवून घेतलेली एक भयंकर मोहीम होती. दुसऱ्या महायुद्धाबद्दल आपण बरंच काही वाचलेलं असतं, पण या मोहिमेबद्दल मात्र या आधी मी तरी कुठेही, काहिही वाचलेलं नव्हतं.
जर्मनीतील मोठमोठ्या शहरात, मध्यवर्ती चौकात मोठ्ठाल्ले ओंडके चितेसारखे रचून त्यात शेकडो, हजारो पुस्तकांच्या आहुती दिल्या गेल्या! बर्लिन, फ्रॅन्कफर्ट अशांसारख्या शहरातील विद्यापिठांच्या वाचनालयातील उत्तमोत्तम ग्रंथ आणून या होमात त्यांची आहुती देण्यात आली!
हजारो विद्यार्थी आपापल्या विद्यापिठांचे विशिष्ट रंगाचे कपडे घालून, हातात मशाली घेऊन मोठ्या अभिमानाने या मिरवणुकीत सामील झालेले होते. बर्लिनच्या मुख्य चौकात होणाऱ्या या ‘समारंभां’ साठी पावसाळी हवा आणि प्रचंड गारठा असतानाही चाळीस हजार प्रेक्षक हजर होते. आणि अशा पावसाळी हवेतही या मुलांचा उत्साह, आनंद उफाळून ओसंडत होता!
कितीतरी गाड्या “अन-जर्मन” पुस्तकं भरून घेऊन या मिरवणुकीत सामील झालेल्या होत्या. आणि हे विद्यार्थी(?) मानवी साखळी करून एकमेकांकडे देत, ही पुस्तकं त्या चितेत भिरकावत होते. नाझी एकतेच्या विरोधी विचार असलेली सर्व पुस्तकं ही देशद्रोही ठरवून नष्ट केली जात होती. देशाच्या प्रगतीला विरोधी विचारांमुळे अडथळा निर्माण होत आहे, म्हणून, हे विचार असलेली पुस्तकं जाळण्यायोग्य आहेत, असं या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आलेलं होतं. सिग्मंड फ्रॉईड, एमिल लुडविग, एरिक मारिया रिमार्क हे सगळे लेखक, तज्ञ देशविरोधी लिखाण करत आहेत, असं सांगून त्यांची पुस्तकं जाळण्यात आली. एका मागून एक मोठमोठ्या लेखकांची, शास्त्रज्ञांची पुस्तकं जाळली जात होती, आणि गर्दीमधून हर्षनाद, आरोळ्या उठत होत्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे घडवून आणलेला आहे, अशा अफवा उठलेल्या असल्या, तरी, या कार्यक्रमात येऊन गोबेल्सने भाषण दिल्याने हा कार्यक्रम कोणाच्या आशीर्वादाने घडवून आणला गेलेलं आहे, हे जाहीर झाले! हिटलरच्या आदर्शवादाशी जुळणारी विचारसरणी समाजात निर्माण करण्यासाठी तो आपली ताकद वापरत असे.
बर्लिनच्या या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून तो चालू असताना, रेडिओवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि तो चित्रितही करण्यात आला. आणि नंतर देशभरातल्या थिएटर्समधे ही फिल्म मुख्य चित्रपटाआधी दाखवण्यात येऊ लागली. जसजसा हा प्रचार होत गेला, तसतसे ठिकठीकाणी असे पुस्तकं जाळण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. ज्यू विद्वान व लेखकांची तर सर्व पुस्तकं जाळण्यात आलीच, पण समता, बंधुत्व, समन्यायी व्यवस्था यावर लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांनाही तोच रस्ता दाखवण्यात आला!
नंतर तर नाझींनी लेखकांची, पुस्तकांची यादीच जाहीर केली. कार्ल मार्क्स, अप्टन सिंक्लेयर, जॅक लंडन, हेन्रीक मान, हेलन केलर, अल्बर्ट आईनस्टाईन, थॉमस मान आणि ऑर्थर स्च्नित्झलर. प्रत्येक ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तकं जाळण्याच्या कार्यक्रमाला असाच हजारोंचा समुदाय जमलेला असायचा आणि या प्रत्येक कार्यक्रमाची प्रचंड प्रसिद्धी देशभर केली जात असे.
पण हेलन केलर पासून अनेक मोठ्या, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांनीही या गोष्टीचा विद्यार्थ्यांच्या नावे पत्र लिहून निषेध केला. एच. जी. वेल्सने लंडनमधे निषेधपर जोरदार भाषण केले. 1934 मधे, पॅरीसमधे अशा जर्मनीत जाळलेल्या आणि बंदी घातलेल्या पुस्तकांची लायब्ररी स्थापन करण्यात आली. जर्मनीतून आलेल्या काही निर्वासितांनी देणगी म्हणून अशी पुस्तके या लायब्ररीला दिली. आणि युरोपातील लोकांनीही आपल्याकडे असलेल्या अशा चांगल्या लेखकांची पुस्तकं या लायब्ररीला देणगीदाखल दिली.
अमेरिकेतही वर्तमानपत्रांमधून जर्मनीतील या असंस्कृत मोहिमेचा जाहीर निषेध करण्यात आला.
नंतर हळुहळू हिटलरची मजल पुस्तकांकडून ज्यू लोकांच्या छ्ळापर्यंत, त्यांच्या उच्च्चाटनापर्यंत जाऊन पोचली आणि मग त्याने युरोपातले लहान-सहान देश आक्रमण करून गिळंकृत करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे, तर फ्रेंच रेडीओ वरून त्यांच्या विरूद्धच अपप्रचाराची राळ उडवत आपली वक्र नजर फ्रान्स आणि इंग्लंड वरही असल्याचं जाहीर केलं! आणि मग सगळा युरोपच युद्धाच्या ज्वाळांमधे होरपळू लागला.
हिटलरचा लोकशाही विरोध शेवटी अमेरिकेपर्यंत पोचणार याची निश्चिती वाटू लागल्यावर अमेरिकेलाही खडबडून जागं व्हावं लागलं. पहिल्या महायुद्धानंतर विस्कळीत झालेली सर्व युद्धयंत्रणा परत रुळावर आणण्याचं अवघड काम आधी करावं लागणार होतं.
सुरुवातीला जेंव्हा 1939-40 मधे युरोपात युद्धज्वाळा फैलावू लागल्या होत्या, तेंव्हा अमेरिकन नागरिकांचा या युद्धात सामील व्हायला विरोधच होता. पण बरेच जण असे होते, की ज्यांना यातली अपरिहार्यता कळत होती. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सह अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा अप्रिय सल्ला सरकारला दिलेला होता. त्यांनी हिटलरचे लष्कर किती शक्तिमान आणि यंत्र-शस्त्र सज्ज आहे, आणि त्याने फ्रांसला कसे जेरीस आणले आहे, याचाही दाखला दिला होता. आणि आपण बेसावध असताना जर या सुसज्ज लष्कराला तोंड द्यायची वेळ आली तर कशी दुर्दशा होऊ शकते, याचीही कल्पना दिलेली होती.
हिटलरने स्वतःला लोकशाहीचा कट्टर शत्रू म्हणून जाहीर केले होते आणि अमेरिका ही सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सौम्य-सभ्य अशी लोकशाही नव्हती काय? आणि ‘शत्रू बेसावध असतानाच त्याच्यावर हल्ला करून त्याला गारद करायचा’ हाच हिटलरचा प्रमुख डावपेच असायचा. तेंव्हा आपण वेळीच सावध होऊन तयारीला लागलं पाहिजे, असा त्या वृत्तपत्रांमधील लेखांचा एकूण रोख होता.
1940 च्या सप्टेंबर मधे अमेरिकेच्या कॉन्ग्रेसने ‘सिलेक्टिव्ह ट्रेनिंग अॅन्ड सर्व्हिस’ कायदा मान्य केला. या कायद्यानुसार 21 ते 35 या दरम्यान वय असलेल्या सर्व पुरुषांना लष्करी सेवेत भारती होणे आवश्यक होते. नंतर या कायद्यात दुरुस्ती करून 18 ते 50 वयाच्या पुरुषांना लष्करी सेवेत भरती होणे अनिवार्य करण्यात आले.
लष्करात भरती झालेल्या या लाखो लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी, लष्कराने 46 केंद्र बांधून फर्निचरसकट सज्ज करायचं ठरवलं होतं, पण तेवढा निधीच त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे या सक्तीची भरती केलेल्या लोकांना प्रशिक्षण देणं तर दूरच, उलट त्यांच्या रहाण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे मोठेच आव्हान लष्करापुढे उभे राहिले. अगदी तळामुळापासून करायच्या या तयारीला खूप दिवस लागणार होते. आणि त्यासाठी लागणारा पैसा सरकारकडून मंजूर होऊन मिळायलाही वेळच लागणार होता!
आधी सक्तीची लष्कर भरती आणि नंतर पैसा हातात येईल तेंव्हा कॅम्प तयार करणं यामुळे या भरती झालेल्या लोकांचे विलक्षण हाल झाले. त्यामुळे त्याचं मानसिक धैर्य खूप खच्ची झालं! अनेक कॅम्प्समधे रहाण्याची, जेवणखाण्याची आणि शौचालये किंवा स्नानगृहांची व्यवस्था नव्हतीच जवळपास! आणि या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा युद्धसामग्रीचाही पत्ता नव्हता. लष्कराची अवस्था खरोखरच शोचनीय झालेली होती!
अशा तऱ्हेने उपलब्ध साधनसामग्री मर्यादित कसली, जवळपास नसतानाही, संगीत (गाणा-यांनी गाणे!) आणि मर्दानी खेळ यांनी थोडीफार करमणूक करून घेत असत हे प्रशिक्षणार्थी. पण एकमेकांना अनोळखी असलेल्या या लोकांना इतक्या वाईट परिस्थितीत सतत एकमेकांबरोबर रहावं लागत असल्यामुळे, मोकळा वेळ असेल तेंव्हा शक्यतो एकटं बसावं, घरच्यांना पत्रं लिहावीत किंवा एकट्यानेच काहीतरी वाचत बसावंसं वाटत असे.
लष्करातील वरचे अधिकारी हे जाणून होते, की या कॅम्प्समधील रहाणीचा दर्जा सुधारल्याशिवाय आणि या प्रशिक्षणार्थींना हवी असलेली करमणूक, मनोरंजन याची व्यवस्था केल्याशिवाय त्यांचं मानसिक धैर्य उंचावणार नाही, आणि परिणामकारक प्रशिक्षणही देता येणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची, निर्णायक आहे!
पण जिथे रहाण्यासाठी इमारती आणि चालवण्यासाठी बंदुकी अशा लष्करी प्रशिक्षणासाठी आवश्यक अशा प्राथमिक गोष्टी पुरवण्यासाठीच धडपड चाललेली असताना चित्रपटगृहे आणि खेळांसाठीच्या उत्तम सुविधा पुरवणं अशक्यच होतं! तेंव्हा, त्यांना अशी करमणूक द्यायला हवी होती, की जी लोकप्रियही असेल आणि परवडणारीही! आणि ती म्हणजे पुस्तकंच होती त्या काळात!
मोबाईल फोन नव्हते, आणि टी. व्ही. पण प्रत्येक काना कोपऱ्यात पोचलेले नव्हते असा तो काळ होता. इतके लोक पुस्तकं वाचण्यासाठी इतके उत्सुक होते, हे वाचूनच मन भरून येतं!
पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळीही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पुस्तकं पुरवण्यात आली होती, पण या दुसऱ्या महायुद्धात जितक्या जास्त संख्येने पुस्तकं पुरवण्यात आली, तो जागतिक विक्रम अजून मोडला गेलेला नाही!
या पुस्तकांसाठी एक मोठी मोहीमच अमेरिकेत, देशभरात चालवली गेली! देशभरातील ग्रंथपालांची (लायब्ररीयन्स) एक संघटना होती. तिच्या सभासदांनी एकत्र येऊन, स्वयंसेवकांची मदत घेऊन एक देशव्यापी मोहीम आखली. जागोजागी, ठिकठिकाणी छापील पत्रकं लावली. या पत्रकांमध्ये आपापल्या घरी असलेली पुस्तकं सैनिकांसाठी दान करायचं आवाहन केलेलं होतं. ही पुस्तकं ज्या त्या गावातल्या लायब्ररीत आणून द्यायची होती. मग तिथून ती एका ठिकाणी गोळा करून जिथे जिथे सैनिक लढत होते, किंवा प्रशिक्षण घेत होते, तिथे तिथे पोचवण्यात आली.
जवळपास 40 लाख पुस्तकं अशा प्रकारे गोळा करून सैनिकांसाठी पाठवण्यात आली. या मोहिमेसाठी कित्येक जणांचा हातभार, कष्ट, पैसा सगळंच कामी आलं होतं. हे सगळे तपशीलही मुळातून वाचण्याजोगे आहेत. विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीत.
या पुस्तकांनी सैनिकांसाठी काय केलं, हे अमेरिकन लष्करातील एका मेजरच्या शब्दात : “आमच्या, आणि आमच्याबरोबर लढणाऱ्या इतर देशांच्याही सैनिकांचं आयुष्य जगण्याजोगं केलं या पुस्तकांनी! अमेरिकन सैनिकांचं ते विलक्षण चैतन्यही जागं केलं या पुस्तकांनी! आणि आमचे सैनिक अजूनही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिलेत तेही या पुस्तकांमुळेच!”
अशा प्रकारे, हिटलरने सुरु केलेल्या फक्त युद्धालाच नव्हे, तर त्यानं प्रत्यक्षात आणलेल्या पुस्तकं जाळण्याच्या अमानुष, असंस्कृत मोहिमेला अमेरिकेने हे सुसंस्कृत, जोरदार उत्तर दिलेलं होतं आणि माणसाविरुद्ध आणि माणुसकीविरुद्ध चालवलेल्या प्रत्यक्ष युद्धात आणि सांस्कृतिक युद्धातही हिटलरचा दणक्यात पराभव केला, त्याची ही कहाणी!
© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈