प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
मनमंजुषेतून
☆ वाय फाय बालपण… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
पाव चीट्टी मिट्टी घोडा पुक डोळा झूल !!
एकलम खाजा, डुब्बी राजा तिराण भोजन चार चौकडे पंचलिंग पांडु सायमा गांडू सात कोतडे आष्टिका नल्ली नवी नवं किल्ली दस गुलाबा !!!
मंडळी काय आठवतंय का बघा!! नाही आठवत, बरं. अहो हीच तर आमची परिभाषा! हेच आमचे परवलीचे शब्द. होय हे शब्द आता कोणाला माहित पण नसणार. आमच्या बालपणीचा मोबाईल ग्रुप. आम्ही एका ठिकाणी कधीच शांत बसलो नाही. आमचा ग्रुप हा फिरता होता. अगदी पिंपळावरचा मुंजा! आता गल्लीतील खोताच्या कट्ट्यावर असलो तरी, एकदम डोक्यात काय शक्कल येईल, व सगळेच एकदम गप्प होतील सांगता येत नव्हतं.
त्यावेळी मोबाईलचं काय साधा फोन सुद्धा कुठेही नव्हता! फोन फक्त पोस्ट ऑफिस मध्येचं बघायला मिळणार.
आमची चांडाळ चौकडी ह्या गल्लीतून त्यागल्लीत तर कधी चावडीत, तर कधी कुणाच्याही मळ्यात धुडगूस घालणारी.
सुट्टीचे दिवस तर आम्हाला दिवाळी सारखे वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटली की, गल्लीतील चौकात यायचे, मग चिंन्नी दांडू पाव चीट्टी मिट्टी — चालू व्हायचे.
ते अगदी घरातील कोणीतरी बोलवे पर्यंत. अरे ये पांड्या तुला पोटाची काय खबर हाय की नाय असं डबाड्याची काशी वरडत यायची. झाले मग सगळी सावध व्हायची. डबाड्याची काशी म्हणजे, गल्लीतील आग, दिवसा ढवल्या तिच्या समोरून कोण जात नसे. उठ पांड्या तुझं मड मी बसवलं असं आरडत येणारी पांड्या ची आई काशीबाई! आली तुला पटकी आं, असं उद्धार करणारी पांड्याची आईच, भाकर तुकडा गिळ अन म्हसर सोड असं तीन म्हटलं की, सगळेच घरचा रस्ता धरायचे. पण सगळीच जेवण करून प्रत्येक जण आपापल्या घरातील म्हसर सोडून सगळीच जण मोती तळ्या कडे.
गल्लीतून नाही म्हटली तरी पंचवीस जनावर! सगळी जण चावडीला वळसा घालून वेशीत, वेशितून मारुतीच्या देवळा जवळून हम रस्ता. तेथून मिरज रोडवर तीतून खालच्या अंगाला ओढा पार केलं की मग मोती तळ. मोती तळ तस गावंधरीत असल्याल. मोती तळ्याच्या आजूबाजूला गायरान जमीन. तिथे सगळी म्हसर गेली की आम्ही परत रिकामेच.
म्हसर एकदा सोडली की झाले. परत आमची टोळ की, चिंचेच्या झाडाखाली हजर.
त्याला झाडाखाली आरामात बसलो की झाले. किरण्या खिश्यात पत्ते घेऊन यायचं. हळूच पत्ते काढले की, पक्क्या डोक्यावरचं खोळ करून आणलेलं पोत झटकून हांतरायचा. खोता चा सागऱ्या, पक्या, हणम्या, किरण्या, राज्या असे सगळेच मिळून पत्ते कुटण्यात गर्क. असा डाव रंगत आला असताना सिद्राम येऊन बोन्म्ब मारायचा.
सुकाळीच्यानों म्हसर दुसऱ्यांच्या रानात सोडून पत्ते खेळता व्हय असं म्हटला की आम्ही काय ते समजायचो.
नक्कीच जवळच असलेल्या सिद्रामच्या शेतात म्हसर चर्याला गेलेत. म्हटल्यावं सगळी खडकन उभी ते धुमशान सिद्रामच्या मळ्यात दाखल.
बघतोय तर काय सगळ्या म्हशी गाजरच्या मळ्यात आरामात चरत होत्या. तोपर्यंत सिद्रामची बायको बोंब मारत आलीचं. मड बशीवलं तुमचं, म्हशी आमच्या रानात सोडून, पत्ते कुटत बसता काय?
सरळ गावात जाते अन तुमच्या घरात जाऊन सांगते. असं म्हटल्यावर सगळीच तिच्या पाया पडू लागली गया वया करू लागली. काकू आमची चूक झाली, परत असं होणारच नाही. त्यावर ती त्रागा करत म्हणे, ह्या पिकाचे नुकसान तुमचा बाप भरून देणार काय ? असं सगळं रंगात येत असताना पक्या पुढ झाला अन गचकन तीच पाय धरु लागला. कारण ती पक्याची चुलत मावशी लागतं होती. मग सगळं वातावरण थंड झाल्यावर, म्हसरांना सरळ मोती तळ्यात सोडल आणि सुटका करून घेतली. आता म्हशी आणि पाणी ह्यांचं जूनं नातं. एकदा का म्हैस पाण्यात गेली की दोन तास गच्चन्ति. बिनघोर होऊन सगळी परत झाडाखाली आले. पत्ते गोळा करून ठेवले.
राज्या हणम्या दोघेही चिंचच्या झाडावर चढली आणि खाली पिकलेल्या चिंचा खाली टाकू लागले तस आम्ही गोळा करत बसलो. एव्हाना संध्याकाळ झालेली. म्हसरांना पाण्यातून कसबस बाहेर काढून घरी परतत, रविवारी सकाळची खेळण्याची अखणी पण झालेली.
आणलेल्या चिंचेत मीठ लसूण गूळ घालून त्याला उखळात चेचलं आणि जोंधळ्या च्या धाटवर त्याला बांधून सगळ्यांना वाटलं. तशी सगळी परत संध्याकाळी तोंडात घणं घट धरून लॉलीपॉप सारख चोखु लागली. खोताच्या दगडी कट्ट्यावर गप्पा चालू झाल्या.
परत दबड्याची काशी आली आणि बोंब मारायला सुरवात केली. तस सगळीजण घरात पसार झाली. रविवार सुट्टी सकाळ उठून धपाधुपी खेळायचं ठरले. चेंडू कुणाकडं नव्हताच. मीच शेवटी घरात आलो. घरात केळीच्या पानांचे द्रोण होते, त्यावर केळीच्या पानांचा चेंडू होता तो घेतला. त्यावर कपडाच्या चिंद्या गुंडाळून बॉल तयार केला अन धपाधुपी चालू झाली. बऱ्याच वेळा तो चेंडू गटारीत पण पडला तसाच उचलला. आणि कापडं रंगीत व्हायला लागली. चेंडू किरण्याच्या हातात लागला. त्याने समोर असलेल्या हणम्या वर नेम धरला व मारला. नेमक हन्म्याने वार चुकवला तो खाली बसला अन समोरच्या पडवीत पोथी वाचत बसलेल्या मोरे काकांच्या तोंडाला लागला ते गटारीच्या
शिक्क्या सकट! ते बघून सगळी पोर घरात पसार झाली. तस शिंदडीच्यानों करत मोरे काका काळ तोंड घेऊन बाहेर आले. बघतात तर कोणच नाही. रागात शिव्या देऊन न्हणी घरात तोंड धुवायला गेले.
मुलं पण घरात जाऊन शिळी भाकरी दही चटणी खाऊन परत चावडीत जमा झालेली. चावडीच्या पटांगणात चिरर घोडा खेळायचं ठरले. त्यात दोन पार्ट्या करायला पाहिजे होत्या. दोन कॅप्टन झाले बाकीचे जरा लांब जाऊन एकमेकांना संगणमत करून कॅप्टन जवळ जोड्यानी जवळ आले. आला आला घोडा काय काय फोडा असा त्यांचा वाय फाय शब्द होता. एक जोडी आली म्हणाली तुम्हाला राम पाहिजे की कृष्ण, एकानी राम घेतला दुसऱ्या नी कृष्ण अश्या विविध नावानी जोड्यांचे वरगीकरण झाले व ग्रुप तयार झाला. आता दोन्ही कॅप्टननी टॉस करायचा होता. पण पैसे कुणाकडंच नव्हते. मग नेहमी प्रमाणे पातळ दगड घेतला, त्यावर एका बाजूला थुंकी लावली. त्याचाच टॉस तयार केला. पाऊस पाहिजे का उन्ह! पाऊस म्हणजेच थुंकी लावलेलीली बाजू.
त्याच्या विरुद्ध उन्ह टॉस झाला राज्या वर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.
– क्रमशः भाग पहिला
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈