श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “रंगात रंगुनी साऱ्या…” ☆ श्री आशिष मुळे ☆
☆
रंगात रंगुनी साऱ्या
रंग माझा वेगळा
गर्दीत या अस्मितांच्या
भास माझा एकला
*
असुनी नसते शुद्ध मला
वेगळाच असे हा प्याला
पिऊनी जीवन तहानलेला
तो मी मृदगंधाचा भुकेला
*
ती रात्र बनून आली नाही
मला झुकायचा तिटकारा
तिचा उजेड तिच्यापाशी
रस्ता माझा वेगळा
*
स्पर्धा माझी माझ्याशी
खेळ मी एकटा खेळला
नसो रात्र वा असो दिवस
दीप मी चंद्राचाच लावला
*
रंगात रंगुनी साऱ्या
रंग माझा वेगळा
भिजूनी पावसात खाऱ्या
गोडवा शोधून आणला
☆
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈