श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ अॅप्रोच – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆
नेहाच्या संसारात गेल्या वर्षभरात एका मागोमाग एक इतक्या चांगल्या घटना घडल्या कीं पहाणाऱ्यांना तिचा हेवाच वाटावा. पण या सर्व घटनांची परिणती म्हणून नेहाच्या वाट्याला आलेलं एकटेपण तिलाच नकोसं वाटू लागलं. कारण या सर्व घटनांमुळे नेहा आणि निरंजनचं एक सुखी, आनंदी असं चौकोनी कुटुंब अचानक चार दिशांना विखरून गेलं होतं! रोहन आणि प्रिया ही काल-परवापर्यंत एवढीशी वाटणारी त्यांची पिल्लं अचानक पंख पसरून दूर उडून जावीत तसं झालं. कॅंम्पसमधून सिलेक्शन होऊन रोहन काॅक्निझंटला जॉईन होण्यासाठी पुण्याला गेला. प्रियाचं लग्न होऊन ती तिच्या मुंबईतल्या वेगवान रूटीनमधे व्यस्त होऊन गेली. रोहन आणि प्रिया दोघंही इतकी गोड आणि लाघवी होती कीं त्याची अनुपस्थिती कितीही अपरिहार्य असली तरी ती स्वीकारणं नेहाला सुरुवातीला खूप जडच गेलं. तरी बरं तेव्हा नेहाला निरंजनची हक्काची सोबत होती. पण ती सोबतही तात्पुरतीच ठरली. त्याला प्रमोशन मिळालं आणि त्याचं पोस्टिंग झालं ते थेट नागपूरला! नेहा तिच्या नोकरीमुळे कोल्हापूरला एकटी पडली. दिवसभर ऑफिसमधे फारसं जाणवायचं नाही पण संध्याकाळी ती दार उघडून घरी आली कीं मात्र घर तिला खायला उठायचं. अर्थात हे सगळं तिची कसोटी पहायला घडलेलं असावं असं क्षणिकच ठरलं आणि नेहाला अनपेक्षित असा विरंगुळा मिळाला. कारण प्रियाच्या लग्नानंतर रोहनसाठी वधूसंशोधन सुरू झालंच होतं आणि अगदी अचानक त्याच्यासाठी पुण्याचं सानिकाचं स्थळ सांगून आलं होतं. एकमेकांची पसंती झाली आणि रोहनच्या लगीनघाईत तिचं एकटेपण तिच्याही नकळत विरून गेलं… !
आता कधी नव्हे ते रोहन दर विकेण्डला कोल्हापूरला येऊ लागला. लग्नाच्या तयारीत जमेल तशी मदत करू लागला. घरी त्याच्या मित्रांची ये-जा सुरू झाली. दर विकेंडचे दोन दिवस या मित्रांच्या राबत्यामुळे घर जिवंत वाटू लागलं. पूर्वीसारखं हसू, खेळू लागलं.
आनंदाचे, सुखाचे, कृतार्थतेचे क्षण असे नाचत- बागडत हसत-खेळतच येतात, पण दुःख मात्र भित्रं असतं. ते लपून दबा धरून बसतं आणि अचानक हल्ला करतं. त्यादिवशी नेहाला तिच्या ऑफिसमधे आलेला रोहनचा फोन या चोर पावलाने येणाऱ्या भित्र्या दुःखासारखाच होता! आज अचानक तो फोन आला आणि सगळ्या आनंदावर विरजणच पडलं जसं कांही. मन तळापासून ढवळून निघालं!
“आई, थोडं महत्वाचं बोलायचंय.. कामांत आहेस?”
“बोल ना… “
“तू दडपण न घेता शांतपणे ऐकून घ्यायचं बघ.. तरच बोलतो. “
रोहनचा आजचा हा हळवा स्वर नेहाला वेगळा वाटला.
“बोल अरे.. बोल. ऐकतेय मी… “
ती वरकरणी सहज बोलल्यासारखं बोलली खरी, पण आतून अस्वस्थच होती. ‘असं अचानक काय बोलायचं असेल याला.. ?.. ‘ ती स्वतःशीच विचार करत राहिली
“आई, माझं लग्न मोडायचंय… ” ऐकून ती हादरलीच.
” भलतंच काय बोलतोयस रोहन ? काय झालंय काय एवढं?.. “
“आईs.. प्लीsज. तू अशी पॅनिक होऊ नकोस.. “
” मी.. मी पॅनिक होत नाहीये.. हो.. मी.. मी शांतपणे ऐकते.. हां… बोल तू. सांग मला सगळं. काय घडलंय… ? “
“आई,.. “
“एक.. एक मिनिट रोहन.. मी बाहेर ऑफिस कॅन्टीनमधे जाते.. म्हणजे नीट बोलता येईल मला… हां.. बोल आता.. “
कपाळावरचा घाम रुमालाने टिपतानाही तिचा हात थरथरत होता..
“आई, या आजकालच्या मुलींचं ना, काही खरं नसतं. साध्याभोळ्या वाटतात पण पार पोचलेल्या असतात.. ”
भलतंच काय बोलतोय हा?सानिकाचा हसरा प्रसन्न चेहरा तिच्या नजरेसमोरून क्षणभर तरळून गेला..
“कांहीतरीच काय बोलतोयस रोहन.. ?”
“कांहीतरीच नाहीs, खरं तेच बोलतोय. शी कान्ट बी ए परफेक्ट मॅच फॉर मी.. “
“हे इतक्या उशिरा लक्षात आलं कां तुझ्या?” नेहा खवळलीच.. ” पसंतापसंती, नंतरच्या तुम्हा दोघांच्या गाठीभेटी, साखरपुडा.. सगळं होऊन गेल्यानंतर ?”
“लग्न होण्यापूर्वी हे लक्षांत आलय तेच नशीब समज. “
आजचा हा रोहन नेहाला एकदम अनोळखीच वाटू लागला.
“इतक्या टोकाला जाण्याइतकं खरंच गंभीर आहे कां कांही ?”
” होs.. आहेss.. शी इज ऑलरेडी इनव्हाॅल्व्ड इन समबडी एल्स.. “
” तुला कुणी सांगितलं? तिनं स्वत:?”
“ती कशाला सांगेल? त्या मुलाचाच फोन आला होता. “
” तुझा मोबाईल नंबर त्याला कुणी दिला?”
“ते मला काय माहित? तिला सांगायचं धाडस नाही, म्हणून तिने स्वतःच दिला असेल. “
” हे बघ, तू शांत हो.. असा
सूतावरून स्वर्ग गाठू नकोsस. तू सानिकाला भेट. तिच्याशी बोल एकदा. “
“मी बोललो नसेन असं वाटलं कां तुला? पार पोचलेली आहे ती भटकभवानी.. ” रोहन एवढा चिडला होता की पुढे काय बोलावं ते नेहाला समजेचना.
“मी तिला त्या मुलाचं नाव घेऊन स्पष्टच विचारलं तर ती उखडलीच माझ्यावर. ‘तू कुठल्या युगात वावरतोयस?’ असं मलाच विचारतेय. ‘तू काय स्वतःला धुतला तांदूळ समजतोयस कां?’ असं विचारलंन्. याला ‘लग्न मोडणं’ याखेरीज दुसरं कोणतं उत्तर असू शकतं सांग ना मलाs.. “
“रोहन,.. मी काय म्हणते… ” नेहा चाचपडत राहिली.
“आई, आता काय तो सोक्षमोक्ष आत्ताच लावून टाकायचा एकदाचा आणि मोकळं व्हायचं. मी आता लगेच बाबांनाही फोन करणाराय. त्यांनाही सगळं सांगून टाकणाराय.. “
“ए.. ए.. रोहन.. ऐक.. ऐक. तू आता निरंजनला अजिबात फोन करायचा नाहीयेस लक्षात ठेव. तो तिकडे नागपूरहून काय करू शकणाराय? विनाकारण त्रास मात्र करून घेईल. हे बघ, मी.. मी आजच रात्री पुण्याला यायला निघतेय. पहाटपर्यंत पोचेन. आधी शांतपणे बोलू आपण, मग त्यानंतर मीच निरंजनला फोन करीन.. ”
“आता बोलायचं बाकी आहेच काय पण? काय करायचं ते मी ठरवलंय, आणि ते तुलाही सांगितलंय.. “
“काय करायचं ते ठरवलंयस, पण कसं करायचं ते ठरवायला हवं नाs?.. की नकोs? ” तिचा तोल सुटत चालला.
– क्रमश: भाग पहिला
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈