श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “पापी पेट का सवाल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
खाजगी क्षेत्रातील कर्मचारीची स्थिती जे चित्रात दिसतयं त्याहून वेगळी आहे का हो?.. केवळ भारवाहू… धडधाकट शरीर प्रकृती आणि अधिकाधिक कामं करण्याची उर्जा, क्षमता या बळावर डोळ्यासमोर दिसणारे, भेडसावणारे त्याचे अनेक प्रश्न, समस्यांवर जास्तीत जास्त पैसा मिळवून तो सोडविण्याचा प्रयत्न करणारे… आपला मान.. सन्मान, अभिमान, स्वत्व या वैयक्तिक पण आपण माणूस आहोत कुणाचे गुलाम नव्हेत या गोष्टीला सोयिस्कर रित्या विसरून जाणारे… आकर्षक पॅकेज, बढतीची सहजी वाढणारी कमान, रेटिंग नि इन्सेंटीव्ह या भुलभुलैय्यात आपल्या तेज दिमागी बुद्धीला ओलीस ठेवणारे… कायम वरिष्ठांची इंग्रजाळलेल्या परिभाषेत.. यस सर.. आय विल डू दॅट… इनफक्ट आय वुड लाईक टू से.. सारखी हांजी हांजी ची गुळ पोळी तोंडात चघळणारे… टारगेट च्या भुताच्या हाडांची मोळी मधे बेसुमार वाढत जाणारी मागण्यांच्या हाडाच्या वजनाने आपली पाठ, कंबर खचेल, मोडेल.. मन थकेल. किंवा आपल्याला पुढं चालता येणारचं नाही अशी अवस्था केली तरी.. आपला आवाक्याकडे डोळेझाक करून.. ये बिल्कुल हो जायेगा सर.. असा अंधविश्वास देणारे… आणि तो प्रत्यक्षात सार्थ न ठरवता आला तर ताशीव घडीव कारणांची मालिका समोर मांडून वरिष्ठांचा रोष ओढवून घेऊन साॅरी सर म्हणून आपलं अपयश पदरात पाडून घेताना… कामाचा मोबदल्यात अवाजवी घट अनसंग एम्पलाॅयी म्हणून शिक्कामोर्तब करून घेणारे… स्वताच्या तसेच आपल्या कुटुंबाची पोटाची भूक मारत मारत कंपनी नि वरिष्ठांचं कधीही न भागणारी नि समाधानानं कधीही तृप्त न होणाऱ्या भुकेची काळजी करता करता आपली सारी जिंदगी दाव पर लगा देणारे… ते ते सगळे… यात आपण सारे कमी अधिक प्रमाणात येतो बरं का… दोष त्यांचा किंवा आपला नसतोच मुळी.. तर हे घडवून आणणारी सगळी व्यवस्था दुषित आहे… जे शिक्षण देते त्याला रोजगार मिळत नसतो आणि रोजगार उपलब्ध आहेत त्याप्रमाणे शिक्षित कर्मचारी मिळत नाही.. इंग्रजांनी केवळ कारकून घडविणारी शिक्षणपद्धती इथे आणली राबवली आणि आपण आजही तीच पुढे राबवत आहोत… स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी उलटूनही अजून शिक्षणव्यवस्थेची केवळ शकले करण्यात धन्यता मानून तरूण पिढीच्या स्वप्नाचे तिन तेरा वाजवले आहेत.. परिपूर्ण बुद्धिचातुर्य चा संस्कारी विध्यार्थी घडविण्याऐवजी एक बुध्दीभारवाहू परीक्षार्थीं मात्र घडवत गेलो… गाजराचे कवळ तोंडा समोर धरून पळायला लावून भारवाही गर्दभासारखे राबवले जाताना दिसते… लाखातून एखादाच तो या कळपातून बाहेर पडतो… स्वताची कुवत ओळखतो आणि बाजारात आजमवण्याचा प्रयत्न करतो… पण असे किती जण अगदी अगदी नगण्य… आणि बाकी सगळे पापी पेट का सवाल है भाई… म्हणत झुंडमें रहते है और चलते है…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈