कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 243 – विजय साहित्य ?

☆ सुखी संसाराची छाया ☆

(अष्टाक्षरी रचना)

परंपरा संस्कृतीत,

नारीशक्ती आहे वसा.

कर्तृत्वाची पराकाष्ठा,

संयमाचा दैवी ठसा…! १

*

गाते भुपाळी अंगाई,

नारी दळते दळण.

घर स्वच्छता पहाटे,

जमा करी सरपण…!२

*

लागे जीवनाचा कस,

होई सासुरासी जाच.

कसे जगावे जीवन,

सांगे आठवांना वाच…!३

*

पिढ्या पिढ्या राबतसे,

घर संसारात नारी.

पती मानुनी ईश्वर,

घेई कर्तृत्व भरारी…!४

*

कष्ट,त्याग, समर्पण

नाते संबंधांचा सेतू.

नारीशक्ती कर्मफल,

घरे जोडण्याचा हेतू…!५

*

माती आणि आभाळाशी,

नारी राखते इमान.

संगोपन छत्रछाया,

नारीशक्ती अभिमान…!६

*

नारी कालची आजची,

जपे स्वाभिमानी कणा.

कष्ट साध्य जीवनाची,

नारी चैतन्य चेतना…! ७

*

बदलले जरी रूप,

नाही  बदलली नारी.

अधिकार कर्तव्याची,

करे विश्वासाने वारी…!८

*

नारी आजची साक्षर,

करी कुटुंब‌ विचार.

सुख ,शांती, समाधान,

करी ऐश्वर्य साकार…!९

*

नर आणि नारी यांचा,

नारीशक्ती आहे बंध.

जाणिवांचा नेणिवांशी,

दरवळे भावगंध…!१०

*

देई कुटुंबास स्थैर्य,

नारीशक्ती प्रतिबिंब.

रवि तेज जागृतीचे,

जणू एक रविबिंब..! ११

*

नारी संसार सारथी,

नारी निजधामी पाया.

तिची कार्यशक्ती आहे,

सुखी संसाराची छाया…!१२

(महिला दिनानिमित्ताने‌ केलेली रचना)

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments