श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ अॅप्रोच – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “रोहन? ज्याला स्वतःलाच काही नीट समजून घेता आलेलं नाही तो तुम्हाला काय सांगणार? पण मी भेटेन तुम्हाला. बोलेन तुमच्याशी. त्यानंतर तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा. “
“मी वाट पहाते तुझ्या फोनची. “
” हो.. थॅंक्स.. “)– इथून पुढे —-
रेस्टॉरंटमधे फारशी वर्दळ नव्हती. सानिका पाठोपाठ तीही फॅमिली रूमच्या दिशेने निघाली. सानिका थोडी सावरलेली वाटली तिला पण नेहा स्वत: मात्र अस्वस्थ होती. कुठून सुरुवात करावी तिला समजेचना.
” थँक्स. ” नेहाकडे पहात सानिका मनापासून म्हणाली.
” कशाबद्दल ?”
“मघाशी माझं ऐकलंत त्याबद्दल. तुमच्या जागी दुसरं कुणी असतं तर आई-बाबा येईपर्यंत अट्टाहासानं थांबून तमाशाही करू शकलं असतं. तुम्ही समंजसपणा दाखवलात. त्याबद्दल थँक्स. “
“बाबांची तब्येत कशी आहे?”
“रूटीन चेकअप होतं. ही इज क्वाईट नॉर्मल. “
“ओके. आपण मुद्याकडे वळूया?”
सानिका मानेनेच ‘हो’ म्हणाली. तिच्या मनावरचं दडपण हळूहळू वाढत चाललं होतं. ती कावरीबावरी झाली. नेहाच्या नजरेने ते अचूक हेरलं. तिचा राग यायच्या ऐवजी नेहाला आता तिची कींव वाटू लागली.
“मघाशी ‘मी कसलेही रंग उधळलेले नाहीत’ असं तू म्हणाली होतीस. ‘रोहननेच नीट समजून घेतलेलं नाहीय तो तुम्हाला काय सांगणार?’ असंही तुझं स्टेटमेंट होतं. याचा अर्थ अजूनही तुझी कांहीच चूक नाहीये असं वाटतंय कां तुला?”
नेहाच्या प्रश्नातला थेटपणा आणि स्वरातला शांतपणा सानिकाला अनपेक्षित होता. तिचा घरून निघतानाचा बचावाचा पवित्रा तिच्याही नकळत आपसूक गळून पडला. मनातलं नेमकं बोलायची ही संधी तिला घट्ट धरून ठेवायची होती. ती मनातल्या मनात कसेबसे शब्द जुळवू लागली…
” चूक किंवा बरोबर हे व्यक्तिपरत्वे वेगळं असू शकतं. माझं कांही चुकलंय कां हे मात्र आता तुम्ही ठरवायचंय. रोहननं त्यादिवशी तुमच्याइतक्याच शांतपणे मला हे विचारलं असतं तर त्या दिवशी त्याला जे सांगितलं असतं तेच आज तुम्हाला सांगते. त्यादिवशी रोहन मला भेटायला आला तोच खूप संतापून. त्याची ती प्रतिक्रिया खूप नैसर्गिक असेलही आणि त्या अवस्थेत तो मला समजून घेऊ शकणंही अपेक्षित नव्हतंच. म्हणूनच रोहनच्या मनात खदखदणारा संताप सहन करून मी शांतच राहिले होते. पण मला कांहीही बोलायची संधी न देता त्याने माझ्यावर केलेले गंभीर आरोप मला सहन झाले नाहीत. स्वीकारताही आले नाहीत. आजकालच्या पोरी फार पोचलेल्या असतात असं त्याचं स्टेटमेंट होतं. ‘मी वरुन साधीसुधी वाटते पण हे माझे दाखवायचे दात आहेत’ यावर तो माझं बोलणं ऐकून घेण्यापूर्वीच ठाम होता. मी एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करणारी मुलगी आहे काकू. रोहनही याच क्षेत्रात काम करतोय. इथलं वर्क कल्चर आणि निसरड्या वाटा त्याला परिचित असूनही तो हे बोलत होता. चुकीची किंवा बरोबर पण मलाही माझी कांही एक बाजू आहे हे जाणून घ्यायची त्याला गरजच वाटली नाही. मला कांही बोलायची किमान संधी न देता थेट मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून मोकळा झाला तो! अशा परिस्थितीत खरंतर स्वच्छ मनाने संवाद व्हायला हवा होता. आमचे मात्र फक्त वादच झाले. आय एम सॉरी फॉर दॅट. त्याचा राग मी समजू शकते, पण माझं ऐकून घेणंही त्याला अगत्याचं वाटतं कां हेही महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मी त्याच्या निरोपाची एक-दोन दिवस वाट पहायची ठरवलं होतं म्हणून घरी नव्हतं सांगितलं. “
” तो मुलगा कोण होता?”
” माझ्याच कंपनीतला माझ्या कलिग आहे तो. “
” त्यांने असं कां करावं? तुमचं अफेअर होतं का?”
सानिका एक क्षण थांबली. नेमकं उत्तर द्यायची हीच वेळ आहे हे तिनं ओळखलं. आता हातचं कांहीही राखून ठेवायची गरजच तिला वाटेना.
” चाणाक्षपणानं, माझ्या सोयीचं उत्तर द्यायचं, तर ‘त्याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं पण माझ्या नकारामुळे तो दुखावला गेला’ असंही मी सांगू शकते. पण मी तसं करणार नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाहीय. थोडीच.. पण वेगळी आहे! त्याचं मुळात माझ्यावर ‘प्रेम’ नव्हतंच. आणि माझं म्हणाल तर मी अधांतरी होते. मी माझ्या वागण्या- बोलण्यातून कधीच कम्युनिकेट केलं नव्हतं त्याला पण तो मला प्रथमदर्शनी आवडला होता. मी वहावत जाणाऱ्यातली किंवा तुम्हाला वाटलं, तसं रंग उधळणाऱ्यातली नव्हते. पण म्हणून माझ्या मनात एखाद्याबद्दल जवळीक निर्माण होणं मी टाळूही शकत नव्हते हेही तेवढंच खर आहे. त्याचं हसणं, बोलणं, दिसणं, वागणं, त्याचा डिसेण्ट प्रेझेन्स सगळंच कुणालाही आवडावं असंच होतं. पण ते खरंच ‘प्रेम’ होतं की त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतचं ‘आकर्षण’ या संभ्रमात मी तरंगत होते. मला ते एकदा नीट तपासून पहायचं होतं. पण मला तेवढीही उसंत न देता त्याने मैत्रीसाठी हात पुढे केला. त्या मैत्रीच्या भरंवशावरच मी त्याला पारखून घ्यायचं ठरवलं. एकत्र गप्पा, कधी कॉफी-शॉप हा आता एक विरंगुळाच झाला होता जसा कांही. एक दिवस त्याने मला पिक्चरला यायचा आग्रह केला. मी ठामपणे ‘नाही’ म्हणाले. तो रुसला. नाराज झाला. त्याने आधीच काढून ठेवलेली सिनेमाची दोन तिकीटं खिशातून काढली आणि तो ती फाडू लागणार तेवढ्यात एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी मी पुढे झेपावले आणि त्याला अडवलं. मला त्याला दुखावावंसं वाटेना. ती खरंतर त्याच्या जिंकण्याची आणि माझ्या हरण्याची सुरुवात ठरू शकली असती, पण माझ्या सुदैवाने तसं कांहीं झालं नाही. निसरड्या वाटेवरून मी सावरलं माझं मलाच. त्याला दुखवायचं नाही म्हणून मी त्याच्याबरोबर सिनेमाला गेले खरी पण आजही त्याचा मला पश्चाताप होत नाहीय. मी गेले ते बरंच झालं असंच वाटतंय. कारण म्हणूनच थिएटरमधल्या त्या मिट्ट काळोखातही त्याचे विकृत रुप मला स्वच्छ दिसलं! अंधार होताच तो अलगद मला खेटून बसू लागला तेव्हा मी थोडं नीट सावरून बसले. पण हार न मानता त्याने हळूच खुर्चीमागून आपला हात माझ्या खांद्यावर टाकला आणि माझ्याशी लगट करू लागला. मी त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि न बोलता माझ्या खांद्यावरचा त्याचा हात मी बाजूला केला. तो चिडला. बेचैन झाला. त्याने क्षणभर वाट पाहिली न् तडक उठून बाहेर निघून गेला. त्याचा उतावीळपणा मला आवडला नव्हता म्हणूनच स्वीकारताही नाही आला. त्याची किळस वाटू लागली आणि किंवही. त्याने परत आत येऊच नये असंच वाटतं राहिलं. इंटरव्हल झाला न् मी उठून बाहेर आले. दबा धरून माझीच वाट पहात असलेला तो सरळ पुढे येऊन माझी वाट अडवून उभा राहिला. जळजळीत नजरेने माझ्याकडे पहाणारा, संतापाने थरथरणारा. नाईलाजाने मी थांबले.
” खेळवतेयस मला?” त्यानं चिडून विचारलं.
” काहीतरीच काय बोलतोयस?”
“खेळवत, तिष्ठत नको ना ठेवू आता, चल. “
“कुठं?” त्याच्याकडे रोखून पहात मी विचारलं.
“तू म्हणशील तिथं. प्लीज.. नाही म्हणू नको. रुमवर येतेस?”
मी ठामपणे ‘नाही’ म्हणाले.
” कां पण?” तो संतापलाच एकदम. आता एक घाव दोन तुकडे करण्याखेरीज पर्यायच नव्हता.
” तू जा आता. तू काय बोलतोयस, वागतोयस त्याचा रात्रभर शांतपणे विचार कर आणि आज मला जे विचारलंयस ना आत्ता ते सगळेच प्रश्न उद्या आपण ऑफिसमधे भेटू तेव्हा सगळ्या स्टाफसमोर मला विचार. तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तिथे सर्वांसमक्षच तुला देईन. नीघ आता. “
त्याला झिडकारुन मी निघून गेले. आजवरच्या आयुष्यात मी कांही रंग उधळलेच असतील ना काकू, तर हे एवढेच… ”
आवाज भरून आला तसं ती बोलायची थांबली. सानिकाचा हात नेहाने अलगद हातात घेतला. सानिकाने तो कसनुसं हसत दूर केला.
“आता विषय निघालाय म्हणून सांगते, राग मानू नका. रोहन तुम्हा कुणाच्या दबावाखाली लग्नाला तयार झाला तर मलाच ते नकोय. खरं सांगू? त्याची रागाच्या भरात व्यक्त झालेली कां असेनात पण आजकालच्या मुलींविषयीची टोकाची मतं मला धोक्याची वाटतायत. माझी बाजू समजून घेण्याइतकंच त्याने स्वतःची मतं तपासून बघणंही गरजेचं आहे असं मला वाटतं. आमच्या संसाराची उभारणी परस्परांबद्दलचा आदर आणि विश्वास यांच्या भक्कम पायावर उभी रहाणार असेल तरच ते आम्हा दोघांच्याही हिताचं आहे. मी रोहनच्या फोनची वाट पाहेन. ”
नेहाचा निरोप घेऊन सानिका गेली तरी नेहा दिङमूढ होऊन उभीच होती. काहीही झालं तरी रोहनला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करायचं हे तिने मनोमन ठरवूनच टाकलं. त्यासाठी अर्थातच ती निरंजन आणि प्रिया दोघांची मदत घेणार होतीच. पण तरीही… ? तरीही ती अस्वस्थ होतीच. सानिकाला समजून घेणं जेवढं सोपं गेलं तेवढंच रोहनला समजावणं तिला अवघड वाटत राहिलं.
कांही क्षणापूर्वी उध्वस्त करणाऱ्या परिस्थितीला सामोरं जातानाचा सानिकाचा ‘अॅप्रोच’ तिला कौतुकास्पद वाटला होता. पण आता.. ? आता मनात रेंगाळणाऱ्या त्या कौतुकावर रोहनचा अॅप्रोच कसा असेल या भीतीचा एक तवंग अलगद तरंगू लागलेला होता….!!
— समाप्त —
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈