श्री सुधीर करंदीकर
अल्प परिचय
शालेय शिक्षण विदर्भामध्ये वाशिम येथे व इंजीनियरिंग भोपाळला झाले. एक वर्ष नाशिकला ओझर येथे विमान कंपनीत नोकरी. नंतर पुण्याला टाटा मोटर्स मध्ये. २००९ मध्ये निवृत्त . निवृत्तीनंतर अवांतर लिखाणाला नकळतच छान सुरुवात झाली आणि वाचकांकडून छान चालना मिळत गेली.
जीवनरंग
☆ “शाम दहावीला बसतो” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
दहावीच्या परीक्षा जवळ आल्या, की, मला शाम च्या १० वी ची जुनी आठवण हमखास होते. शाम हा माझा मित्र पुरोहित याचा मुलगा. त्यावेळेस पेपर ला बातमी असायची, की, कुणाच्या तरी आय कार्ड वर चुकून शाहरुख खान चा फोटो छापला होता, कुणाच्या आय डी कार्डवर ओबामा यांचा फोटो आला होता, वगैरे. अशा गोष्टींवर आपला सहसा, लगेच विश्वास बसत नाही, पण आमच्या श्यामच्या बाबतीत असेच काही घडले, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास तर बसलाच, आणि ती घटना कायम मनात रुजली.
शाम पुरोहित त्यावर्षी वर्षी दहावीला बसला होता. शाळेतून फॉर्म मिळाला. शामनी फॉर्म भरला. काही चुकले नाही ना, हे बघायला, मित्रानी दोन वेळा फॉर्म तपासून पाहिला. आपल्या नवऱ्याचा स्वभाव वेंधळा आहे, हे माहीत असल्यामुळे, मित्राच्या बायकोने फॉर्म बरोबर भरल्याची पुन्हा खात्री केली. फॉर्म बरोबर फोटो पण पाठवायचा होता.
रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे क्लासेस च्या जाहिराती आपण पेपरमध्ये बघतोच. आमच्या क्लासचा, अमित पुरंदरे बोर्डात पहिला आला, सीमा लांबे बोर्डात चौथी आली, सौरभ चोकटे ला तीन विषयात 98 मार्क, वगैरे वगैरे. त्या वर्षी परीक्षेचे फॉर्म भरायचे वेळेस, नव्यानेच फोटो स्टुडिओच्या जाहिराती सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी परीक्षेच्या फॉर्म करता आमच्या स्टुडिओत फोटो काढलेला, कुणाल देशपांडे बोर्डात पहिला आला, शाम हिंगे पुण्यात पहिला आला, नेहा अवचटला गणितात १०० मार्कस, वगैरे वगैरे. मित्रानी सगळ्या जाहिराती बघून, फोटोकरता साई स्टुडिओ पसंत केला. चांगला मुहूर्त बघून सगळे शामला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले. मित्राला डोळ्यासमोर पुढच्या वर्षीच्या पेपर मध्ये साई स्टुडिओची जाहिरात दिसायला लागली, फॉर्म करता साई स्टुडिओत फोटो काढणारा श्याम पुरोहित ठाण्यात पहिला.
फोटोग्राफर नी शाम कडे दोन-तीन अँगल्समधून बघितले, आणि स्टुडिओ मधला काळा कोट आणि लाल टाय घालून फोटो काढला.
शामनी शाळेत फॉर्म – फोटो जमा केले. बोर्डाकडून ऍडमिशन कार्ड आले. शामनी नाव वगैरे तपासून बघितले. आपला काळा कोट व लाल टाय बघितला.
म्हणता म्हणता परीक्षेचा दिवस उजाडला. देवाला, आई – वडिलांना नमस्कार करून, शाम शेजारच्या बाळू बरोबर सेंटरला गेला. बाळू यावर्षी पुनः परीक्षा देत होता. पर्यवेक्षकांनी बाळूचे कार्ड बघून त्याला आत सोडले. शामनी मनात देवाला नमस्कार केला आणि कार्ड पुढे केलं. पर्यवेक्षकांनी शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं, पुन्हा शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं. मग शाम ला विचारलं, ओबामा यांचे पूर्ण नाव काय आहे. शाम ला वाटलं, १० सारखी मोठी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे जनरल नॉलेज आवश्यक आहेच. आत सोडण्यापूर्वी सर आपलं जी-के टेस्ट करत असतील. शाम नी लगेच उत्तर दिले ‘बराक ओबामा’. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा कुठे राहतात. शाम तयारच होता – व्हाईट हाऊस, वाशिंग्टन. मागच्या मुलांची चुळबुळ सुरु झाली, पण सरांशी पंगा नको, म्हणून सगळे चूप होते. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा आत्ता कुठे आहेत. या प्रश्नावर शाम गोंधळला.
त्यानी जी – के चा क्लास लावला होता. त्यामध्ये भारताचे आणि इतर देशांचे, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ते कुठे राहतात, त्यांनी देशाकरता काय महत्वाचे निर्णय घेतले, असे प्रश्न त्याचे झाले होते. पण अमुक व्यक्ती आता कुठे आहे, असा प्रश्न कधीच नव्हता. त्यामुळे शाम गोंधळला. लाईनमधला मागचा मुलगा स्मार्ट होता, तो म्हणाला सर, अमेरिकेचे अध्यक्ष केंव्हा कुठे असतील, हे गोपनीय असते. ते कुणीच सांगू शकणार नाही. सरांना उत्तर आवडले होते, पण लक्ष विचलित होऊ न देता, सर शाम ला म्हणाले, तुला उत्तर माहित नाही ना, मग चल हेडमास्तरांकडे.
चेंबरमध्ये गेल्यावर, पर्यवेक्षक हेडमास्तरांच्या कानाशी कुजबुजले – सर, याच्या कार्ड वर बराक ओबामा यांचा फोटो आहे. हेडमास्तरांनी आय – कार्ड बघितलं आणि शामकडे बघितलं, असं २-३ वेळा केल्यानंतर, कार्ड शाम ला दाखवत विचारलं, कार्डावर ओबामा यांचा फोटो आहे, ते आत्ता कुठे आहेत. शाम नी आय कार्ड बारकाईने बघितलं, तोच काळा कोट, तोच लाल टाय, पण आपला चेहेरा नाही, हे बघून शाम पण गोंधळला. हेडमास्तरांना वाटलं, की, ओबामा यांचं कार्ड आहे, म्हणजे, ते परीक्षेला नक्की येणार. कार्डावर नाव चुकू शकतं, पण फोटो चुकू शकत नाही, हा त्यांचा अनुभव. त्यांच्या वोटिंग कार्डवर फोटो त्यांचा होता, पण त्याचे नाव चुकीचे होते, तरी ते वोटिंग ला जायचे. त्यांच्या बायकोच्या एका कार्डावर, त्यांचे नाव वेगळेच आले होते. हेडमास्तरांच्या मनात मनसुबे सुरु झाले – ओबामा नक्की येणार, पेपर संपला की, त्यांच्या बरोबर फोटो काढू, आपला फोटो पेपरला येईल, वगैरे.
ओबामा यांना यायला उशीर होऊ शकतो, हे समजून सरांनी फर्मान काढले, की, ओबामा आल्यानंतरच पेपर सुरु होईल. त्यांनी शाम ला पुन्हा विचारले – ओबामा कुठे आहेत? ओबामा आत्ता कुठे असतील, या प्रश्नानी शाम परेशान झाला. शामला अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती ची आठवण झाली. कुणाची मदत घेता आली, तर या प्रश्नाचे उत्तर कठीण नव्हते. कुठलीही अडचण आली, की, आपल्याला राम – कृष्ण – शंकर आठवतात. पण यांना सोडून, शाम नी अमिताभ यांचा धावा सुरु केला. असं म्हणतात, की, ज्या गोष्टीचा, आपण आतल्या मनापासून धावा करतो, सृष्टी ती गोष्ट आपल्यापुढे साकार करते.
झाले अगदी असेच. सगळे आपापल्या ‘खयालोंमें’ असतांना, अचानकच एक प्रोड्युसर, त्यांची टीम आणि स्वतः अमिताभ केबिन मध्ये अवतरले. प्रोड्युसरनी, आधी सूचना न देता आल्याबद्दल, सरांची आधी माफी मागितली. त्यांना डोक्याला लावायच्या लाल तेलाची ऍड करायची होती. पेपर संपल्यानंतर, अमिताभजी एका मुलाच्या डोक्याला लाल तेल लावतील, आणि एक डायलॉग म्हणतील. आम्ही शाळेला देणगी देऊ, अशी कल्पना सरांना प्रोड्युसरांनी दिली.
शामला वाटले, की, आपल्या हाकेला ऐकूनच अमिताभ आले आहेत. शामनी हिम्मत करून, अमिताभ यांना गळ घातली, की, त्यांच्या हेल्प लाईन च्या मदतीने, त्यांनी, बराक ओबामा आत्ता कुठे आहेत, याचे उत्तर सरांना द्यावे. अमिताभ म्हणजे एव्हर ग्रीन आणि रिसोर्सफूल पर्सन्यालिटी. अमिताभनी हा – हा जरूर, असे म्हणायचा अवकाश, आणि प्रोड्युसरनी लगेच, कौन बनेगा करोडपती चा मिनी सेट लावला. अमिताभनी करोडपती स्टाईलने सुरुवात केली – शामजी किसकी मदत लेना पसंद करेंगे. फोनाफ्रेंड या ऑडियन्स की? आपने आभितक किसीभी हेल्प लाईन का इस्तेमाल नही किया है. शाम नी विचार केला, कि ऑडियन्स ची मदत घेण्यात काही अर्थ नाही. हेडमास्तरांना आणि पर्यवेक्षकांनाच हा प्रश्न आहे, त्यामुळे ते दोघे कट. बरं, अमिताभ यांची टीम आत्ताच इथे आली आहे, त्यामुळे त्यांना पण ओबामा आत्ता कुठे आहेत, ही कल्पना नसणार. अमिताभ नी शाम च्या मनातली चलबिचल ओळखली, आणि म्हणाले, क्या आप फोनाफ्रेंड से पूछना पसंद करेंगे? शाम ला हा पर्याय आवडला.
अमिताभ : किससे पूछना चाहोगे?
शाम चे विचारचक्र सुरु झाले – बाबांना विचारावे का? नाही, नाही. आत्ता आई कुठे आहे, हे पण त्यांना माहित नसते, ओबामांचे ते काय सांगणार! ओबामा यांनाच फोन लावला तर काय हरकत आहे? पण सरकारी ऑफिस मध्ये फोन लागेल कां? बाबा बऱ्याच वेळेला काही माहिती विचारायला, एल आय सी ऑफिस ला फोन करतात, कधी पेन्शन ऑफिस ला फोन करतात, कधी कार्पोरेशन च्या ऑफिस ला फोन करतात, पण दिवस दिवस त्यांचा फोन लागत नाही. एकतर रिंग वाजत राहते आणि कुणी फोन घेत नाही, किंवा कायम एंगेज टोन येतो. पण कौन बनेगा मध्ये, कुठलाही फोन लावला, तरी २ किंवा ३ रिंग जातात आणि पलीकडचा फोन उचलतो. म्हणजे ओबामा यांना फोन लावायला काहीच हरकत नाही!
शाम : अमिताभ सर, मै ओबामाजी से पुछना चाहता हू
अमिताभ : पक्का, लॉक किया जाय?
शाम : हा, सर. पक्का
अमिताभ : कॉम्प्युटरजी, बराक ओबामा जी को फोन लगाया जाय.
टीम तयारच होती. लगेच रिंग चा आवाज आला आणि अहोआश्चर्यम म्हणजे पलीकडून आवाज आला, यस् ओबामा हियर
अमिताभ : सर, गुड मॉर्निंग, धिस इज अमिताभ बच्चन फ्रॉम इंडिया, ठाणे हायस्कुल
ओबामा : यस्, आय नो दॅट यु आर ऑन द लाईन. हाऊ कॅन आय हेल्प यू?
अमिताभ : सर, शाम वॉन्टस टू आस्क यु समथिंग. यु विल बी गिव्हन 30 सेकंड्स. नेक्स्ट व्हाईस इज फ्रॉम शाम, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाऊ
ओबामा : शाम, यु कॅन स्पिक इन मराठी, माय इंटरप्रिटर विल ऐनसर
शाम जाम खुश झाला.
शाम : सर, माझ्या आय कार्ड वर तुमचा फोटो आहे. तुम्ही परीक्षेला याल असे सरांना वाटते, तुम्ही सध्या कुठे आहात?
ओबामा (ऑफिस) : मी आत्ता ऑफिस मध्ये आहे. मला नुकतीच मुंबईच्या कॉन्स्युलेटकडून माहिती मिळाली, की, तुमच्या कडे काही जणांच्या आय कार्डवर माझा फोटो आला आहे. मी तिथल्या परीक्षेला नक्कीच बसत नाही, हे सरांना सांग. याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे, तिथल्या प्रश्नपत्रिकेत बऱ्याच चुका असतात, त्यामुळे उत्तर लिहितांना गोंधळ होतो. आणि दुसरे म्हणजे, पेपर तपासायची वेळ आली, की, तिथले शिक्षक संपावर जातात, आणि मग कुणीही पेपर तपासतो.
सरांना सांग, की, जरी माझा फोटो आय कार्ड असला, तरी ज्याचे नाव कार्ड वर आहे, त्याला परीक्षेला बसू द्यावे.
फोन कट झाला.
ओबामा यांना आपल्या परीक्षेबद्दल इतकी इत्यंभूत माहिती आहे, याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.
सरांनी शाम ला कार्ड परत केले, आणि पेपरला जायला सांगितले. पर्यवेक्षक म्हणाले, सर, परीक्षेची वेळ संपली आहे. आपण परीक्षा होल्ड वर ठेवली होती. इतर सेंटरची मुले पेपर संपवून बाहेर पण आली असतील. हेडमास्तरांनी लगेच निर्णय दिला, की, आजचा पेपर सगळ्यांनी दिला असे समजण्यात येईल. आणि बेस्ट ऑफ फाईव्ह चे ऍव्हरेज मार्क या पेपरला दिल्या जातील. शाळेतल्या मुलांनी टाळ्या वाजवत, आपापल्या घराकडे धूम ठोकली.
पेपर संपला, हे ऐकताच प्रोड्युसरची टीम पुढे आली. हेडमास्तरांची खुर्ची मध्ये ओढण्यात आली. शाम ला त्यावर बसवले. सायलेंस – लाईट्स ऑन – कॅमेरा रोलिंग, हे डायलॉग सुरु झाले. अमिताभनी लाल तेलाची बाटली उघडली आणि श्यामच्या डोक्यावर तेलाची धार सोडली. थंडा थंडा – कुल कुल असे म्हणत थोडे मॉलिश केले, आणि ‘सरको लाल तेल लगाओ और एक्झाम का टेन्शन खतम’, हा डायलॉग आपल्या शैलीत म्हटला. कट – कट अशी घोषणा झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
प्रोड्युसर नी मुलांच्या ट्रिप करता सरांकडे १०, ००० रु चा चेक दिला. शाम ला १००० चा चेक दिला. आणि अमिताभला १ लाख चा चेक दिला
शाम नी फोनकडे बघून ओबामा यांना नमस्कार केला. अमिताभ यांना नमस्कार केला. सरांना आणि पर्यवेक्षकांना नमस्कार केला आणि लाल तेलाच्या नशेत, हवेत तरंगत घर गाठलं.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈