श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥ ☆ श्री संभाजी बबन गायके 

जीवनात राम असेतो जीवनात राम असतो, असे संत सांगून गेलेत. एकदा का राम असे नाम असलेला रस रसनेने चाखला की अखिल विश्वातला कोणताही रस रसनेला नको असतो असे जगदगुरू श्री संत तुकोबाराय सांगून गेले! 

परमार्थात सगुण भक्ती अतिसुंदर मानली जाते. पाषाणाची मूर्ती भक्तांच्या भावनेमुळे आणि प्रेमाच्या वर्षावाने सजीव साकार होते. आणि या संजीवन अस्तित्वाची अहर्निश सेवा ज्यांना लाभते ते अखंडित भाग्याचे स्वामी म्हणवले जातात. 

शरयू तीरावरची अयोध्या नगरी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने तीर्थ झाली. रामायण घडले…प्रभूंनी शरयूत देहत्याग केला! 

रामराज्यानंतर भरतभूमी अनेक आक्रमणांची साक्षीदार बनली…आणि भक्ष्यसुद्धा!  

उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर मधील जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले एक युवक २० मे १९५५ रोजी दहा वर्षांचे झाले आणि त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवले आणि त्यांना अयोध्येने आकर्षून घेतले. त्याआधी बाल्यावस्थेत हे युवक कित्येकदा अयोध्येत येत असत आणि त्यांना हे स्थान परिचयाचे वाटत असे! अगणित वर्षांपूर्वी याच अयोध्येत महाराज दशरथ यांच्या राजप्रासादात पौरोहित्याची धुरा वाहिलेले ऋषीच पुन्हा अयोध्येत आले असावेत बहुदा. हे युवक हनुमान गढी मंदिराच्या सिद्ध पीठाचे महंत आणि आपल्या वडिलांचे गुरु बाबा अभिराम दास यांचे शिष्य बनले. आणि या कोवळ्या वयात त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि त्यांचे मन राम रंगी रंगले. वयाच्या विसाव्या वर्षी हे युवक सत्येंद्र हे नाम धारण करून पुजारी बनले होते. संस्कृत व्याकरण विषयात पारंगत होऊन ते आचार्यपदी विराजमान झाले होते. पुढे त्यांना सत्य धाम गोपाल मंदिराची जबाबदारी सोपवली गेली.  

१९७५ मध्ये त्यांना रामकोट येथील त्रिदंडदेव संस्कृत पाठशाळेत संस्कृत शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. रामजन्मभूमी मुक्ती विषय ऐन भरात असताना सत्येंद्र दास यांनी प्रभू रामचंद्र यांची पूजा सेवा करण्यास आरंभ केला होता.

१९९२च्या आधी काही महिने सत्येंद्रनाथ यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थानातील श्रीराम यांचे अधिकृत पुजारी म्हणून सेवा प्राप्त झाली. संबंधित अधिकारी वर्गाने त्यांना मानधन घ्यावे लागेल असे सांगितले. महंत सत्येंद्र यांनी प्रभूंचा प्रसाद म्हणून केवळ रुपये शंभर द्यावेत,अशी विनंती केली. २५ मार्च २०२० रोजी प्रभू त्यांच्या मूळ स्थानापासून तात्पुरते दूर गेले…सत्येंद्रदास त्यांच्या सोबत गेले…आणि प्रभूंना घेऊन २२ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा मूळस्थानी आले….जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे तू जेथे जातो तेथी मी तुझा सांगाती असे झाले होते…सत्येंद्र यांनी आपल्या ‘दास’पणात खंड पडू दिला नाही…..हा कालावधी जगाच्या भाषेत ३२ वर्षे,११ महिने आणि १ दिवसाचा भरला! आणि एकूण ७९ वर्षे ८ महिने आणि २३ दिवसांच्या जीवनाकालातील उणीपुरी ६० वर्षे ईश्वरसेवेत रमलेल्या या देहात रामचिन्हे प्रकट होतील,यात नवल ते काय? अयोध्येतील सर्वांना च ते प्रिय ठरले होते…हा  रामनामाचा आणि रामसेवेचा महिमा.

काल दिनांक १२ फेब्रुवारी,२०२५ रोजी माघ पौर्णिमेचा मोठा उत्सव होता अयोध्येत…याच दिवशी महंत सत्येंद्र दास यांनी जीवनाची सांगता केली. आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे पार्थिव शरयूच्या जलात समाधिस्त झाले! 

अशी रामसेवा घडलेले हे आयुष्य सर्वथा वंदनीय होते. प्रभू रामचंद्र त्यांना त्यांच्या चरणाशी कायम स्थान देतील,यात शंका नाही…कारण प्रभूंच्या चरणी त्यांनी आपले अवघे जीवित व्यतीत केले होते….एवढे पुण्यफल तर प्राप्त होणारच! 

भावपूर्ण श्रद्धांजली…आचार्य महंत सत्येंद्र दासजी महाराज! जय श्री राम! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

आमची पण श्रद्धांजलि सत्येंद्रनाथ महाराजांना 🙏🙏